शिक्षकदिनी तर पुरस्कार वितरण होणार का? गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव न आल्याने २२ ऑगस्टपर्यंत वाढविली मुदत

शिक्षक दिनानिमित्त झेडपीतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचा यंदाही बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनूसार शिक्षकांनी १४ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव दिले. पण, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविले नाहीत.
schools
schoolssakal
Updated on

सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचा यंदाही बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनूसार शिक्षकांनी १४ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर केले. परंतु, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हे प्रस्ताव अद्यापपर्यंत जिल्हास्तरावर पाठविले नाहीत. पंचायत समिती स्तरावरूनच प्रस्तावांची पडताळणी करून २२ ऑगस्टपर्यंत मूल्यांकन घेऊन झेडपीत येण्याचा सांगावा गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांची केली जाणारी थट्टा याही वर्षी होण्याची दाट शक्यता आहे. मागील दोन वर्षाच्या पुरस्कारांची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण आहे परंतु, अद्यापपर्यंत घोषणा नाही. ते पुरस्कार प्रलंबित असताना शिक्षण विभागाने यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रस्तावासाठी नाहक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

मागील दोन वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मूल्यांकन तयार आहे. पुरस्कारासोबत शिक्षकांना दिले जाणारे सन्मानचिन्ह सध्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये धुळखात पडले आहे. शिक्षकांना दिले जाणारे प्रमाणपत्रही तयार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आता १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान प्रस्तावधारक शिक्षकांच्या शाळांवर प्रत्यक्ष जाऊन प्रस्तावांची पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

प्रस्तावधारक शिक्षकास प्राप्त झालेल्या गुणांचा अहवाल घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २२ ऑगस्टला प्राथमिक शिक्षण कार्यालयात स्वत: हजर राहावे, अशी सूचना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा व वितरण यंदाही ५ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

आता जबाबदारी प्रस्ताव पडताळणीची

शिक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दक्षिण सोलापूर, बार्शीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना करमाळा, करमाळ्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना बार्शी, माढ्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवेढा, माळशिरसच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना पंढरपूर, मंगळवेढ्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगोला, मोहोळच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना माढा, पंढरपूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना माळशिरस, सांगोल्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर सोलापूर, उत्तर सोलापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना अक्कलकोट व दक्षिण सोलापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना मोहोळ तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रस्तावावर होणारा शिक्षकांचा खर्च व वेळ वाचला असता

दोन वर्षांपासून रखडलेले पुरस्कार यंदा वेळेत व सुनियोजित पद्धतीने मिळतील अशी अपेक्षा होती. शिक्षकांनी दिलेले प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी वेळेत सादर करत नाहीत. यापूर्वी मूल्यांकन झालेल्या प्रस्तावांची घोषणा जिल्हा परिषद करत नाही. या पुरस्कारांची घोषणा वेळीच झाली असती तर यावर्षीच्या प्रस्तावावर होणारा शिक्षकांचा खर्च व वेळ वाचला असता. गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांची शिक्षकांबद्दल अशी तत्परता असेल तर त्यांना खरच शिक्षकांबद्दल आस्था आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

- म. ज. मोरे, राज्य कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.