#Specialtyofvillage ट्रॅक्‍टर चालकांचे गाव पणोरे

#Specialtyofvillage  ट्रॅक्‍टर चालकांचे गाव पणोरे
Updated on

व्यावसायिक ट्रॅक्‍टरचालकांचे गाव म्हणून पणोरेची ओळख आहे. येथे घरटी ट्रॅक्‍टरचालक आहेत. अन्य गावांत जाऊन ट्रॅक्‍टरचालक असणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. निव्वळ ट्रॅक्‍टरचालक म्हणून रोजगार करून अनेकांनी आपले संसार उभे केलेच; शिवाय ट्रॅक्‍टर किंवा गाड्या खरेदी करणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून कळे-सावर्डे पुलावरून पलीकडे गेले की म्हासुर्ली रोडवर १५ किलोमीटरवर पन्हाळा तालुक्‍याचे शेवटचे गाव लागते पणोरे. सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव. काही वर्षांपूर्वी शैक्षणिक सुविधा नसल्याने अल्पशिक्षितांची संख्या जास्त. त्यातील काही जण ट्रॅक्‍टर शिकले. आजमितीस गावात सुमारे ७० व्यावसायिक ट्रॅक्‍टरचालक आहेत. तेवढेच ट्रॅक्‍टर शिकलेले; पण बाहेर न गेलेले आहेत. त्यामुळे पणोरे गाव ट्रॅक्‍टरचालकांचे गाव म्हणून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला परिचित आहे.

साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरमालकांना ऊस तोडणे व ट्रॅक्‍टरचालकांची तजवीज पावसाळ्यातच करावी लागते. दुधाचा जोडधंदा मिळत असल्याने गावागावांत ऊस तोडप्यांच्या टोळ्या तयार होतात; पण ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमुळे पाठीचा त्रास होत असल्याने अलीकडे चालक शोधून सापडणे मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे ट्रॅक्‍टर मालक पै-पाहुण्यांकडे चालकांबाबत चौकशी करतात. अशा वेळी ‘ट्रॅक्‍टरचालक पाहिजे; मग जा पणोऱ्याला, हमखास भेटेल,’ असे आत्मविश्वासाने सांगितले जाते.

गावातील विठ्ठलाई सेवा संस्थेने सभासद शेतकऱ्यांचा गूळ व धान्य कोल्हापूरला पोचविण्यासाठी १९६२ मध्ये एक ट्रॅक्‍टर खरेदी केला होता. त्यावर बाहेरील गावातील चालक होता. त्याच्या हाताखाली क्‍लिनर म्हणून गावातील दादू सदू कांबळे होते. पुढे ते ट्रॅक्‍टर चालवायला शिकले व गावातील पहिले ट्रॅक्‍टरचालक बनले. त्यांच्या हाताखाली मारुती सुगंधा कांबळे, तुकाराम जाधव, कृष्णा परीट प्रथम क्‍लिनर असलेले नंतर चालक झाले. 

गावात १९६९ मध्ये दुसरा ट्रॅक्‍टर मारुती रामजी पाटील यांनी घेतला. त्याकाळी भागात एखाद दुसराच ट्रॅक्‍टर. त्यामुळे तरुणांना ट्रॅक्‍टर चालवण्याचे अप्रूप वाटे. यातूनच याकडे वळण्याचा तरुणांचा कल वाढला.

गावात त्याकाळी केवळ एक प्राथमिक शाळा. पुढे शिकायचे झाल्यास १५ किलोमीटरवरील कळे येथे जावे लागे. त्यामुळे पालक पोराला एखाद्या ट्रॅक्‍टरचालकाच्या हाताखाली क्‍लिनर म्हणून पाठवू लागले. जनता सरकारच्या काळात शेतमालाचे दर पडले. बेरोजगारी वाढली. या काळात तरुणांनी चालक होऊन आपले संसार टिकवले. त्यातून गावात प्रत्येक उंबऱ्यास चालक तयार झाले. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या गाडी अड्ड्यांत या गावातील चालकांची चलती होती. आता गावात अंगणवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्‍टरचालकांचे प्रमाण कमी झाले आहे.

पावसाळ्यात मालक चालकांशी बोली करून उचल देतात. त्यांना सरासरी आठ ते दहा हजार पगार मिळतो. हंगामाला सरासरी चार-पाच महिने भरतात. त्यातून प्रत्येकाला वर्षाला सरासरी ५० हजार पगार मिळतो. हंगाम संपल्यानंतर पुन्हा गावी येऊन शेती करतात. 

ट्रॅक्‍टरचालक होऊन मिळणाऱ्या पैशातून काहींनी स्वत:ची वाहने घेतली. साठवलेल्या पुंजीतून नोकरालाही मालक बनता येते, हेच या चालकांनी दाखवून दिले आहे.

चालक झाले मालक...
तुकाराम जाधव जुने चालक. त्यांची शंकर व संजय ही दोन्ही मुलेही व्यावसायिक चालक आहेत. आता त्यांचा नातू पांडुरंग हाही ट्रॅक्‍टर चालवतो. परिवाराने शेती कमी असूनही केवळ चालक होऊन ट्रॅक्‍टर घेतला आहे. याशिवाय रघुनाथ पाटील, बाळू रामा पाटील, आनंदा रामा पाटील, पिंटू पाटील, बाळू बाटे यांनी ट्रॅक्‍टरचालक होऊन स्वतःचे ट्रॅक्‍टर, रामदास कांबळे यांनी ट्रक, तेजस पाटील यांनी जीप घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.