करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.
करमाळा (सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ऍग्रोला (Baramati Agro) 25 वर्षांसाठी आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया झाल्याचे सांगितले जात असतानाच, बारामती ऍग्रोला आदिनाथ सुरू करायला अडचणी येत असेल तर तो आम्ही चालवायला घेऊन एक महिन्यात सुरू करू, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांचे चिरंजीव आणि करमाळा तालुक्यातील कमलाभवानी रिफाइन्ड शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे (Vikramsinh Shinde) केले आहे. विक्रमसिंह शिंदे यांनी आदिनाथ चालवण्यास देण्याचे एक प्रकारे आव्हान दिले असून, आता सत्ताधारी बागल गट यावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
पांडे (ता. करमाळा) येथील कमलाभवानी रिफाइन्ड शुगर या साखर कारखान्याच्या सहाव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. विक्रमसिंह शिंदे यांच्या या विधानाने आदिनाथ कारखाना सुरवातीपासूनच घेण्यासाठी शिंदे इच्छुक होते, या चर्चेला आता दुजोरा मिळाला आहे. सत्ताधारी मंडळींनी हा साखर कारखाना 25 वर्षांसाठी बारामती ऍग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागील वर्षी सर्वसाधारण सभेत घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून आदिनाथ कारखाना बारामती ऍग्रोला भाडेतत्त्वावर देण्याची चर्चा सुरू आहे, तसा करारही करण्यात आला आहे. मात्र एमएससी बॅंक व एनसीडीसी यांच्या कर्जप्रकरणात या कारखान्याची प्रक्रिया अडकल्याचे सांगितले जात आहे. बारामती ऍग्रोला हा कारखाना कशा पद्धतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला, हे अद्यापही सत्ताधारी बागल गटाकडून सांगण्यात आले नाही. वारंवार मागणी करूनही बारामती ऍग्रोबरोबर कसा करार झाला, ही माहिती लपवून ठेवण्यात आली आहे, असा आरोप काही संचालकांनी करत राजीनामेही दिले आहेत. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव माढा पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी थेट आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. एका बाजूला आदिनाथ पुढच्या वर्षी सुरू करू, असे बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे.
बारामती ऍग्रोला आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी आणखी एक वर्ष लागत असेल आणि माढ्याचे शिंदे जर हा साखर कारखाना एक महिन्यात सुरू करत असतील तर नेमका आदिनाथचा विषय कशात अडकला आहे, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बारामती ऍग्रोला 25 वर्षांसाठी आदिनाथ कारखाना द्यायचा आहे. तर विक्रमसिंह शिंदे हे फक्त 15 वर्षांसाठी कारखाना मागत आहेत. 25 वर्षे आणि 15 वर्षे हा प्रकार नेमका काय आहे, हेही समजून घेण्याची वेळ आली आहे. विक्रमसिंह शिंदे यांनी आदिनाथ एक महिन्यात सुरू करू, असे सांगितले असले तरी कारखान्याच्या अडचणी कशा सोडवणार? कामगारांच्या पगारीचे काय करणार? बॅंकेच्या कर्जाचे काय? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मात्र देऊ शकले नाहीत.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रोला सुरू करण्यास काही अडचणी येत असतील तर तो आम्ही या सीझनलाच सुरू करू. 15 वर्षांसाठी हा कारखाना विद्यमान संचालक मंडळाने आम्हाला चालवण्यासाठी द्यावा. तत्काळ आम्ही हा कारखाना सुरू करून तालुक्यातील कमलाभवानी व आदिनाथ दोन्ही कारखाने चांगले चालवून चांगला भाव देऊ.
- विक्रमसिंह शिंदे, अध्यक्ष, कमलाभवानी रिफाइन्ड शुगर, करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.