सोलापूर : सासरवाडीला जाण्याच्या बहाण्याने सोलापुरात यायचा आणि जाताना घरफोडी करून निघायचा. या चोरट्याला पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. 20) ताब्यात घेतले. राजवीर सुभाष देसाई ऊर्फ नागरगोजे हे या चोरट्याचे नाव असून चोरीचे दागिने विक्रीसाठी उस्मानाबादला जाताना पोलिसांनी कोयनानगर येथील एमएसईबीच्या कार्यालयाजवळ पकडले.
हेही वाचाच....नियोजन समित्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा
मूळचा उंचगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील राजवीर सुभाष देसाई ऊर्फ नागरगोजे याची सोलापुरातील कुमठा नाका येथे सासरवाडी आहे. त्याच्या नावे सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जेलरोड, विजापूर नाका, एमआयडीसी, जोडभावी पेठ, फौजदार चावडी पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोलापुरातून चोरलेले सोने तो कोल्हापूर व उस्मानाबाद येथे विक्री करीत होता. दरम्यान, मागील महिन्यात चोरलेला मुद्देमाल परजिल्ह्यातील व्यक्तीच्या माध्यमातून उस्मानाबादला विक्रीसाठी जाणार आहे. तत्पूर्वी, तो कुमठा नाका येथे नातेवाइकांकडे पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून (एमएच13 -बीई 4080) येणार असल्याची खबर पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक खेडकर यांनी कोयनानगर येथे सापळा लावला. त्याठिकाणी राजवीर काही वेळाने पोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने सांगितलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता, 27 तोळे एक ग्रॅम सोने मिळून आले. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
हेही वाचाच...बाळासाहेब ठाकरे कृषी महाविद्यालय स्थापन्यास मान्यता द्या
हातमोजे अन् स्क्रू डायव्हरने करायचा घरफोडी
आई मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह भागवते. मात्र, राजवीरचे शिक्षण दहावी झाल्याने त्याला पाहिजे ते काम मिळणार नाही, याची जाणीव त्याला होती. मित्राकडे दुचाकी, सोने, चारचाकी आहे तर आपल्याकडे का नाही, याची खंत त्याला वाटायची. त्यातून त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलिसांनी सांगितले. सासरवाडीला जाण्याच्या निमित्ताने सोलापुरात येऊन जाताना तो किमान एक घरफोडी करून जात होता. 1 व 20 नोव्हेंबरला, 6, 8, 15 सप्टेंबरला, 30 ऑक्टोबरला त्याने शहरातील विविध भागांत घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे. घरफोडीसाठी तो स्क्रू डायव्हर आणि हातमोज्याचा वापर करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी खेडकर यांच्या पथकाचे कौतुक केले. |
|