सातारा : कोरोनाच्या महामारीला तोंड देण्याच्या लढाईत प्रशासन गुंतल्याने या वर्षी धरणांच्या पाण्याचे नियोजन झालेले नाही. सध्या जिल्ह्यातील प्रमुख पाच धरणांत केवळ 36.56 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास आगामी दीड-दोन महिन्यांत सर्वच ठिकाणी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. सध्या सिंचनासाठी तारळी, धोम, उरमोडी धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये एकूण क्षमतेनुसार 148.74 टीएमसी पाणीसाठा होतो. त्यापैकी 140.86 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी किंवा मार्च, एप्रिलमध्ये धरणांच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामध्ये शेतीसाठी, नदीपात्रातून सोडण्यासोबतच वीजगृहाला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे जून, जुलैपर्यंतचे नियोजन होते. या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनाच्या साथीने जगभर थैमान घातले. परिणामी जिल्ह्यातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्वकाही बंद राहिले तसेच प्रशासन कोरोनाविरोधातील लढाईत गुंतल्याने धरणांच्या पाण्याचे नियोजनाकडे दुर्लक्ष झाले. गेल्या वर्षी सर्वाधिक पाऊस होऊन माण, खटाव तालुक्यांतील बंधारे अगदी एप्रिल महिन्यापर्यंत पाण्याने भरलेले होते. आता मात्र पाणीटंचाईने उग्ररूप धारण करण्यास सुरवात केली आहे.
सध्या प्रमुख धरणांत जेमतेम 36.56 टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. पाऊस वेळेत सुरू झाला नाही, तर सर्वच धरणांचे तळ पाहायला मिळणार आहेत.
सध्या कोयनेतून 2100 क्युसेक पाणी वीजगृहासाठी सोडले जात आहे. धोम धरणातून वीजगृहासाठी 234, सिंचनासाठी 278, डाव्या कालव्यातून 584 असे एकूण 612 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धोम-बलकवडीतून 320 क्युसेक नदीपात्रात, तर 320 क्युसेक वीजगृहासाठी सोडण्यात येत आहे. उरमोडी धरणातून डाव्या कालव्यातून व वीजगृहासाठी चारशे क्युसेक पाणी सोडले जात आहे. तारळी धरणातून नदीपात्रात सिंचनासाठी 350 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणातून 24 क्युसेक पाणी सिंचनासाठी आवर्तनानुसार सोडले जात आहे.
धरणनिहाय पाणीपातळी मीटरमध्ये : कोयना 638, धोम 736.5, धोम-बलकवडी 782.47, कण्हेर 676.13, उरमोडी 690.03, तारळी 692.25 आहे. धरणांचा एकूण पाणीसाठा कोयना 39.5, धोम 5.78, धोम-बलकवडी 1.47, कण्हेर 3.11, उरमोडी 6.84, तारळी 2.89 असा आहे.
प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
कोयना- 34.38
धोम- 3.97
धोम-बलकवडी- 1.35
कण्हेर- 2.60
उरमोडी- 6.53
तारळी- 2.68