सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते असे महिलांनी सांगितले. अंधार असलेल्या रस्त्यावर पथदिवे चालू करावेत, पोलिसांची गस्त वाढवावी, मद्यप्राशन करून फिरणाऱ्यांवर तसेच शाळा, कॉलेज परिसरात थांबणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करावी मागणी महिलांतून होत आहे.
या परिसरात वाटते महिलांना भीती
सोलापुरात शिवाजी चौकपासून पुढे, विजयपूर रोड, हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागील रस्ता, संगमेश्वर कॉलेजच्या बाजूचा रस्ता, विजयपूर नाका परिसर, दयानंद कॉलेज परिसर, जोशी गल्ली, शिवाजी चौक ते हनुमाननगर रस्ता, बुधवार पेठ, अकक्कलकोट रस्ता, एमआयडीसी रस्ता, शेळगीला जाणारा रस्ता, देगाव नाका, होटगी रस्ता, कवितानगर, सलगरवस्ती, शेळगी पुलापासून शिवदासमय मंगल कार्यालयपर्यंत. मित्रनगर ते पुणे रस्ता.
हेही वाचा : ...अन् दीड वर्षाचा जयदीप आला चाकाखाली!
या आहेत महिलांच्या मागण्या..
- सर्वच रस्त्यांवर पथदिवे चालू करावेत
- रस्त्याच्या कडेला दारू पिणाऱ्यांवर व्हावी कारवाई
- शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांवर गुन्हा दाखल करावा
- महिला, मुलींना स्वसंरक्षणाचे शिक्षण द्यावे
- प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
- दामिनी पथकातील महिला पोलिसांची संख्या वाढवावी
मदतीसाठी इथे करा संपर्क..
अडचणीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील 100 किंवा खास महिलांसाठी असलेल्या 1091 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, आपल्या परिसरातील पोलिस ठाण्यात जाऊन तेथील महिला अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांकही महिलांना घेता येईल.
हेही वाचा : ओएलएक्सवर बाईकची जाहिरात! वाचा कसा फसला तरुण..
सोलापूरकर म्हणतात..
सोलापूर महिलांसाठी सुरक्षित नाही असे मला वाटते. शहरात अनेक घटना घडत असतात. काही समोर येतात तर काही दाबल्या जातात. चार ते पाच वर्षांच्या मुलीपासून 45 वर्षांच्या महिलेपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. महिलांना स्वसंरक्षणाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात शिबिराचे आयोजन करावे. रस्त्याने जाताना असुरक्षित वाटले तर मी आधी घरी कळवते. त्यानंतर मित्र-नातेवाइकांना कळवते. त्यानंतर मग पोलिसांशी संपर्क साधते. दामिनी पथकातील महिला पोलिसांची संख्या वाढवावी. शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत. शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंवर तत्काळ कारवाई करावी.
- अश्विनी कुलकर्णी,
विधिज्ञ
मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरांच्या तुलनेत सोलापूर शहर महिलांसाठी सुरक्षित आहे. लोकांची वर्दळ कमी असलेल्या रस्त्यावरून जाताना मनात थोडी भीती वाटते. महिलांना सुरक्षित तेव्हाच वाटेल जेव्हा लोकांची मानसिकता बदलेल. महिलांनी गरज पडलीच तर 100 नंबर डायल करून पोलिसांची मदत घ्यावी. तसेच जवळपासच्या लोकांची मदत काळजीपूर्वक घ्यावी. शहरातील प्रत्येक भागात पोलिसांनी दिवसरात्र गस्त घालावी. जेणेकरून टवाळखोरांत अपराध करण्याची हिम्मत होणार नाही.
- मानसी गोरे,
गृहिणी
सोलापुरात अनेक रस्त्यावर लोक दारू पिऊन फिरतात. काही ठिकाणी तर रस्त्यावरच दारू पिणाऱ्यांचे अड्डे आहेत. अशा ठिकाणाहून जाताना भीती वाटते. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई करावी. शहरात अनेक रस्त्यावर पथदिवे बंद आहेत. सायंकाळनंतर अंधार असलेल्या रस्त्यावरून जाताना असुक्षित वाटते. यावर उपाययोजना आवश्यक आहेत.
- रोहिणी सावंत,
गृहिणी
आपले सोलापूर महिला, मुलींसाठी सुरक्षित आहे अस मला वाटते. मला कधी-कधी नाटकाच्या तालिमीनिमित्त उशिरा घरी यावे लागते. अशा वेळेस डफरिन चौक ते बाळीवेस तर कधी जोडबसवन्ना चौक ते बाळीवेस या रस्त्यावरून मी येते. आतापर्यंत कधी असुरक्षित वाटण्याचा प्रसंग आला नाही. रहदारी ठिकाणी आणि मुख्य चौकात असुरक्षितता नाही. कारण, तेथे लोकांची वर्दळ असते आणि पोलिसांची व दामिनीची गस्त दिसून येते. शासनाने मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यावेत. शाळा, महाविद्यालयात अगदी सक्तीचे करावे.
