कोल्हापूर - प्लास्टिक विघटनाची समस्या जगाला भेडसावते आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाच्या अनेक समस्या समोर उभ्या आहेत; मात्र एकटी संस्था व महानगरपालिकेच्या पुढाकारातून खडी, डांबरासोबत रस्तेनिर्मितीत प्लास्टिकच्या वापराचा प्रयोग यशस्वी झाल्याचे चित्र पुढे येत आहे. वर्षानुवर्षे विघटन न होणाऱ्या व पर्यावरणाला हानी करणाऱ्या प्लास्टिकचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्ते तयार करण्यासाठी डांबर, खडी, सिमेंट अशा पारंपरिक घटकांचा वापर पूर्वीपासून केला जातो. पण त्यासोबतच प्लास्टिकच्या टाकाऊ कचऱ्यापासून भुकटी बनवून त्याचा वापर सध्या शहरातील रस्तेनिर्मितीसाठी होत आहे. जवळपास 7 ते 10 किलोमीटर रस्त्यांसाठी चार हजार किलो प्लास्टिकच्या भुकटीचा वापर झाला आहे. यातून प्लास्टिक कचरा निर्मूलनासोबतच कमी खर्चात मजबूत रस्तेबांधणीचा मार्ग सुकर झाला.
हेही वाचा - माजी मंत्री मल्हारगौडा पाटील यांचे निधन
एकटी संस्था ही कचरावेचक महिलांसाठी कार्य करते. संस्थेच्या 18 परिसर भगिनी जरगनगर व तपोवन या दोन प्रभागातील घरांमधून कचरा गोळा करतात. गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण अधिक असते. या प्लास्टिकचा वापर इतर कोणत्या गोष्टीसाठी होऊ शकतो का, अशी चाचपणी संस्थेतर्फे केली. प्लास्टिकचा वापर रस्तेनिर्मितीसाठी होत असल्याची माहिती मिळताच महापालिकेतर्फे शेड्रिंग मशिन संस्थेला दिले. शिरोली जकात नाक्याजवळील जागाही उपलब्ध करून दिली. दोन प्रभागातून जमा झालेले प्लास्टिक येथे आणले जाऊ लागले. संस्थेच्या महिला या मशिनद्वारे प्लास्टिकपासून भुकटी तयार करू लागल्या. दररोज 40 ते 50 किलो प्लास्टिकची भुकटी तयार होते. चार महिन्यांपासून चार हजार किलो प्लास्टिकची भुकटी तयार केली आहे.
येथील रस्त्यांसाठी वापरले प्लास्टिक
प्लास्टिक भुकटीचा वापर लक्ष्मीपुरी रोड, जरगनगर रोड, देवकर पाणंद, हरिओमनगर येथील रस्त्यांच्या निर्मितीसाठी केला गेला. संभाजीनगर येथील रस्त्याच्या पॅचवर्कसाठीही प्लास्टिक वापरले आहे.
शहरातील रस्त्यांच्या निर्मितीत वापर
महानगरपालिकेतर्फे एकटी संस्थेला शेड्रिंग मशिन दिले. या मशिनद्वारे प्लास्टिकची भुकटी तयार होते. याचा वापर शहरातील 10 ते 12 रस्त्यांच्या निर्मितीसाठी केला. हे मशिन छोटे असल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची भुकटी होऊ शकत नाही. त्यामुळे रस्तेनिर्मितीत प्लास्टिकचा वापरही कमी प्रमाणात होतो.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंताएकटी संस्थेतर्फे कार्य
एकटी संस्थेच्या कचरावेचक महिला प्लास्टिक गोळा करतात. जमा प्लास्टिकपासून भुकटी होते. ही भुकटी महानगरपालिका विकत घेते. शेड्रिंग मशिन छोटे असल्याने कमी प्रमाणात भुकटी मिळते. मोठे मशिन मिळाल्यास मोठ्या प्रमाणात भुकटी तयार करता येईल. तसेच लोकांनीही प्लास्टिक आमच्या भगिनींकडे जमा केल्यास फायदा होईल.
- अनुराधा भोसले, अध्यक्षा, एकटी संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.