कोल्हापूर : यांचं नाव खुदबुद्दीन गोलंदाज, वय ५५. राहणार बागल चौक कब्रस्तानाच्या जवळ. काम कब्रस्तानात मृतदेह दफन करण्यासाठी खड्डे काढणे. गेली ३५ वर्षं हेच काम. त्यामुळे निम्म्याहून अधिक आयुष्य कब्रस्तानातच. हे दुसरे सुरेश कुरणे. वय ४०. राहणार कब्रस्तानच्या जवळ. यांचेही काम कब्रस्तानात खड्डे काढणे. गेली १५ वर्षं हेच काम करतात. कब्रस्तानात पस्तीस पावसाळे काढलेल्या खुदबुद्दीनचाचाला मदत करतात.
या दोघांना बरेच जण विचारतात, कुठे काम करता? ‘कब्रस्तानात,’म्हणून हे सांगतात. विचारणारे त्यांना खालून वर पाहतात. तीस-पस्तीस वर्षे कब्रस्तानात हे कसे राहतात? खड्डे कसे काढतात? खड्ड्यात मृतदेह दफन करतात? असे प्रश्न विचारतात. काही जण यांच्या हातात हात द्यायलाही दचकतात. हातात हात देऊ की नको, देऊ की नको, असे मनाशीच म्हणत लगेच सटकतात.
आता हे सारे या दोघांना सवयीचे झाले आहे, कारण कब्रस्तानची त्यांची साथ रोजचीच आहे. इतरांच्या वाट्याला कब्रस्तान मृत्यूनंतर येते, पण यांच्या वाट्याला मात्र ते रोजचेच झाले आहे.
जगण्यासाठी लोक काही ना काही काम करतच असतात; पण कब्रस्तानात खड्डे काढण्याचे काम जे क्वचित कोणी करतात, त्यात खुदबुद्दीनचाचा हा एक वेगळा माणूस आहे. पस्तीस वर्षे ते हे काम करत आहेत. आजवर किती कबरीची खुदाई केली असे विचारलं तर महिन्याला तीस-पस्तीस तर ३५ वर्षाला किती खड्डे काढले असतील याचा हिशोब तुम्हीच करा, असे उत्तर देतात.
कब्रस्तान रो़जच्या सवयीचे
बागल चौकातले कबरस्थान आज वाढत्या वस्तीमुळे मध्यवर्ती ठिकाणी आल्यासारखी परिस्थिती आहे. पण ३५ वर्षांपूर्वी हे कबरस्तान म्हणजे खरोखरच ‘कब्रस्तान‘ होते. लिंबाच्या झाडांनी वेढलेले होते. सगळीकडे खुरटी झाडे झुडपे होती. मधूनच एक नाला वाहत होता. पाय टाकेल येथे एक कबर होती. त्यामुळे जेथे जागा मिळेल तेथे खड्डा काढावा लागत होता. खड्डा किती? तर, सहा फूट लांब, अडीच फूट रुंद ,आणि चार फूट खोल. खुदबुद्दीन चाच्यांच्यामध्ये माणसाची जागा एवढीच. कोणीही छोटा मोठा असू दे, एवढ्यात जागेतच त्याची विश्रांती. त्यामुळे येथे येथे माणूस तर गाडला जातोच पण मी मोठा, तू छोटा हा भ्रमही यासोबत गाढला जातो.
पावसाळ्यात खड्डा काढताना कसरत....
एका मृतदेहासाठी खड्डा काढण्यास तीन तासाचा तरी वेळ लागतो. पावसाळ्यात चिखल असतो. त्यामुळे खड्डा काढताना जोरदार पावसातही घाम फुटतो. पूर्वी रात्री दफनविधीसाठी मृतदेह आला तर गॅस बत्तीच्या उजेडात खड्डा काढावा लागे. आता चांगली सोय झाली आहे. आता खुदबुद्दीनचाचा व सुरेश करणे तीन खड्डे काढून ठेवतात. सकाळी सूर्य डोक्यावर येण्यापूर्वीच शक्यतो हे काम करतात. खड्डा काढताना त्या ठिकाणी पूर्वी दफन केलेल्या मृतदेहाची हाडे वर येतात ती पुन्हा त्याच मातीत ते पुरतात. खड्ड्यात मृतदेह पुरला की त्यावर आयताकृती मातीचा ढिग करतात.
कृतज्ञतापूर्वक दखल घेण्याची गरज
नातेवाईक त्यावर फुले वाहतात. अनेक नातेवाईक अंत्यविधी नंतर दोन-तीन महिने झाले असले तरीही कबरस्थानात अधून-मधून येतात. अंत्यविधी झालेल्या ठिकाणी शांत बसतात. फुले वाहतात. आणि निघून जातात. खुदबुद्दीन व सुरेश यांचेही काम जगावेगळे आहे पण समाजाला आवश्यक असेच आहे. कोणालातरी हे करावेच लागणार आहे. पण हे काम कसे असते हे करणाऱ्यालाच माहित आहे. त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी अशा कबरस्तान आतल्या माणसांची कृतज्ञतापूर्वक दखल घेण्याची खरोखरच गरज आहे.
समाजाची सोय चांगली....
आम्ही या दोघांची चांगली दखल घेतो. आता त्यांना खोदाईसाठी गम बूट, हॅंडग्लोज दिले आहेत. रमजान महिन्यात वेगळी भेट देतो. अशा माणसांमुळेच फार मोठी समाजाची सोय होते याची आम्हाला चांगली जाणीव आहे.
- गणी आजरेकर, चेअरमन, मुस्लिम बोर्डिंग.
सेवा म्हणून हे काम करतो
मी ३५ वर्षे कब्रस्तानात आहे. हे काम कोणाला तरी करावे लागले असते, ते माझ्या वाट्याला आले आहे. मी एक सेवा म्हणून हे काम करतो. यानिमित्ताने मी एकच शिकलो, की या जगात सारे एकसमान आहेत. कोणीही मी मोठा या मस्तीत कधी वावरू नये, कारण सहा बाय अडीचच्या काळ्या मातीच्या खड्ड्यातच प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट आहे.
- खुदबुद्दीन गोलंदाज, कब्रस्तान कर्मचारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.