जिल्हा परिषद गुंडेवाडी शाळेचा बनावट दाखला तयार केला व संबंधित व्यक्तीने शाळा सोडली असल्याचा मजकूर नमूद करून त्यावर जिल्हा परिषदेचा शिक्का मारला.
मिरज : जिल्हा परिषद शाळांच्या (Zilla Parishad Schools) बनावट दाखल्यांद्वारे जातीचे दाखले (Fake Caste Certificate) मिळवून देणाऱ्या दोघांना मिरज शहर पोलिसांनी (Miraj City Police) गजाआड केले. त्यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या १४ शाळांचे बनावट शिक्के आणि दाखले जप्त करण्यात आले आहेत. जातीचा दाखला ऑनलाईन अपलोड झाल्यानंतर तहसीलदारांनी केलेल्या पडताळणीतून ही बाब उघडकीस आली आहे.
याप्रकरणी नायब तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी संशयित राजाराम आबा गेजगे (वय ५०, सिद्धेवाडी) आणि दिनेश धोंडिराम खांडेकर (वय ३२, मालगाव) यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद शाळांचे बनावट शिक्के तयार करून बनावट कागदपत्रे करणारी टोळी गजाआड झाल्याने मिरज तहसील कार्यालयात (Miraj Tehsil Office) कारवाईने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित राजाराम गेजगे आणि दिनेश खांडेकर हे दोघे जातीचा दाखला, तसेच शाळेचा दाखला काढून देण्याचे काम करत होते. तालुक्यातील गुंडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतून एकास जातीचा दाखला काढायचा होता. यासाठी त्याला पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. संबंधिताने राजाराम गेजगे आणि खांडेकर यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनी त्यांच्याकडून काही पैसे घेऊन दाखला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर जिल्हा परिषद गुंडेवाडी शाळेचा बनावट दाखला तयार केला व संबंधित व्यक्तीने शाळा सोडली असल्याचा मजकूर नमूद करून त्यावर जिल्हा परिषदेचा शिक्का मारला. यानंतर संबंधित व्यक्तीने जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर तो अंतिम पडताळणीसाठी तहसीलदारांच्या वेबपोर्टलवर आला. यावेळी तहसीलदारांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला बनावट असल्याचे दिसून आले. अधिक चौकशीनंतर या दाखल्यावरील सही आणि शिक्काही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत तातडीने मिरज शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात संशयित राजाराम गेजगे आणि दिनेश खांडेकर अशा दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जिल्हा परिषदेचे १४ बनावट रबरी शिक्के जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित दोघांनी अशा प्रकारे बनावट दाखले आणि शिक्क्यांच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. तसेच अनेकांच्या दाखल्यांसाठी या बनावट सही-शिक्क्यांचा वापर झाल्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.