सांगली : मिरजपूर्व भागातील एरंडोली, मालगाव, मल्लेवाडी, शिपूर, आरग, बेडग, खंडेराजुरी, गुंडेवाडी गावातील ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र भीतीच्या छायेत काढली. या गावांवरून रात्री नऊ वाजता ड्रोन कॅमेरे फिरू लागले. पहाटे दोनपर्यंत कॅमेऱ्यांचे दिवे चमकत होते. आकाशातून विमान उडावे तसा आवाज येत होता. पोलिसांना कल्पना नव्हती, हे ड्रोन कुणाचे? आकाशात घिरट्या घालणारे हे संकट ग्रामस्थांमध्ये दहशत माजवत आहे. त्याच्या मुळाशी जाण्याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाळवा, पलूस तालुक्यांत गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रोनने धुमाकूळ घातला आहे. ड्रोन फिरून गेले आणि चोरी झाली, असे अनेक ठिकाणी घडले आहे. धनगाव येथे एका महिलेवर हल्ला करून घरफोडीचा प्रयत्न झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच मिरज पूर्व भागातून ड्रोन फिरू लागल्याने तरुणांनी हातात काठ्या, कुऱ्हाडी, दांडकी घेऊन रात्री पहारा दिला. एकमेकांना फोनवरून संपर्क साधत परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून हाती काही माहिती लागली नाही. साधारण पंधरा ड्रोन असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.