१३ ऑगस्ट जागतिक लांडगा दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी अतिक्रमण, अधिवास नष्ट होणे आणि छळामुळे, अनेक प्रदेशांत लांडग्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.
-अजितकुमार पाटील, मानव वन्यजीव रक्षक
मार्जार कुळातील सर्वांत शक्तिशाली जंगली प्राणी वाघ (Tiger) असेल, तर श्वान कुळातील सर्वांत शक्तिशाली प्राणी लांडगा आहे. अंगभूत शक्ती, बुद्धिचातुर्य आणि एकजुटीचे विशेष कौशल्य लक्षात घेता लांडगा अत्यंत यशस्वी शिकारी असतो. तो कळपाने शिकार करतो. मात्र एकटा लांडगा (Wolf) देखील सहज शिकार करू शकतो.
२१ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या १९ व्या बैठकीत आटपाडीतील ९.४८ चौरस किलोमीटर वनक्षेत्र हे वन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले आहे. या परिसरात लांडगा, कोल्हा, तरस, ससा आदी वन्यजीव आढळून येतात. आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र (Atpadi Conservation Reserve Area) हे परिसरातील लांडगे व अन्य सस्तन प्राण्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्याचा विचार करत तयार करण्यात आले आहे. जत तालुक्यातदेखील लांडग्यांचा अधिवास आहे. गेल्या आठवड्यात लांडग्यांनी माणसांवर हल्ला केल्याची बातमी आली होती.
लांडग्यांचे प्रमुख खाद्य : भटकी कुत्री, हरण कुळातील प्राणी, शेळी, मेंढी, कोंबड्या, सरडे, घोरपड, ससे, उंदीर हे लांडग्याचे खाद्य आहे. गवताळ प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम लांडगा करतो. लांडगे नसते तर गवताळ प्रदेशातील तृणभक्षी प्राण्यांत नक्कीच वाढ झाली असती. उन्हाळ्यात हेच तृणभक्षी प्राणी शेतात येऊन शेतीचे नुकसान करताना दिसले असते. गवताळ प्रदेशात लांडगा असला पाहिजे, तरच गवती कुरणे व पिकांचे चांगले संरक्षण नैसर्गिक पद्धतीने होत राहील, असे म्हटले जाते.
धूर्त प्राणी : लांडग्याला धूर्त प्राणी म्हणून हिणवले जाते. मात्र लांडग्याच्या कळपात एक कुटुंबव्यवस्था आढळते, ज्यामध्ये प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते. लहान पिल्लांच्या पोषणाची काळजी कळपातील सर्व लांडगे मिळून घेतात. म्हाताऱ्या लांडग्यांची काळजी तरुण लांडगे घेतात. कळपातील सदस्य मेला तर अन्य लांडगे शोक व्यक्त करतात. आजारी लांडग्याची काळजी कळपातील अन्य लांडगे घेतात.
कायदेशीर संरक्षण : लांडगा वाघाइतकाच संरक्षित प्राणी आहे. तो ‘शेड्यूल्ड वन’ मध्ये आहे; मात्र वाघाएवढे महत्त्व त्याला दिले जात नाही.
वर्णन : लांडग्याची उंची सरासरी २६ ते ३२ इंच असते. वजन ५० ते १०० पौंड असते. त्यांचा रंग राखाडी ते तपकिरी रंगात बदलतो. गळा, छाती आणि पोटावर पांढरे ठिपके असतात. लांडग्यांकडे शक्तिशाली जबडे आणि तीक्ष्ण दात असतात, जे अन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कळपामधील अल्फा (प्रमुख) नर आणि मादी प्रजनन करतात.
संकट मोठे : १३ ऑगस्ट जागतिक लांडगा दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी अतिक्रमण, अधिवास नष्ट होणे आणि छळामुळे, अनेक प्रदेशांत लांडग्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. लांडग्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी असंख्य धोक्यांचा सामना करावा लागत आहे. अधिवासाचा नाश, शिकार आणि पशुधनाच्या नासाडीवरून मानवांशी संघर्ष. अनेक देशांमध्ये कायदेशीर संरक्षण असूनही बेकायदेशीर शिकार व अधिवासाचा ऱ्हास हे लांडग्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांसमोरची संकटे व आव्हाने आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.