कोल्हापूर - वर्षभरापुर्वी ज्या "मल्टिस्टेट' वरून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड वादावादी आणि चप्पलफेकीने गालबोट लागल्याने गाजली होती त्याच मुद्यावरून संघाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही गोंधळच झाला.
संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द केला पण, त्यावर विरोधकांनी प्रश्न विचारण्याचा केलेल्या प्रयत्नांची दादही न घेता सभा अवघ्या 30 मिनिटांत गुंडाळली. त्यातून सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचंड घोषणायुध्द झाले, त्यातून सभेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याही परिस्थितीत संचालक व्यासपीठावर बसून राहील्याने आणि प्रश्न मांडण्यासाठी विरोधकांना माईक न दिल्याने त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली, त्याला समर्थकांकडून त्याच पध्दतीने प्रत्युत्तर दिल्याने या गोंधळात आणखी भर पडली. पोलिसांनी हस्तेक्षेप करून विरोधकांना सभागृहाबाहेर काढल्याने तणाव निवळला.
गेल्यावर्षी मल्टिस्टेटवरून संघाच्या सभेत प्रचंड रणकंदन झाले होते. आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्य दरवाजा समर्थकांसह ताकदीने उघडून सभागृहात प्रवेश केला. त्यावेळी सभागृहात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील बसून होते. मल्टिस्टेटला विरोध करणारे आमदार समर्थकांसह आत घुसल्याने प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळाच संघ मल्टिस्टेटचा ठराव करण्यात आला. त्यानंतर चप्पल फेकाफेकी, शिवीगाळ आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे एकच गोंधळ उडाला होता.
या पार्श्वभुमीवर दोन दिवसांपुर्वीच संचालक व नेत्यांच्या बैठकीत गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या सभेत काय होणार याविषयी उत्सुकता होती. संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन सभेची दरवर्षीची वेळ बदलून ती दुपारी एक ऐवजी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली.
पावणे अकराच्या सुमारास अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्यासह सर्व संचालकांचे आगमन व्यासपीठावर झाले. बरोबर अकरा वाजता सभेला सुरूवात झाली. प्रास्ताविकात श्री. आपटे यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या भाषणाच्या शेवटी श्री. आपटे यांनी संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकचे वाचन सुरू केल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. तरीही श्री. घाणेकर एकीकडे विषय वाचत असताना सभागृहातील समर्थकांकडून "मंजूर' चा तर विरोधकांकडून "ना मंजूर' नारा दिला जात होता. त्यामुळे गोंधळ वाढला, त्यातच श्री. घाणेकर यांनी विषय वाचन केले.
आपले काहीही म्हणणे ऐकून घेत नसल्याच्या रागातून विरोधकांनी गोंधळाला सुरूवात केली. समर्थकांच्या तुलनेत विरोधक कमी होते. विरोधकांच्या गोंधळाला समर्थकांनी घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजुंनी घोषणायुध्द सुरू झाले. त्यातच संचालक रणजित पाटील यांनी आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करताच राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे काही काळ शांतता पसरली पण पुन्हा गोंधळाला सुरूवात झाली.
"गोकुळ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,' "आमचं ठरलंय, आता "गोकुळ' उरलंय' यासारख्या घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. तर "लबाड लांडग ढॉंग करतय, "गोकुळ' वाचवयाच सॉंग करतय', "महादेवराव महाडिक यांचा विजय असो' यासारख्या घोषणा देऊन समर्थकांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. बराचवेळ हे घोषणायुध्द सुरू होते. त्यात विरोधकांनी बोलण्यासाठी माईकची मागणी केली पण ती न दिल्याने पुन्हा विरोधक आक्रमक झाले. शेवटी पोलिसांनी यात हस्तक्षेप करून विरोधकांना सभागृहाबाहेर काढले. संघाच्या कार्यालयाबाहेर विरोधकांनी आपली भुमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.