Video : रणरागिणी सरसावल्या; मतदानासाठी लागल्या रांगा

Video : रणरागिणी सरसावल्या; मतदानासाठी लागल्या रांगा
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा)  : तब्बल एक वर्षापासून ताईगडेवाडी (तळमावले, ता.पाटण) येथील महिलांनी उभारलेला दारूबंदीचा लढा यशस्वी होणार की फसणार, तेथील सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी बाटली आडवी होणार की उभीच राहणार? याचा फैसला आज(बुधवारी) होणार आहे. सकाळी आठपासून येथे मतदानास प्रारंभ झाला आहे. ही प्रक्रिया सायंकाळी पाच पर्यंत सुरु राहील. 

पाटण तालुक्‍यातील शैक्षणिक आणि बाजारपेठेचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या तळमावल्यात तब्बल एक वर्षापासून दारूबंदीची चळवळ गतिमान झालेली आहे. तेथील सीताई समूहाच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी गेल्या वर्षी महिलादिनी गावातील दारू दुकानांसमोरून महिलांची फेरी काढून या लढ्याचे रणशिंग फुंकले. त्यानंतर वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दारूबंदी संदर्भातील निवेदनावरील स्वाक्षऱ्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन वेळा पडताळणी केली. पहिल्या पडताळणीवेळी निवेदनावर स्वाक्षऱ्या असलेल्या 106 पैकी 70, दुसऱ्या वेळी 213 पैकी 151 महिला उपस्थित राहिल्याने दारूबंदी अर्ध्यातच थांबली. मात्र, अलीकडे तिसऱ्यांदा झालेल्या पडताळणीवेळी 286 पैकी 178 महिलांनी हजेरी लावल्याने नियमानुसार उपस्थितीचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांवर पोचले आणि प्रत्यक्ष मतदानाचा मार्ग मोकळा झाला.

आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत ताईगडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात मतदान होणार आहे. सायंकाळी सहाला तेथेच मतमोजणी होवून तत्काळ निकाल जाहीर करण्यात येईल. या मतदानासाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येत आहे. त्या यादीत नाव असलेल्या महिलांना मतदान करता येत आहे.
यामध्ये 608 महिला मतदारांपैकी 25 मतदार मयत असल्याचे सांगण्यात आले. ताईगडेवाडीच्या हद्दीत परवानाप्राप्त दारूविक्रीची चार दुकाने व बार आहेत.

वाचा : कार्यकर्त्यांसाठी काय करायला जावे तर....

हेही वाचा : तहसीलदार कार्यालयातील लिपिक ५० हजाराच्या लाचप्रकरणी जाळ्यात

मतदानाच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आज सायंकाळी पोलिस बंदोबस्तात मतपेटी घेवून अधिकारी व कर्मचारी केंद्रावर दाखल झाले. 

मतपत्रिकेवर दुकानांची नावे 

मतपत्रिकेवर महिला मतदारांची स्वाक्षरी व अंगठा घेतला जात आहे. मतपत्रिकेवर दारू दुकानांची नावेही छापली आहेत. पत्रिकेवर उभ्या व आडव्या बाटलीचे चिन्ह आहे. त्यावर मतदार आपल्या पसंतीच्या चिन्हावर बाण फुलीचा शिक्का मारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनकर्त्या महिलांकडून घरोघरी प्रचार व जागृती मोहीम सुरू असून, ध्वनिक्षेपक लावलेली रिक्षाही फिरत हाेत्या.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.