'ए, तू खाली बस'! विशाल-संजय पाटील यांच्यात हमरीतुमरी; तासगावात नेमकं काय घडलं? रोहित पवारांचं नाव घेतलं अन्...

Tasgaon Municipality Politics : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत उपनगराध्यक्षांना झालेल्या मारहाणीनंतर तणाव वाढला आहे.
Vishal Patil vs Sanjay Patil
Vishal Patil vs Sanjay Patilesakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी भाजपच्या संजय पाटील यांच्यावर मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांच्यातील वाद ताणला गेला आहे.

तासगाव : लोकसभा निवडणुकीपासून एकमेकांवर शब्दबाण चालवणारे माजी खासदार संजय पाटील आणि खासदार विशाल पाटील (Vishal Patil) जाहीर व्यासपीठावर एकमेकाला भिडले. तासगाव रिंगरोड श्रेयवादावरून तासगाव नगरपालिका (Tasgaon Municipality) इमारतीच्या उद्‍घाटन समारंभात जोरदार वादावादी झाली.

विशाल पाटील यांनी भाषणातून तासगाव रिंगरोड मंजुरीचे श्रेय राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांना देण्याचा प्रयत्न करत त्यांनी संजयकाकांना डिवचले. त्याला उत्तर देताना संजय पाटील यांनी ‘सांगलीत पत्रकार परिषद घेऊन मी नौटंकी बंद करा, असा इशारा दिला होता. मात्र, विशाल तू सांगूनही सुधारत नाहीस’, असा एकेरी उल्लेख करत हल्ला चढवला.

Vishal Patil vs Sanjay Patil
Jat Politics : 'या' मुद्द्यावरून भाजपच्या दोन गटांत तुफान राडा; आमदार पडळकर, रवी पाटील समर्थक आमने-सामने

त्यानंतर एकेरी उल्लेखामुळे विशाल पाटील संतप्त झाले. त्यांनी व्यासपीठावर उभे राहात, ‘मी तुमचा सन्मान ठेवलाय, तुम्हीही ठेवा’, असे हातवारे केले. त्यातून वाद चिघळला. संजयकाका समर्थक विशाल यांच्या दिशेने धावले. त्यावेळी विशाल यांच्यासोबत मोजकेच लोक होते. विशाल यांनी तेथे थांबून आपली भूमिका मांडणे सुरू ठेवले. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत गर्दी व्यासपीठावर जाणार नाही, याची खबरदारी घेतली.

येथील नगरपालिका इमारतीचा उद्‍घाटन समारंभ काल दुपारी झाला. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुमन पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी भाजपच्या संजय पाटील यांच्यावर मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांच्यातील वाद ताणला गेला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत उपनगराध्यक्षांना झालेल्या मारहाणीनंतर तणाव वाढला आहे. त्यात विशाल पाटील यांनी थेट उडी घेतल्याने आजी-माजी खासदारांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. संजय पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर विशाल पाटील यांना इशारादेखील दिला होता. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.

Vishal Patil vs Sanjay Patil
'उत्तरे'त ठिणगी, 'दक्षिणे'त वणवा; खासदार महाडिक-क्षीरसागर यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता, काय आहे कारण?

वादाचे कारण रिंगरोड

तासगाव बाह्यवळण रस्त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सतत प्रयत्न सुरू होते. तो अखेर मंजूर झाला आहे. त्यासाठी संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर यांनी प्रयत्न केले आणि हे त्यांचे यश आहे, असे दर्शविणारे असंख्य फलक सध्या तासगाव शहरात लागलेले आहेत. नेमक्या या मुद्याला विशाल पाटील यांनी भाषणात हात घातला. ते म्हणाले, ‘तासगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाबाबत नितीन गडकरी साहेबांनी मला रोहित पाटलांसाठी एक निरोप दिलाय. ‘रोहितला सांग, मी रिंगरोडचे काम केले आहे’, असे त्यांनी सांगितले आहे. इथे कामाबाबत स्पर्धा लागली आहे ही चांगली गोष्ट आहे. भाजपचे लोक राष्ट्रवादी, काँग्रेसच्या लोकांचा आग्रह ऐकून काम मंजूर करताहेत, आम्हीदेखील त्यांची परतफेड करू.’

विशाल पाटील यांनी रिंगरोडचे श्रेय अप्रत्यक्षपणे रोहित पाटील यांना देत संजय पाटील यांना डिवचले गेले. त्यांचा पारा चढला व ते बोलायला उभे राहिले आणि भाषणाचे सगळे संकेत बाजूला ठेवून त्यांनी थेट विशाल पाटलांवर तोफ डागली. ते म्हणाले, ‘विशाल काल खासदार झालाय तुम्ही. गडकरी साहेब आणि माझे संबंध सगळ्या दुनियेला माहीत आहेत. रस्ता मंजूर करण्यापासून सगळे मी केले आहे.’ त्यावेळी कार्यकर्त्यामधून घोषणाबाजी सुरू झाली. विशाल यांच्यावर टोकदार शेरेबाजी करत कार्यकर्ते आक्रमक झाले. ‘कुणाची सुपारी घेऊन आला आहात काय?’, असे थेट आरोप करत कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने धावले. त्यावर उठून खासदार विशाल पाटील यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर संजयकाकांनी ‘ए, तू खाली बस’, असा पुन्हा एकेरी उल्लेख केला.

