सोलापूर : सध्या शहराच्या गावठाण भागात तीन तर जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागाला चार-पाच दिवसाआड पाणी मिळते. सोलापूर शहराच्या गावठाण भागात पाणी चोरी व गळती अधिक असल्याने पाणी पुरवठ्याच्या पाइपलाइनवर नऊ वॉटर फ्लो मीटर बसविण्यात आले आहेत. त्याचे काम पूर्ण झाल्याने बुधवारपासून (ता. ८) गावठाण भागाला पूर्वीप्रमाणे तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे.
सोलापूर शहराला दररोज १८९ एमएलडी पाण्याची गरज असतानाही गळती व पाणी चोरीमुळे नागरिकांना १२३ एमएलडीपर्यंतच पाणी मिळते. दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित असतानाही तीन-चार दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, हे विशेष. शहराचा पाणी पुरवठा सुधारण्यासाठी गळती व चोरी रोखणे जरुरी मानून स्मार्ट सिटीतून वॉटर फ्लो मीटर बसविण्यासाठी ६० कोटींचा निधी दिला आहे.
पहिल्या दोन टप्प्यात ते मीटर बसवले जात आहेत. तत्पूर्वी, २००४ पासून नळ कनेक्शनधारकांना मीटर बसवणे बंधनकारक करून महापालिकेने प्रत्येकी ११०० रुपये भरून घेतले. सध्या साडेसहा कोटी रुपये महापालिकेकडे जमा आहेत.
त्यानंतर ज्यांनी अकराशे रुपये भरले नाहीत, त्या नळ कनेक्शनधारकांना स्वत:हून वॉटर मीटर बसवावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिका आता निविदा प्रक्रिया राबवत आहे.
प्रत्येकास मक्तेदार मीटर बसवून देईल, पण त्याचे पैसे त्या कुटुंबाला भरावे लागतील. तसेच पूर्वी अकराशे रुपये भरलेल्यांना मीटर बसविण्यासाठी जेवढा खर्च होईल, तो फरक द्यावा लागेल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
पाणी गळती व चोरी समजणार
सोलापूर शहरातील पाण्याची गळती व चोरी रोखण्यावर पहिला भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर गावठाण परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाइनवर नऊ ठिकाणी ‘स्काडा’तून फ्लो मीटर बसवले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता ८ मार्चपासून ‘गावठाण’चा पाणी पुरवठा तीन दिवसाआड पूर्ववत होईल.
- व्यंकटेश चौबे, सहायक अभियंता, जलवितरण, सोलापूर महापालिका
‘स्काडा’चे वॉटर फ्लो मीटर म्हणजे काय?
समांतर जलवाहिनी १६ महिन्यांत पूर्ण व्हावी म्हणून डिसेंबर २०२२ मध्ये कोल्हापूरच्या मक्तेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली. पण, पहिल्या मक्तेदाराने लवादाकडे धाव घेतल्याने काम अजूनही सुरु होऊ शकलेले नाही.
तत्पूर्वी, शहराची वितरण व्यवस्था सुधारण्याचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ‘स्काडा’ प्रणालीतून ‘गावठाण’ (जुने शहर) परिसरातील पाणी पुरवठ्याच्या लाईनला नऊ ठिकाणी वॉटर फ्लो मीटर बसवले आहेत.
त्यामुळे सोडलेले पाणी आणि नागरिकांना मिळालेले पाणी, यातील तफावत समजणार आहे. पाण्यात तफावत असल्यास नेमके पाणी गळती किंवा चोरी कोठे होते, हे समजेल. दुसऱ्या टप्प्यात उजनी, हिप्परगा, सोरेगाव या जलस्त्रोताच्या ठिकाणी देखील फ्लो मीटर बसवले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.