सोलापूर : तासिका तत्त्वावर (सीएचबी) सोलापूरला वेळ देणाऱ्या पार्टटाईम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला मतदारसंघ सांभाळण्यासाठी सोलापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचाच प्रकार केला आहे. पालकत्वाची त्यांची भूमिकाच मुळी आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आज शनिवारी (ता. 1 मे) महाराष्ट्र दिनानिमित्त ते ध्वजारोहणासाठी येत आहेत. या वेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. सोलापूरला "बाप'च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता तरी या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेजारधर्म म्हणून आम्ही पाणी दिलेही असते; परंतु आमचीलाच साधी साडी नसताना शेजारणीला शालू देण्याचा प्रकार का करावा? मुळात मराठवाडा, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यांना अजूनही नियोजनानुसार उजनीचे पाणी मिळालेले नाही. मग उजनीत कितीही साठा असताना हळूच त्यात डल्ला मारण्याचा प्रकार आम्ही कसा सहन करावा, हा प्रश्न आहे. पाण्याचे आधीच न्याय वाटप असताना ही पळवापळवी का?
उजनीतून एक थेंबही पाणी उचलणार नसल्याचे राणा भीमदेवी थाटात वल्गना करणाऱ्या श्री. भरणेंनी इंदापूरसाठी उजनीतून सांडपाण्याचा बहाणा करीत पाच टीएमसी पाण्याची व्यवस्था मार्गी लावली आहे. निदान उजनीत पुणे जिल्ह्यातून पाच टीएमसी सांडपाणी येते का, याचा आकडेवारीसह खुलासा करावा. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आदेशावर सहीदेखील केल्याचे श्री. भरणे यांनी इंदापूरच्या पत्रकारांना सांगितले आहे. विशेष म्हणजे उजनीतील पाण्याचे आधीच वाटप पूर्ण झालेले असताना असे पाणी उचलता कसे येऊ शकते, हा संशोधनाचाच मुद्दा आहे. इंदापूरला पाणी देण्यास विरोध नाही, पण खडकवासला व नीरा डावा कालव्यातून या भागाला पाणी मिळत असताना हा खटाटोप कशासाठी? उजनीचे आठमाहीचे बारमाही धोरण केलेले असतानाही टेल - एंडला आजही पाणी मिळत नाही. मग पाणी मिळणाऱ्यांना पुन्हा पाणी देण्याचा हा कोणता सामाजिक न्याय?
एका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर श्री. भरणे यांना पाण्याचे महत्त्व समजले. सोलापूरचा पालकमंत्री होण्यापूर्वीच श्री. भरणे यांनी उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्धार केला होता. या योजनेच्या मंजुरीनंतर केलेल्या भाषणात "ये तो अभी ट्रेलर है...' असा गर्भित इशाराही दिल्याने पुढचा पिक्चर काय असेल, याचा विचार होणे गरजेचे आहे. इंदापूरसाठी आपण हिरो तर सोलापूरसाठी व्हिलन झाल्याचेही स्पष्ट केले आहे. या योजनेच्या मंजुरीबरोबर शासनाने संबंधित यंत्रणांना ही योजना "फिजिबल' होण्याच्या दृष्टीनेच आदेश दिले आहेत. उजनीच्या पाण्याबरोबरच उर्वरित कामांसाठी सोलापूरच्या लोकप्रतिनिधींबरोबर जनतेच्या मनातूनच याबाबत रोष कसा निर्माण होत नाही? प्रत्येकवेळेस ताकदवान सत्ताधीशांनी आपापल्या भागाला उजनीचे पाणी पळविण्याचा उद्योग केला.
सोलापूर जिल्ह्यात पाटबंधारे तसेच उजनीसंदर्भात अभ्यास असलेले वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेल्या सरकारी बाबूंकडे या योजनेबाबत विचारणा केली असता आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अभियंत्यांचे श्रद्धास्थान असलेले सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया पुण्यात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना कालव्यावरील गैरव्यवस्था पाहून वृत्तपत्रात जाहिरात देऊन बागायतदारांची प्रगट सभा फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्यपूर्व काळात बोलविण्याचे धाडस दाखविले. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आजचे अभियंते लोकशाही राज्यातही धाडस दाखवतील का, हा प्रश्न अद्यापतरी अनुत्तरीत आहे.
केवळ निवडणुकीपुरता वापर
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनीकडे जिल्ह्यातील कोणत्या लोकप्रतिनिधीने गांभिर्याने लक्ष दिले, असा प्रश्न निर्माण होतो. श्री. भरणे हा प्रस्ताव तयार करताना जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीच्या कानावर ही बाब गेली कशी नसेल? सारेच मूग गिळून गप्प कसे बसले? इतके होईपर्यंत हे सारे अंधारात होते का? उजनीतील जलसाठा, नियोजन, सांडपाण्यातून होणारे प्रदूषण, जलजैवविविधता, गाळ, पाणी वाटप या संदर्भात एकाही लोकप्रतिनिधीने आजपर्यंत काय हालचाल केली? आपल्या भागापुरता पाण्याचा वापर, हाच एकमेव अजेंडा दिसला. बार्शी व मंगळवेढ्यासाठी प्रत्येक निवडणुकीत याचा प्रचारापुरता वापर होत असल्याचे दिसून आले. राज्याचे जलनियामक प्राधिकरणाने उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याच्या योजनेत लक्ष घालून डोळेझाक केली आहे का? समन्यायी पाणी वाटप धोरण आता बासनात गुंडाळून ठेवले का? याचे प्राधिकरण स्वतःहून दखल घेणार की नाही?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.