#Specialtyofvillage कर्नाळकरांना वेड सायकलिंगचं

#Specialtyofvillage कर्नाळकरांना वेड सायकलिंगचं
Updated on

समृद्ध शेती, ऊस, हळद, द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध कर्नाळ सांगलीपासून जवळ आहे. ते राजकीय दृष्ट्या संवेदनशील. आता ते सायकलिंगच्या वेडासाठी प्रसिद्ध होऊ लागलंय. इथे पहिली सायकल मोहीम चौघांनी सुरू केली. आता दर रविवारी मोहिमा सुरू झाल्या आहेत. सायकल चालवणारांचे गावात अनेक गट आहेत. गावाला सायकलिंगचं वेडंच लागलंय.

पाच हजार आठशे लोकवस्तीचे कर्नाळ तीस-चाळीस वर्षांपूर्वी कुस्ती, कबड्डीसाठी प्रसिद्ध होते.  गणेशोत्सवातील सजीव देखाव्यांसाठी ते नावाजलेले आहे. नऊ कोटींची उलाढाल असलेली विकास सोसायटी, चार पतसंस्था, दोन पाणी संस्था, सोळाशे एकर बागायती क्षेत्र आणि त्यातून आलेली समृद्धी यामुळे गाव चांगलंच सधन. समृद्धीला जोडून आलेले आरोग्याचे प्रश्‍न चिंता करायला लावणारे. नव्या पिढीसमोर ते संकट उभं करीत आहेत. त्यातूनच प्रेरणादायी, आरोग्यवर्धक उपक्रमांचा विचार सुरू झाला. ट्रेकिंग, गडभेट, निसर्गरम्य स्थळांना भेटी असे पर्याय समोर आल्यानंतर अमोल पाटील व दौलत पाटील यांनी सायकलिंगची कल्पना मांडली.

राजू पाटील, अमोल पाटील, रोहित मोहिते, योगेश कदम सहभागी झाले. पहिली सहल सहा मे २०१८ रोजी नृसिंहवाडी, तर २५ वी ट्रीप २१ ऑक्‍टोबर २०१८ ला पन्हाळ्याला झाली. आता या गटाने सायकलिंग करीत शंभराव्या सहलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्याद्वारे भारतातील प्रत्येक प्रांत आणि भारताबाहेरही जाण्याचाही त्यांचा संकल्प आहे. 

आवडीनुसार डेस्टीनेशन ठरते. वीस, तीस तर कोणी पन्नास-शंभर किलोमीटर रपेट मारतो. पहिल्या गटाने मोहिमेचा रौप्यमहोत्सव पन्हाळ्यावर जाऊन केला.  गावांत १०० हौशी सायकलस्वार तयार झाले आहेत. सायकलिंगमुळे काहींची सततची सर्दी गेली; रक्तशर्करा नियंत्रणात आली. रक्तदाब कमी झाला. धाप नियंत्रणात आली. पचनविकार संपले.

अनावश्‍यक वाढलेले वजन घटले. हे सारे सायकलिंगने दिले, असं त्यांचं ठाम मत आहे. सायकलने एखाद्या ठिकाणी जाणे व एन्जॉय करणे एवढ्यावरच न थांबता तेथे स्वच्छता, वृक्षारोपण अशा उपक्रमांचीही जोड दिली आहे. गावातील या सर्व गटात संवाद होतो. डेस्टीनेशनची चर्चा, मार्ग याची होते. मोहिमेनंतर माहिती, अनुभव शेअर केले जाते. त्यातून पुन्हा नवे मित्र जोडले जातात. असे शंभरावर  सायकलमित्र बनलेत. त्यांचे स्वतंत्र गट आहेत. प्रत्येकजण परिसरातील दोन-पाच किलोमीटरचा परिसर सायकलनेच पालथा घालतो.

रौप्यमहोत्सव...
‘रोड स्पिन वॉरिअर’ हा एक असा गट आहे की ज्याने सायकल मोहिमेचा रौप्यमहोत्सव केला. डॉक्‍टर, शिक्षक, शेतकरी, कंत्राटदार, पैलवान, दूध व्यावसायिक, औषध विक्री प्रतिनिधी त्यात आहेत. अमोल पाटील, रावसाहेब मोहिते, राजू पाटील, दौलत पाटील, संदेश कदम, मधुकर पाटील, अनिकेत माने, अवधूत पाटील, रणजित माने.  डॉ. विजय पवार, रोहन कदम, तुषार पाटील, सूरज बल्लाळ, रोहित मोहिते, सुदर्शन पाटील, विशाल  तारळेकर यांचा त्यात समावेश आहे.  

जिना चढताना किंवा चालताना धाप लागे. रक्‍तदाबही कमी-जास्त व्हायचा. सायकलिंगने त्रास कमी तर झालाच; शिवाय व्यायाम, निसर्ग व मित्रांच्या सहवासामुळे  अधिक उत्साही बनलोय.
-दौलत पाटील,
बांधकाम व्यावसायिक

पंचवीस वर्षांपासून व्यवसाय आहे. सायकली नामशेष होतात की काय असा प्रश्‍न मध्यंतरी पडला; पण आरोग्यासाठी सायकलिंग किती चांगले आहे, हे आता नव्या-जुन्या पिढीला पुन्हा समजून आले. त्यामुळे सायकलिंग वाढत आहे. लोक आरोग्याबद्दल जागरूक झालेत. साहजिकच आमचा व्यवसायही 
पुनरुज्जीवित झाला.
- फिरोज मुलाणी,
सायकल दुकानदार

वैशिष्ट्ये

  •  २५ ते ६५ वयापर्यंतच्या अनेकांचा सहभाग
  •  गट वेगळे, आवड-निवड वेगळी, व्यवसाय निरनिरळे, पण सायकलिंगसाठी एकत्र
  •  सर्वजण साध्या सायकली वापरतात. 
  •  मधुकर पाटील (वय ६३) सर्वांत वयस्क सदस्य. त्यांचे वडील ९७ वर्षांचे. तेही ९५ व्या वर्षापर्यंत सायकल चालवत होते.       
  •  सर्व पंचवीस सहली पूर्ण करणारे राजू पाटील. सायकलिंगसाठी पाठपुरावा करण्यात आघाडीवर. सर्वांना आधार देण्यातही पुढे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.