Vidhan Sabha 2019 : सत्यजित पाटील - विनय कोरेंत काटा लढत

Vidhan Sabha 2019 : सत्यजित पाटील - विनय कोरेंत काटा लढत
Updated on

कोल्हापूर : शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक मैदानात कितीही उमेदवार असले तरी यावेळीही शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांच्यातच काटा लढत होणार असल्याचे चित्र आहे.

कोरे यांना गेल्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वचपा यावेळी काढायचा आहे; तर पाटील यांना विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा मतदारसंघावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करायचे आहे. त्यादृष्टीने तिसऱ्यांदा होऊ घातलेल्या या लढतीत मोठी चुरस असणार आहे. पक्षीय राजकारणापेक्षा येथे गटातटाचेच राजकारण अधिक रंगणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांनी सहाशे कोटींवर विकास निधी आणून मतदारसंघातील दोन्ही तालुक्‍यांत मोठी विकासकामे केली असल्याचा दावा केला आहे. 

विकासकामांबरोबरच त्यांनी दोन्ही तालुक्यांत जनसंपर्कही ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मतदारसंघातून अधिक मताधिक्‍य देत पुन्हा एकदा मतदारसंघातील शिवसेनेच्या भगव्याचे वर्चस्व त्यांनी सिद्ध केले. पाटील यांना शाहूवाडीतून मानसिंग गायकवाड यांची मोठी साथ आहे. पन्हाळ्यातून बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचीही साथ त्यांना मिळू शकते. शिवाय सेना-भाजप युती झाली तर आमदार पाटील यांना ती अधिकच फायद्याची ठरणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात विनय कोरे यांचा दबदबा आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक आणि बाजार समितीच्या सत्तेत त्यांचा पक्ष आहे. मात्र, गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत केवळ ३८८ मतांनी झालेला निसटता पराभव विनय कोरे यांच्या जिव्हारी लागला आहे. अतिआत्मविश्वास अंगलट आल्याचे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे. ३८८ चा हा कलंक पुसून काढण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. पन्हाळा आणि शाहूवाडीतून मोठे मताधिक्‍य मिळवण्यासाठी त्यांनी व्यूहरचना केली आहे. शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील-पेरीडकर यांची त्यांना भक्कम साथ मिळते आहे. पन्हाळ्यातून अमरसिंह पाटील यांची मदत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपशी कोरे यांचे सख्य आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील त्यांची मौनाची भूमिका विधानसभा निवडणुकीत फायद्याची की तोट्याची ठरणार, हे काळच ठरवणार आहे.

२००४ मध्ये प्रथम सत्यजित पाटील शिवसेनेचे आमदार झाले. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे आमदार झाले. त्यांनी ८३११ मतांनी सत्यजित पाटील यांचा पराभव केला. २०१४ मध्ये सत्यजित पाटील पुन्हा एकदा विजयी झाले. आता यावेळी मतदारराजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. मात्र, मतदारसंघातील स्थानिक राजकारणात काँग्रेस जनसुराज्यसोबत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत राहिली आहे. त्यामुळे गेल्या दोन वेळच्या निवडणुकांत काँग्रेसची रसद जनसुराज्यला, तर राष्ट्रवादीची रसद शिवसेनेला मिळाली. त्यामुळे मतदारसंघात आता काँग्रेस - राष्ट्रवादी नावापुरती राहिली आहे.

२००९ चे मतदान 
 विनय कोरे (जनसुराज्य) ः ७३ हजार ९१२                         
 सत्यजित पाटील (शिवसेना) ः ६५ हजार ६०१
 कर्णसिंह गायकवाड (काँग्रेस) ः ४२ हजार ५१०

२०१४ चे मतदान 
 सत्यजित पाटील (शिवसेना) ः ७४ हजार ७०२
 विनय कोरे (जनसुराज्य) ः ७४ हजार ३१४
 कर्णसिंह गायकवाड (काँग्रेस) ः २१ हजार ३००
 अमर पाटील (स्वाभिमानी) ः २७ हजार ९५३
 बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) ः ४ हजार ६७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.