त्यानंतर कार्यकर्ते पुढे सरसावले. व्यासपीठावर बाचाबाची सुरू झाली आणि एकच गोंधळ उडाला. काहीजण खासदार पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. तोवर काही कार्यकर्ते थेट व्यासपीठावर धावले. कार्यकर्ते आणि विशाल पाटील यांच्यात अग्निशामक दलाचे जवान उभे राहिले. त्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना अडविले. मोजके पोलिस हजर होते. त्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले. खासदार विशाल पाटील आपल्या जागी बसल्यानंतर गोंधळ कमी झाला. संजय पाटील यांनी आपले भाषण पूर्ण केले. पालकमंत्री खाडे यांनी शेवटी भाषण केले.

Vishal Patil vs Sanjay Patil
तासगावात खडाजंगी! खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले संजयकाका समर्थक; दोन्ही नेत्यांत जोरदार वादावादी

पोलिस निवांत कसे?

विशाल पाटील, संजय पाटील एका व्यासपीठावर येणार, तणाव वाढणार, काहीतरी घडणार, याची सगळ्या तालुक्यांत चर्चा होती. पोलिस यंत्रणा मात्र बेसावध होती. कार्यकर्ते व्यासपीठाकडे धावून गेले, तरी पोलिस तेथे हजर नव्हते. पालिकेचे खाकी गणवेशातील अग्निशमन विभागाचे जवान पुढे आले. अन्यथा, अनर्थ घडला असता.

मध्यस्थीनंतर शांतता

विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यातील वाद वाढत असताना व्यासपीठावरच ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, माणिक जाधव आदी मंडळींनी पुढाकार घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही ‘तुम्ही एकमेकांचे नाव घेऊ नका’ अशी विनंती त्यांनी दोन्ही नेत्यांना केली. त्यानंतर दोन्ही नेते शांत झाले, मात्र कार्यकर्त्यांतील वाद धुमसत राहिला.

Vishal Patil vs Sanjay Patil
'शेतकऱ्यांना गत हंगामातील 200 रुपये द्या, अन्यथा आमच्या हातात उसाचा बुडखा आहेच'; कारखानदारांना शेट्टींचा सज्जड दम

गडकरीसाहेबांनी मला जे सांगितले, ते मी व्यासपीठावर बोललो. भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या आग्रहाखातर निधी देत असतील, तर आनंददायी आहे. आम्हीदेखील त्याची परतफेड करू, असे मी म्हटले. त्यात कुणाचे श्रेय कमी करण्याचा प्रश्नच नव्हता.

- विशाल पाटील, खासदार

तासगाव रिंगरोडच्या बाबतीत आम्ही गेली दहा वर्षे पाठपुरावा करून रिंगरोडचे काम केले. १७३ कोटींचा निधी उपलब्ध करून आणला. परंतु, काही लोक विकासावर न बोलता श्रेय घेण्यासाठी चमकोगिरी व नौटंकी करत आहेत. गडकरीसाहेबांचे नाव घेऊन खोटी व बदनामीकारक वक्तव्ये केली आहेत. त्याबाबत उपस्थितांनी जाब विचारला. त्यातून गोंधळ निर्माण झाला. मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आजवर आम्ही संयम दाखवला, मात्र आता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागली आहे.’

- संजय पाटील, माजी खासदार

Vishal Patil vs Sanjay Patil
महाराष्ट्र, कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या 'या' जनावर बाजारात तब्बल 3 कोटींची उलाढाल; 9 लाखांची बैलजोडी ठरली लक्षवेधी

खासदार विशाल पाटील यांनी गडकरीसाहेबांचा निरोप व्यासपीठावर सांगितला. त्यावर श्रेयासाठी हपापलेल्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मोंगलाई लागून गेलेली नाही, हे आम्ही येत्या काळात दाखवून देऊ.

- रोहित पाटील, युवा नेते, राष्ट्रवादी

गडकरी काय म्हणाले होते...

विट्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते, की ‘तासगाव बाह्य वळणाची मागणी बऱ्याच दिवसांपासून होती. तेथील स्थानिक आमदार बराच वेळ माझ्याकडे आले होते. त्यांच्या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मंजुरी दिली आहे. १७३ कोटींचे काम लवकरच सुरू होईल. भूसंपादन सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांनी लवकर सहकार्य केले तर ते काम लवकर होईल.’ या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.