स्मृती जपताना! वडिलांनी काम केलेल्या महापालिका शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना वडिलांच्या मृत्यूनंतर 5 उच्चशिक्षित मुलींकडून दरमहा मदतीचा हात

रडायचे नाही, लढायचे ही वडिलांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून उच्चशिक्षित पाचही मुलींनी त्यांच्याच शिकवणुकीवर वाटचाल सुरू ठेवली. वडिलांचे निधन १५ तारखेला झाल्याने दर महिन्याच्या १५ तारखेला महापालिकेच्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मुलींनी वडिलांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे.
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रूजू झालेले लक्ष्मण विठ्ठल पाटील हे पुढे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखही झाले. सेवानिवृत्तीनंतर वयाच्या ६८ व्या वर्षी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले व पाचही मुलींच्या डोक्यावरील पितृछाया हरपली. पण, रडायचे नाही, लढायचे ही वडिलांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून उच्चशिक्षित पाचही मुलींनी त्यांच्याच शिकवणुकीवर वाटचाल सुरू ठेवली. वडिलांचे निधन १५ तारखेला झाल्याने दर महिन्याच्या १५ तारखेला महापालिकेच्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मुलींनी वडिलांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे.

लक्ष्मण पाटील यांचे मूळगाव जामगाव (ता. मोहोळ) असून सुरवातीला यवतमाळ येथील नवोदय विद्यालयात ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांनी प्राधापक म्हणून नोकरी केली. पण, घरापासून दूर अंतरावरील नोकरी सोडून त्यांनी पुन्हा सोलापूर महापालिकेच्या सुंदराबाई डागा शाळेतील नोकरी निवडली. त्याचवेळी त्यांनी आपल्या स्वत:च्या पाच मुलींनाही त्यांच्या पसंतीने शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य दिले.

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त लक्ष्मण पाटील यांचा विश्वास सार्थ ठरवून मनीषा, उषा, शिल्पा, स्वाती व आरती या पाचही मुलींनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला. ३३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर लक्ष्मण पाटील यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पाचही मुलींनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वडिलांचे निधन ज्या तारखेला झाले त्या तारखेला त्यांनी आतापर्यंत महापालिकेच्या ११ शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

वर्षाश्राद्धाला गरजूंना स्टडी टेबल

वडिलांनी ज्या शाळेत करिअरला सुरवात केली, त्या महापालिकेच्या सुंदराबाई डागा शाळेतील विद्यार्थ्यांना वडिलांच्या वर्षश्राद्धादिवशी स्डटी टेबल देण्याचे नियोजन केले आहे. संगमेश्वर महाविद्यालयात पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रा. स्वाती पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. कायमस्वरूपी वडिलांच्या विचारांचा वारसा जतन करीत गरजूंना मदत करण्याचा मानस लक्ष्मण पाटील यांच्या पाचही मुलींचा आहे.

वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्य

वडिलांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सेवा काळात गरजूंना मदत केली. समाजात मुलगा हाच वंशाचा दिवा मानला जात असताना त्यांनी पाच मुली असतानाही नेहमीच मुलांप्रमाणे स्वातंत्र्य देऊन उच्चशिक्षणासाठी आम्हाला प्रोत्साहित केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या विचाराचे जतन आम्ही पाचही बहिणी सामाजिक उपक्रमातून करत आहोत.

- प्रा. स्वाती पाटील, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.