यावर्षी कोयना धरणात १६ टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे सिंचन योजनांच्या पाण्याला दहा टक्के कपातीचा झटका बसणार आहे.
सांगली : कोयना धरणातून (Koyna Dam) सोडलेले पाणी सहा दिवस अन् सहा तासांनंतर काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदीच्या (Krishna River) सांगली हद्दीत दाखल झाले. आज (ता. ३) सकाळपर्यंत सांगली बंधाऱ्यात पाणी भरलेले दिसेल, अशी अपेक्षा आहे.
लगोलग आणखी एक टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याने ताकारी उपसा सिंचन योजनेचे (Takari Scheme) आवर्तन येत्या पाच तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे. कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी १२ वाजता पाणी सोडण्यात आले. प्रारंभी १०५० क्यूसेक आणि त्याच दिवशी रात्री २१०० क्यूसेकने पाणी विसर्ग करण्यात आले. दोन दिवसांत पाणी येणे अपेक्षित होते, मात्र नदीपात्र पूर्ण कोरडे पडले होते. त्यामुळे सहा दिवसांचा कालावधी लागला.
या घटनेतून पाटबंधारे विभाग, कोयना धरण व्यवस्थापन आणि सांगली व सातारा जिल्हा प्रशासन काही धडा घेणार आहे का, हाच कळीचा मुद्दा आहे. कृष्णा नदी पंधरा दिवसांहून अधिक कोरडी राहण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे. सांगलीत पिण्याच्या पाण्याला वास येऊ लागला, एवढी बिकट अवस्था झाली.
यावर्षी कोयना धरणात १६ टीएमसी कमी पाणी आहे. त्यामुळे सिंचन योजनांच्या पाण्याला दहा टक्के कपातीचा झटका बसणार आहे. त्यात पिण्याच्या पाण्याची कपात नसली तरी पाणी जपून वापरण्याचे आव्हान असेल. नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर यावेळी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्याबाबत काय हालचाली होतात, हे पाहावे लागेल.
पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा असेल. जलशुद्धीकरण केंद्रावर काटेकोर तपासणी करूनच शुद्ध पाणी सांगलीकरांना दिले जाईल. यंदाची परिस्थिती लक्षात घ्या. पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. पाणी गरम करून, गाळून प्या.
-राहुल रोकडे, उपायुक्त महापालिका
पाटबंधारे विभागाने सांगली, कुपवाडच्या पिण्याचे पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. पुन्हा नदी कोरडी पडली तर ते आम्ही सहन करणार नाही. सहा लाखांवर लोकांच्या जगण्याचा हा प्रश्न आहे.
-पृथ्वीराज पवार, भाजप नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.