मांगले : राज्य, राष्ट्रीय पुरस्कार (national award) मिळालेल्या ‘तेंडल्या’ चित्रपटातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडले होते; आता महापुराच्या (sangli flood) पाण्यात करार शेतीत गुंतवणूक केलेले सुमारे साडेतीन लाख रुपये वाहून गेल्याने उरलासुरली आशाही भुईसपाट झाली आहे. कोरोना (covid -19) कालावधी संपेपर्यंत चित्रपटासाठी घेतलेल्या कर्जाऊ रक्कमेच्या किमान व्याजाची रक्कम तरी भरायची, यासाठी घाम गाळणारी ‘टीम तेंडल्या‘ (tendalya team) आता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन हातभार लावण्याची याचना करीत आहे.
चित्रपट निर्माते सचिन जाधव आणि त्यांच्या टीमने ‘तेंडल्या’ चित्रपटाने राज्य, राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. २४ एप्रिल २०२० ला सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्याचवेळी कोरोना महामारीचे संकट जगावर पसरले. करार शेती घेवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून चित्रपट निर्मितीसाठी घेतलेल्या १ कोटी ७० लाख रुपयांच्या उसनवार आणि कर्जावू रक्कमेचे हप्ते भरण्याचे स्वप्न बाळगले होते. यासाठी वाळवा तालुक्यातील या आठ तरुणांनी शिराळा येथील डॉ. अजित सुरले-पाटील यांची साडेपाच एकर शेती कराराने घेतली. झिरो बजेट आणि तत्काळ पैसे देणारी भाजी ते पिकवू लागले.
उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर, गवार, भेंडी, पावटा, वांगी, टोमॅटो अशी पिके घेतली. कोरोना काळात संचारबंदीतही सर्वजण फिरून शेतातील भाजीपाला गावागावांत जाऊन ते विक्री करीत होते. त्यानंतर पावसाळ्याच्या आगोदर २ एकर सोयाबीन, २० गुंठे उडीद, २० गुंठे भुईमुग, तीस गुंठे दोडका, कार्ले प्लॉट, स्वीट कॉर्न मका, पावटा, भेंडीचा १ एकर प्लॉट घेतला होता. मात्र पावसामुळे सर्व पिके कुजून गेली, काही वाहून गेली आहेत. पुरात पॉवर ट्रेलरचेही नुकसान झाले, पाईपलाईनही वाहून गेली आहे. यात साडेतीन लाखांच्यावर नुकसान झाले आहे.
‘मदत' परत करण्यासही बांधिल
चित्रपट निर्माते सचिन जाधव म्हणाले, ‘कोरोना संकटामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही, त्यामुळे आर्थिक संकटात आम्ही सापडलो. चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यामुळे आमच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र कोरोनामुळे दैव फिरले. सुटाबुटात दिसणारी आमची टीम करार शेतीत चड्डी, बनियन घालून राबू लागली. मात्र आमची चाललेली धडपड पुराच्या पाण्यातून वाहून गेली. आम्ही खचून गेलो असलो तरी हिंमत हरलेलो नाही. दानशूर व्यक्तींनी पुढे येवून आमच्या टीमला आर्थिक संकटातून बाहेर काढल्यास पुन्हा उभे राहू. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिलेली मदत परत करण्यास आमची टीम बांधिल राहील.‘
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.