इतिहासातील सातारा : म्‍हणून संबोधतात पानिपतकार शिंदे

Koparde Village
Koparde Village
Updated on

पुसेसावळी : खंडाळा तालुक्‍यातील कोपर्डे हे गाव इतिहासात पराक्रमाचा महामेरू ठरलेले गाव. याच गावातील शिंदे सरकार बंधूंनी पानिपत युद्धात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भीमपराक्रम गाजवला आणि गावचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर केलं. सातारा - लोणंद मार्गावरील हे छोटेस गाव आजही 250 वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार आहे. येथील वास्तू आजही आपल्या धन्याच्या पराक्रमाची साक्ष देत खंबीरपणे तग धरून उभ्या आहेत. कोपर्डे गावाची वेस भक्कम, घडीव दगडांची असून, मजबूत आणि सुंदर अशा वेशीला जोडून पूर्ण गावास तटबंदीचे काहीसे अवशेष आजही आपणास दिसतात. गावात प्रवेश करताच शिंदे सरकार घराण्यातील मातब्बर पुरुषांच्या वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहण्यास मिळतात. 

हे वाडे पानिपतच्या रणसंग्रामानंतर ज्या शिंदे मंडळींचे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य झाले, त्यातील काही शिंदे बंधू फलटणकर नाईक निंबाळकरांच्या सहकार्याने कोपर्डे येथे स्थायिक झाले. जवळपासची तेरा गावे त्यांना इनाम म्हणून मिळाली. या ठिकाणी वाडे बांधून त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. कोपर्डे गावातील शिंदे मंडळींना "पानिपतकर शिंदे' म्हणून संबोधले जाते. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे "पानिपतकर शिंदे गोट' हा त्या शिंदे मंडळींचा वस्तीचा भाग आजही आहे. 

गाव वेशीतून आत प्रवेश करताच डाव्या हातास वाड्याचा भव्य बुरूज आणि त्यास जोडणारी तटबंदी वाड्याचे आणि मालकाचे महत्त्व काय असावे हे निर्देशित करते. वाड्याच्या दरवाजावर नगारखान्याचा भाग किंचितसा दिसतो. दरवाजातून आत गेल्यावर दोन ढेलजांची जोती दिसतात. एक एकर परिसरात या वाड्याचे अवशेष आपणास दिसतात. गावात प्रवेश केल्यावर आपल्याला आणखी एका भव्य वाड्याच्या प्रवेशद्वारास जोडलेले दोन बुरूज भक्कम स्थितीत दिसतात. बुरुजांचे निम्मे बांधकाम घडीव दगडांचे असून वरील निम्मे बांधकाम रेखीव अशा भाजक्‍या विटांचे आहे. या बांधकामासाठी चुन्याचा वापर केला असून, वाड्याच्या तटबंदीच्या भिंतीत नवीन दरवाजे पाडलेले आहेत. आतील बाजूस नवीन घरे झाली आहेत. तिसरा वाड्याचा एकच बुरुज वाड्याच्या भव्यतेची साक्ष देतो. सुमारे चाळीस ते पन्नास फूट उंच असणारा वाड्याचा बुरूज पाहिल्यावर या वाड्याची भव्यता काय असावी, असा प्रश्‍न बघणाऱ्याला पडावा, असा हा बुरूज आजही गावात येणाऱ्यांना भुरळ घालतो.

शेकडो वर्षांपूर्वीची गावात सतीचे देवालय म्हणून पूर्ण दगडी वास्तू आहे. एका मातब्बर सेनानीची छत्रीही आपणास पाहावयास मिळते. या गावातील शिंदे बंधूंनी पानिपत युद्धात मोठे शौर्य गाजवले असून, आजही या गावचा राजकारणात मोठा दबदबा आहे. येथील धर्मराज शिंदे हे सातारा जिल्हा बॅंकेचे दहा वर्षे अध्यक्ष होते, तर रमेश शिंदे हे सध्या राज्य बाजार संघाचे 10 वर्षांपासून संचालक आहेत 

आवश्‍‍य वाचा संसार सार

याच परिसरात शिंदे बंधूंची आणखी काही गावे आहेत. तांबवे, सालपे या गावांतील काही ऐतिहासिक वास्तूंचे आणि वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. कोरेगाव तालुक्‍यातील आसनगाव हे या शिंदे बंधूंचे मूळ गाव असल्याचे सांगितले जाते. आसनगावची सालपाई देवी या गावच्या शिंदे मंडळींचे दैवत आहे. कोपर्डे गावातील या ऐतिहासिक वास्तू आणि गावचा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक इतिहास प्रेमींनी अभ्यासावा असाच आहे. या गावच्या शिंदे मंडळींचे नातेसंबंध महाराष्ट्रातील अनेक नामवंत सरदार घराण्याशी आहेत. फलटणकर निंबाळकर, जत उमराणीचे डफळे सरकार, तारळेकर राजेमहाडिक, राजेभोसले यांचे कोपर्डेकर शिंदे नातेवाईक आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.