Sangli : ड्रेनेज-गढूळ पाण्यावरून जुंपली

महापालिका महासभेत साडेसात तास गोंधळातच चर्चा
sangli
sanglisakal
Updated on

सांगली : ड्रेनेज व गढूळ पाणीपुरवठ्यावरून आज महासभेत सर्वपक्षीय सदस्य व प्रशासनात अक्षरशः जुंपली. सुमारे साडेसात तास सदस्य तावातावाने भांडत होते. कामे होत नाहीत, निधी नाही, फायलींची अडवणूक होते, ठराव घुसडले जातात अशा एक ना अनेक तक्रारी. त्यामुळे कोणता सदस्य कोणाविरुद्ध भांडतोय हेच कळत नव्हते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही सभा ‘एक ज’ अन्वये दाखल ठरावांबाबतच्या चर्चेपर्यंत आलीच नाही. शेवटी सभा तहकूब ठेवून येत्या २७ ऑक्टोबरला पुन्हा सभा होणार आहे.

आभाळच फाटलंय!

रोहिणी पाटील यांनी सभेची सुरवातच गढूळ पाण्याच्या तक्रारीने केली. त्यानंतर या विषयावर बहुतेक सर्वांनी री ओढली. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील पाटील, आयुक्त सुनील पवार यांनी सध्याची स्थिती रसायनांचा तुटवडा व नदीला आलेल्या गढूळ पाण्यामुळे उद्‍भवल्याचे सांगत दिवाळीत स्वच्छच पाण्याचा पुरवठा होईल, अशी हमी दिली. तुरटी व रसायनांचा पुरवठा थांबवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा आग्रह सदस्यांनी धरला. यावेळी झालेल्या चर्चेत तीनही शहरांच्या पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असून याबाबत दूरगामी धोरण ठरवले पाहिजे, अशी अपेक्षा सदस्यांनी धरली. आयुक्तांनीही ‘आभाळच फाटलं आहे’ अशी स्थिती असल्‍याचे सांगत यावर स्वतंत्रपणे बैठक घेऊन विषय मार्गी लावू, अशी हमी दिली.

चपलाहाराचा मानकरी कोण?

मिरजेतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वसाहतीमध्ये ड्रेनेज योजनेचे पाणी शिरत असून गेली १३ वर्षे हा विषय भिजत पडला आहे. त्यामुळे नागरिक आमच्यासाठी चपलांचा हार पाठवत आहेत. तो प्रतीकात्मक चपलाहार घेऊन राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात आज महासभेत दाखल झाले. त्यामुळे महापालिका आवारात पोलिसही दाखल झाले. हा प्रश्‍न मांडण्यासाठी ते खडू-फलकही घेऊन आले होते. या विषयावरून संजय मेंढे व थोरात यांच्यात काही काळ जुंपली. त्यांनी अभियंता आप्पा हलकुडे यांना धारेवर धरले. थोरात म्हणाले, ‘‘लोक आम्हाला चपलांचा हार देत आहेत. खरे तर या हाराचे मानकरी प्रशासन आहे. महापौर, तुमच्याकडे शंभर वेळा गाऱ्हाणे मांडूनही प्रश्‍न सुटत नाही. तुम्हीही या हाराचे मानकरी आहात. महापौरांनी उद्याच या प्रश्‍नी बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक उद्या मिरजेत जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत.

महासभेतील निर्णय

  • मिरजेतील खंदकातील भाजी मंडईच्‍या रस्त्यासाठी तातडीने भूसंपादन करणार

  • महामानवांच्या पुतळ्यांच्या प्रलंबित फायलींच्या निपटाऱ्यासाठी बैठक घेणार

  • विकासकामांच्या फायली मार्गी लावण्यासाठी आयुक्तांकडून उद्यापासून मोहीम

  • कुपवाड दर्गा व अहल्यादेवी स्मारकाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी ठराव पाठवणार

  • मिरजेत शंभूसृष्टी उभारण्यासाठी बेडग रस्‍त्यावरील काच कारखान्यासमोरील जागा निश्‍चित

  • स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे जमील बागवान यांची निवड झाली.

पारदर्शकतेचा आग्रह सर्वांचाच!

महासभेतील चर्चेच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. ठरावात उपसूचना घुसडल्या जातात, हा मुद्दा वहिदा नायकवडी यांनी मांडला. त्याला शेखर इनामदार, संजय मेंढे, विष्णू माने, मनोज सरगर, मैन्नुद्दीन बागवान यांच्यासह सर्वच सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. महापौर व नगरसचिव चंद्रकांत आडके यांना सर्वांना धारेवर धरले. यापुढे महासभेला स्टेनो ठेवला पाहिजे. महासभेतच उपसूचना दिल्या पाहिजेत, असा निर्णय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.