सोलापूर : मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला असून सोलापूर शहराला पाणी पुरवणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणी देखील कमी झाले आहे. शेतीसाठी कॅनॉलमधून आवर्तन सोडले आहे. आता कार्तिकी वारीसाठी भीमा नदीतून दीड टीएमसी पाणी सोडले असून मंगळवारी ते पाणी बंद केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरण यंदा फेब्रुवारीतच उणे २० टक्के होईल, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर, नगर व पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनीत यंदा पावसाळ्यात ६६ टक्केच पाणी जमा झाले. आता जानेवारीत शेतीसाठी आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे. तत्पूर्वी, १ डिसेंबरपासून भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाईल. उजनीचा बॅक वॉटर परिसर, नगरपरिषदा, गावच्या पाणी पुरवठा योजना, एमआयडीसींचा पाणीपुरवठा देखील उजनीवरच अवलंबून आहे.
सध्या उजनीत ४२ टक्के (२२ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातील एकूण साठा ८६ टीएमसी आहे. मागील वर्षी उजनी धरण मे महिन्यात तर २०२१ मध्ये धरण जूनमध्ये उणे (मायनस) झाले होते. यावर्षी मात्र धरण फेब्रुवारीतच मायनस होणार असल्याने मार्चनंतर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. मार्चनंतर पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी शेतीसाठी नसणार आहे.
सोलापूरसाठी तीनवेळा नदीतून पाणी
सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून वर्षाला एक टीएमसीपर्यंत पाणी उपसा होतो. पण, औज बंधाऱ्यात पाणी सोडताना प्रत्येकवेळी किमान सहा टीएमसी पाणी लागते. यंदा पाऊस कमी पडल्याने उजनीतून सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यात किमान तीनवेळा पाणी सोडावे लागणार आहे. त्यासाठी २० टीएमसी पाणी जाईल, असेही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पावसाळा सुरु होईपर्यंत धरण ६० टक्के मायनस होईल. त्यामुळे दुबार, प्रसंगी तिबार पंपिंग देखील करण्याची वेळ महापालिकेवर येवू शकते, असाही अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.