Womens day 2021 : शिक्षण सातवीपर्यंत आणि ‘टर्न ओव्हर’ तीन कोटींचा

women day special story of received rupees 3 crore turnover in nipani belgaum
women day special story of received rupees 3 crore turnover in nipani belgaum
Updated on

निपाणी (बेळगाव) : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण, ग्रामीण भाग व बिकट परिस्थिती आड येत नाही. त्याचा प्रत्यय करजगा (ता. हुक्केरी) येथील उद्योजिका निर्मला महादेव इंजल यांनी आणून दिला आहे. सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या उद्योजिका संकटांवर मात करत जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर ३ कोटींवर ‘टर्न ओव्हर’ असलेला कारखाना हाताळत आहेत.
१९७३ मध्ये जन्मलेल्या निर्मला इंजल यांचे माहेर मसोबा हिटणी (ता. हुक्केरी). वडील मारुती पाटील मुंबईत गिरणी कामगार तर आई मालती पाटील गृहिणी. ‘कोहिनूर’ गिरणी बंद पडल्यावर हे कुटुंब गावी परतले. १९९१ ला निर्मला यांचा विवाह करजग्यातील महादेव इंजल यांच्याशी झाला. बिकट परिस्थितीमुळे कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत नोकरीनिमित्त आल्या.

१९९८ अखेर एका एक्‍सपोर्ट कंपनीत ७०० रुपये पगारावर नोकरी केली. २००३ मध्ये पती महादेव यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले. त्यांनी २००५ मध्ये कोअर शॉप कंपनी सुरू केली. २००७ मध्ये एका कामगारावर स्वतः लहान गॅस ओव्हनचा कारखाना सुरू केला. सौंदलग्यातील उद्योजक विठ्ठल पाटील यांच्या पत्नी उद्योजिका ज्योती पाटील व निर्मला इंजल यांनी २००७ मध्ये जे. बी. कोअर शॉपमध्ये (फौंड्री उद्योगाला लागणारे साचे) पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु केला. कारखान्याचे २०११ मध्ये कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत विस्तारीकरण केले.

सध्या दरवर्षी हा कारखाना २५ टक्के जास्त उलाढाल करत आहे. गतवर्षी २ कोटी ९८ लाखांवर तर कोरोनाचे संकट असतानाही २०२०-२१ वर्षात फेब्रुवारीअखेर ३ कोटींवर उलाढाल झाली. सध्या ४० कर्मचारी कार्यरत असून १५ महिलांना रोजगार दिली आहे. मुलगी उर्मिला हिचे लग्न झाले असून मुलगा किसन हा उद्योगात स्थिरावला आहे. त्या यशस्वी उद्योजिका म्हणून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात ओळखल्या जातात.

सरावानेच संगणकावर प्रभुत्व

निर्मला यांचे शिक्षण मराठी माध्यमातून केवळ सातवीपर्यंत झाले. त्यामुळे इंग्रजीशी संबंध आला नव्हता. त्यानंतर त्यांनी सरावानेच संगणकावर प्रभुत्व मिळविले. संगणकावर प्रॉडक्‍शन, क्वॉलिटी, डिस्पॅचसह एचआर, इंजिनिअरिंग, ड्रॉईंग या बाबी लिलया हाताळतात.

"संकटात महिलांनी खचून स्वतःला कमी समजू नये, हेच मला खडतर परिस्थितीने दाखवून दिले. त्यामुळे कुटुंबाला सावरत उभे राहता आले."
 

- निर्मला इंजल (करजगा), उद्योजिका, कागल औद्योगिक वसाहत

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.