उद्‌ध्वस्त संसार सावरायला धावली माणुसकी

तुपेवाडी (काढणे)
तुपेवाडी (काढणे)
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे रोजगार ठप्प असल्याने हातावर पोट असणारी अनेक कुटुंबे सध्या अडचणीत आहेत. काढणेच्या तुपेवाडीतील माटेकर कुटुंबीयांसमोर अगोदरच उपजीविकेचा प्रश्न उभा असताना शनिवारी (ता.16) दुपारी त्या परिसरात झालेल्या वादळी पावसाने त्यांच्या डोक्‍यावरील निवारा उद्‌ध्वस्त झाला. 

दोन मुले, सून, नातवंड असे माटेकर यांचे पाच जणांचे कुटुंब आहे. शेतजमीन नसल्याने त्या मोलमजुरी करतात. मोठा मुलगा गवंड्याच्या हाताखाली काम करतो, तर धाकटा मधुमेहामुळे दोन्ही पायांना जखमा झाल्याने घरीच असतो. त्या दिवशीही तो दवाखान्यातून नुकताच घरी आला होता. वादळात घराचे छप्पर उडतेय हे लक्षात आल्याबरोबर त्याने वॉकरच्या मदतीने बाहेर धाव घेतली आणि त्याच क्षणी कडकड आवाज करत घरावरील छप्पर उडून गेले. घरातील ज्वारी, गहू, तांदूळ, भुईमुगाच्या शेंगा आदी धान्य भिजून खराब झाले. कपडे, अंथरूण- पांघरूण व अन्य प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. घर उद्‌ध्वस्त झाल्याने माटेकर कुटुंबीयांनी आठ दिवसांपासून गावातीलच नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे. 

पावसाळा तोंडावर असल्याने तातडीने निवारा उभा करणे गरजेचे असले तरी लॉकडाउनमुळे दोन महिने घरीच बसून असल्याने पावसाळ्यापूर्वी घर उभे करायचे कसे, या विवंचनेत हे कुटुंबिय होते. त्यांची ही अवस्था पाहून तेथील राजेंद्र काटकर, युवराज घारे, सचिन पवार, अमृत घारे आदींनी एकत्र येऊन मदतीचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून मिळालेल्या 22 हजार 500 रुपयांच्या मदतीतून आवश्‍यक साहित्य खरेदी करून चार दिवसांत उद्‌ध्वस्त घराची दुरुस्ती करण्यात आली. आता साफसफाई आणि शिल्लक किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच माटेकर कुटुंबिय आपल्या घरी परतणार आहे. 

पावसाळ्याच्या तोंडावरच घर वादळात उद्‌ध्वस्त झाल्यानं आमच्यावर आभाळच कोसळलं होतं. पण, ही देवासारखी माणसं धावून आल्यानं आता आमची काळजीच मिटली आहे. 
-उमेश माटेकर, नुकसानग्रस्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.