का राहणार उद्या देशव्यापी बंद?

Andolan
Andolan
Updated on

सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी (ता. 8) सार्वत्रिक देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम व सीटूचे जिल्हा व महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सोलापूर शहरातील 10 ठिकाणी रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

संघटनांच्या या आहेत मागण्या

  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण व जीवनावश्‍यक वस्तूंच्या सट्टा बाजारावर बंदी, पेट्रोल, डिझेलवरील राज्य व केंद्र सरकारचे कर कमी करणे यांसारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचला.
  • रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करून बेरोजगारीवर नियंत्रण आणा. ग्रामीण व शहरी भागात मागेल त्याला किमान वेतन मिळणार या कामाची हमी द्या व त्याची अंमलबजावणी करा. केंद्र व राज्य सरकारी खात्यातील 24 लाख संयुक्त पदे भरा. ही पदे भरताना विविध खात्यांत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या रोजंदारी कंत्राटी मानधनावरील व तत्सम कामगारांना कायम सेवेत सामावून घ्या.
  • कामगार कायद्यातील कामगार विरोधी मालकधार्जिणे बदल मागे घ्या. कोणताही अपवाद न करता किंवा कोणालाही सूट न देता सर्व ठिकाणी कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करा. त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई करा.
  • सर्व क्षेत्रांमधील सर्व प्रकारच्या कामगार-कष्टकऱ्यांना महागाई भत्तासह कमीतकमी 21 हजार रुपये किमान वेतन लागू करा.
  • वर्षभर चालणाऱ्या कायम कामांमध्ये कंत्राटीकरण थांबवा आणि समान काम व त्याचे त्या प्रकारचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम कामगारासारखेच वेतन व अन्य लाभ द्या.
  • सर्व योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा. सात असंघटित कामगार, शेतमजूर, गरीब शेतकरी व कष्टकरी यांना कमीत कमी दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा.
  • नवीन पेन्शन योजना रद्द करा व जुनी पेन्शन योजना लागू करा.
  • बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू होण्यासाठीच्या पात्रतेवरील कमाल मर्यादा काढून टाका.
  • ग्रॅच्युईटीच्या रकमेत वाढ करा. केंद्रीय व राज्याच्या सार्वजनिक क्षेत्र उद्योग यांमधील निर्गुंतवणूक विक्री व खासगीकरण थांबवा.
  • रेल्वे विमा व संरक्षण यासारख्या देशाच्या महत्त्वाच्या अशा क्षेत्रांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देणे बंद करा. खासगीकरण हा निर्णय रद्द करा.
  • द्विपक्षीय त्रिपक्षीय पद्धती मजबूत करा. सर्व आस्थापनांमध्ये मालकांवर कामगार संघटनांना मान्यता देणे सक्तीचे करा. कामगाराशी संबंधित कोणत्याही प्रश्‍नावर कामगार संघटनांशी चर्चा करून सहमती बनवल्याशिवाय निर्णय घेऊ नका. कामगार प्रतिनिधींशी नियमित व अर्थपूर्ण सामाजिक समाजाची निश्‍चित करा.
  • असंघटित कामगारांची नोंदणी करा. विविध घटकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा. कल्याणकारी मंडळांवर कामगारांचा सक्रिय आणि प्रभाव असला पाहिजे. इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा व कामगार कल्याणकारी मंडळाचा जमा केलेला परंतु खर्च न केलेला सेस कामगारांच्या कल्याणावरच खर्च केला जावा.

या संघटना होणार सहभागी
या संपात कामगार संघटना संयुक्त कृती समिती व असंघटित क्षेत्रातील सीटू, आयटक या संघटनांचे विडी, यंत्रमाग, बांधकाम कामगार, रेडिमेड कामगार तसेच संघटित क्षेत्रातील महसूल, सिव्हिल हॉस्पिटल, सहकार, कृषी, राज्य कामगार विमा योजना, कोशागार,भूजल सर्वेक्षण, उच्च शिक्षण समाजकल्याण, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, कोतवाल संघटना, वाहनचालक संघटना, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, भूमी अभिलेख, बॅंक, महापालिका, एलआयसी, पोस्ट, ग्रामीण डाक सेवक, औषधविक्रेता प्रतिनिधी संघटना, एमएसईबी, दूरसंचार कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स, कोतवाल, अंगणवाडी, रेल माथाडी कॉंट्रॅक्‍ट लेबर युनियन आदी संघटना बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे निदर्शनात सहभागी होतील.

या 10 ठिकाणी होणार रास्तारोको, जेलभरो
गुरुनानक चौक येथे नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली, हैदराबाद रोड येथे ऍड. एम. एच. शेख, विव्हको प्रोसेस येथे सुनंदा बल्ला, अशोक बल्ला, आम्रपाली चौक येथे नसीमा शेख, मुरलीधर सुंचू, महादेव घोडके, अनिल वासम, गेंट्याल चौक येथे कामिनी आडम, पत्रकार भवन येथे शंकर म्हेत्रे, अक्कलकोट रोड येथे किशोर मेहता, बाबू कोकणे, पूनम गेट येथे अशोक इंदापुरे, सलीम मुल्ला, सिद्धाराम उमराणी, पुष्पा पाटील, महापालिका मुख्य प्रवेशद्वार येथे इलियास सिद्दीकी, बाबूलाल फणीबंद तर कुंभारी महामार्ग येथे युसूफ शेख व विल्यम ससाणे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको व जेलभरो आंदोलन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.