ऊसतोड कामगाराच्या मुलाची गगनाला गवसणी! 

Story of CA lahu Kale
Story of CA lahu Kale
Updated on

सोलापूर : आईविना वाढलेल्या मुलाने कौटुंबिक स्थिती बिकट असताना परिस्थितीशी लढा दिला. वडील ऊसतोड कामगार. विपन्नावस्थेतील बालपण. पण न डगमगता तो चार्टर्ड अकाउंटंट झाला. करमाळा तालुक्‍यातील दक्षिण वडगाव येथील लहू काळे यांची ही कहाणी. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल "सकाळ'ने घेतलेला हा आढावा. 
रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये जगण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांसमवेत छोटा लहूही होता. त्याचे वडील दारू प्यायचे. तीन चुलतेही व्यसनी. सर्वांनी प्रापंचिक अडचणींचा सामना करण्यासाठी जमीन विकली. उदरनिर्वाहासाठी ते पुन्हा मोलमजुरी करू लागले. दारू पिल्यानंतर वडील आईसह संपूर्ण कुटुंबाला शिव्या देत. गोंधळ घालत. त्यालाच कंटाळून आईने एकेदिवशी स्वत:ला संपवलं. तेव्हा लहूचं वय होतं दीड वर्षाचे. 

हेही वाचा : मराठीत प्रार्थना होणारे होली इव्हॅनजोलिस्ट चर्च... 
दीड वर्षाचा असताना आईची आत्महत्या 

ते म्हणाले, ""मी व माझ्या भावाने आईचे तोंडही पाहिलेले नाही. आईच्या आत्महत्येनंतर आमचा (मी, भाऊ व बहिणी) सांभाळ बहिणीने केला. त्यासाठी मोठी बहीण गावातील एका सधन कुटुंबात धुणं-भांडी करायची. दोन्ही मोठ्या बहिणी वयाच्या आठ-नऊ वर्षांपासून मिळेल ते काम करून वडिलांसह मला सांभाळत. बहिणीचे लग्न झाल्यावर म्हणजे; मी तिसरीत असताना वडिलांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड मजूर म्हणून उचल घेतली. तेव्हा दुसरी बहीण स्वयंपाक करून कडाक्‍याच्या थंडीत पहाटे उठून उसाच्या मोळ्या बांधून त्या वाहायची. वर्षभरात तिचेही लग्न झाले.'' 
लहू काळे पाचवीत व त्यांचे बंधू सातवीत गेले. तेव्हा वडिलांनी त्यांना गावातील शारदा थोरात व विठ्ठल थोरात यांच्या ओळखीने कर्जत (जि. नगर) येथील बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी ठेवले. तेथे दिवाळी व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये त्यांनी कुल्फी विकली, कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले. 
सुटीत गावाकडे गेलं तर जेवणापासून निवासापर्यंत सगळाच प्रश्‍न असे. अनेकदा उपाशीपोटी अंथरुण-पांघरुणाविना गावातील चावडीत झोपावे लागे. पुढे वडिलांनी पोफळज येथील रामभाऊ पवार यांच्याकडे सालकरी गडी म्हणून उचल घेतली. तेथूनच त्यांच्या प्रगतीला दिशा सापडली. पवार कुटुंब प्रतिष्ठित, उदारमतवादी, उच्च विचारसरणीचे होते. काळे यांनी दहावीत मांगी येथील मुरलीधर बागल वसतिगृहात राहून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी करमाळा येथे बारावी पूर्ण केली. 

हेही वाचा : लवकरच थांबेल पुण्या-मुंबईची वारी 
कामाच्या शोधात पुण्याला 

कर्जतमधील आंबेडकर वसतिगृहातील कार्यालयातील भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेले "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' व "नाही निर्मळ मन त्याला काय करील साबण' या सुविचारांचा अर्थ शिक्षक रघुनाथ कांबळे यांनी सांगितला. त्यामुळेच त्यांनी आत्मविश्‍वासाने शिक्षण घेतले. पुढे काम करण्यासाठी व जमेल तसं शिकण्यासाठी ते व त्यांचा मित्र नीलेश गायकवाड पुण्याला गेले. दत्ता इंगळे नावाच्या मित्राबरोबर ठरवून त्यांनी "आयसीएआयएच' पुणे येथील अप्पा बळवंत चौकातील ऑफिस शोधून काढलं. सीए होण्याची संपूर्ण परीक्षा पद्धती त्यांनी समजून घेऊन सीए व्हायचं ठरवलं. त्यांनी भावाला विश्‍वासात घेऊन पैसे कसे उपलब्ध करायचे यावर चर्चा केली. कल्याण पवार यांनी त्यांना मदत केली. चुलते अशोक काळे व बंधू संदीप काळे या दोघांच्या जमिनी गहाण ठेवून शिक्षणासाठी कर्ज काढले. त्यासाठी युनियन बॅंकेचे करमाळा शाखेचे त्या-त्या वेळेचे शाखाधिकारी जेऊरकर व अशोक नेरलेकर यांनी सहकार्य केले. चुलते विष्णू काळे व रघुभाऊ काळे यांनी वेळोवेळी रोख स्वरूपात मदत केली. 

हेही वाचा : हमाल करतोय मुलीच्या स्वप्नावर सगळा पगार खर्च 
मोठ्या भावाचे पाठबळ 

बंधू लक्ष्मण काळे याची दुचाकी, बंधू लखन व कृष्णा यांनी तर सीएची दुसरी परीक्षा पास झाल्यानंतर गाडीसाठी उसने पैसे गल्ले फोडून दिले. मोठा भाऊ ज्यांच्या शेतात काम करायचा ते बाळासाहेब साने व त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांची पत्नी सुमित्रा साने यांनीसुद्धा त्यांना सहकार्य केले. काळे म्हणतात, ""मदत केलेल्या व्यक्तींचा नावासह उल्लेख करायचं कारण म्हणजे या सर्वांनी मागितलं की दिलं असं नाही झालं. त्यांनी मोठ्या भावाचा स्वभाव, त्याचे कष्ट, व्यवहार व माझा अभ्यास, मिळालेले गुण, निवडलेले शिक्षण या सर्वांचा विचार करून सहकार्य केले. 

हेही वाचा : "यांच्या'मुळेच घडली ही रत्ने 
उत्तम पाटील यांचे सहकार्य 

माझ्या दोन्ही बहिणी वेळोवेळी जमेल तेवढे पैसे द्यायच्या. एकदा तर मोठी बहीण जनाबाई लांडे-काळेने कोपीमध्ये जमिनीत खड्डा खांदून एका प्लास्टिकच्या पिशवीत वाढे विकून दाजींच्या परस्पर वाचवलेले मळकटलेल्या 50च्या नोटांचे पाच हजार रुपये दिले. पुण्याला एसटीने येताना एक निश्‍चय केला. सीए व्हायचंच. आणि जानेवारी 2012 ला सीए झालो. पुण्यामध्ये उत्तम पाटील यांनी सहकार्य केले. आता ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन पुणे व करमाळ्यात प्रॅक्‍टिस सुरू केली आहे.'' कष्टाची तयारी असेल तर गगनालाही गवसणी घालता येते, याचेच हे उदाहरण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.