Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर उत्तरमध्ये कालचे शत्रू आज झाले मित्र...

Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर उत्तरमध्ये कालचे शत्रू आज झाले मित्र...
Updated on

कोल्हापूर - ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो’ असे म्हणतात. कालपर्यंत ज्यांची मने दुखावली होती ते आता जाहीरपणे विरोधकांच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाला या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळी कलाटणी मिळाली आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे आमदार राजेश क्षीरसागर यांना महापालिकेतील ताराराणी आघाडीची साथ मिळाली आहे. 

ज्या आघाडीचा महापौरपदाचा उमेदवार उभा राहिला, की शिवसेनेचे चारही नगरसेवक तटस्थ राहून अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायचे त्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या मागे ताराराणी आघाडी उभी राहिली आहे.

काठावरच्या बहुमतामुळे भाजप ताराराणी आघाडीचा महापौर होऊ शकला नाही. खरंतर ताराराणी आघाडीने या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात उभे राहायला हवे होते. आमदार क्षीरसागर आणि नगरसेवक सत्यजित कदम यांच्यात चार वर्षात ज्या पद्धतीने टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले ते पाहता, हे दोघे एकत्रित येतील याचा अंदाज कुणी बांधला नव्हता. ताराराणी आघाडीचे नेतृत्व महाडिक गटाकडे आहे. त्यांचे राजकीय शत्रू हे आमदार सतेज पाटील आहेत. पाटील यांनी चंद्रकांत जाधव यांना भाजपच्या कोट्यातून काढून त्यांना काँग्रेसची उमेदवारी दिली.

क्षीरसागर यांना ताराराणी आघाडीने पाठिंबा दिला. सत्यजित कदम यांचे वडील माजी महापौर शिवाजीराव कदम हे कधीतरी शिवसेनेच्या व्यासपीठावर येतील याचा अंदाज आला नसेल. मात्र पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेला त्यांनी उपस्थिती लावली. जिल्हाप्रमूख विजय देवणे व माजी आमदार सुरेश साळोखे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. 

गेल्यावेळी शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढली. भाजपचे महेश जाधव आणि कॉग्रेसकडून सत्यजित कदम उमेदवार होते. युतीमुळे श्री. जाधव क्षीरसागर यांच्या प्रचारात आहेत. तर सत्यजित कदम सतेज पाटील यांच्या विरोधाला उमेदवाराला विरोध म्हणून क्षीरसागर यांच्या बाजूने उतरले आहेत. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारात पक्षाचे आजी माजी नगरसेवक सक्रीय आहेत.

जे काल परवापर्यंत आमच ठरलयं असे म्हणत होते ते आता कॉग्रेसच्या बाजूने उतरले आहेत. काही कारणाने जी माणसे दुखावली होती, दूर गेली होती. ती आता जवळची वाटू लागली आहेत. एकमेकाला पाण्यात पाहणारी मंडळी आता झाले गेले विसरून जाऊ लागली आहेत. पद मिळाली की ठराविक मंडळी आपली आणि अडचणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर अन्य मंडळीही तितकीच उपयोगी पडतात याची प्रचिती येऊ लागली आहे. 

पॅचअप करण्याचे काम सुरू
मतदानाची तारीख जशी जवळ येईल, तसे पॅचअप करण्याचे काम सुरू झाले आहे. एरवी वजाबाकीचे राजकारण करणाऱ्यांना आता बेरजेचे राजकारण महत्त्वाचे वाटू लागले आहे. नेत्यांसाठी दुसऱ्याला नेहमी पाण्यात पाहणारे, प्रसंगी हाणामारीची भाषा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता शहाणे होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.