- अरुंधती शेटे,
नाट्य कलावंत
आपले सोलापूर महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही. आजही सोलापुरातल्या काही भागांतून रात्री प्रवास करताना अनामिक भीती वाटते. पथदिवे नसलेल्या रस्त्यावर असुरक्षित वाटते. काहीवेळा मद्यप्राशन केलेली मंडळी रस्त्यावर असतात. अशा अवस्थेत स्मार्ट सोलापूर मुली व महिलांसाठी कितपत सुरक्षित असा प्रश्न पडतो. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. काही हेल्पलाइन नंबर जागोजागी फलकावरून लिहून ठेवावेत. निर्मनुष्य रस्त्यांवर पथदिवे चालू ठेवावे.
- संगीता रेळेकर,
शिक्षिका
आपले सोलापूर शहर खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे. हद्दवाढ भागातून जाताना अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. तिथून जाताना चोरीच्या घटनांची भीती वाटते. शक्यतो रात्रीच्या वेळी एकट्याने न जाता सोबत कोणालातरी घ्यावे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांनीच पुढे यावे. घरातील तरुण मुलांना अन्य स्त्रियांना आदरपूर्वक वागणुकीची शिकवण देणे गरजेचे आहे. पोलिस हे आपले मित्र आहेत, त्यांचे नंबर जवळ ठेवावेत. पोलिसांनी रात्री नऊनंतर जास्त गस्त घालावी. रस्त्यांवर ठळकपणे पोलिसांचे नंबर असलेले फलक लावावेत.
- वैशाली कदम,
शिक्षिका
शहरात अनेक भागांतील रस्त्यावर दुपारच्या सुमारास कोणीही नसते. शाळेतील लहान मुले व मुली कोपऱ्यावरून घरी येत असताना काही लोक दुचाकीवर घिरट्या घालत असतात. एकटी मुलगी, तरुणी पाहून अश्लील हावभाव, टोमणे मारत हिंडत असतात. पोलिसांनी गल्लीबोळातून सकाळ, दुपार आणि सायंकाळ पेट्रोलिंग करावे. नागरिकांच्या मनातून भीती कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- डॉ. नेहा चक्रदेव,
निवृत्त प्राध्यापिका
आपलं सोलापूर महिलांसाठी सुरक्षित आहे. कोणाला असुरक्षितता वाटत असेल तर तत्काळ फोन करून पोलिसांची किंवा घरच्यांची मदत घ्यवी. अडचणी असलेल्या महिलांना तत्काळ मदत होईल अशी यंत्रणा पोलिसांनी उभी करावी. प्रत्येक तरुण महिलांना माता-भगिनी समजून जर वागला तर महिलांना असुरिक्षत वाटणार नाही. रस्त्यावर आजूबाजूला कोणी नाही किंवा आंधार असेल अशा ठिकाणाहून जाण्यासाठी भीती वाटते. काही घडलेच तर समोरच्या व्यक्तीला कसे धाडसाने मारू शकू असे शिक्षण महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी घ्यायला हवे.
- श्रद्धा सक्करगी,
विद्यार्थिनी
आपले सोलापूर महिला, मुलींसाठी अन्य शहरांच्या तुलनेत सुरक्षित आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शाळेत स्वसंरक्षणाचे शिक्षण अनिवार्य करावे. दामिनी पथकाची संख्या वाढली पाहिजे. टोल फ्री नंबरवर फोन करताच जीपीएसचा वापर करून पोलिस घटनास्थळी काही मिनिटातच पोचतील अशी यंत्रणा करावी. प्रत्येक मुलीने आणि महिलेने आपल्यासोबत चिली, पेपर स्प्रे किंवा सायरनचे छोटे इन्स्ट्रुमेंट ठेवावे. ज्याचे बटन दाबताच जोरात सायरनचा आवाज येईल. पोलिस आपली कामगिरी चोख बजावतात. तरीसुद्धा पोलिसांनी आपला दरारा निर्माण केल्यास गुन्हेगारांवर भीती बसेल.
- ब्रिजेश कासट,
पालक
अडचणीत असलेल्या माता, भगिनींना पोलिस मदत करू शकतात. पण, कधीकधी अंतर लांब असल्याने पोलिस वेळेत पोचू शकत नाहीत. अशावेळी त्या परिसरातील विश्वासू नागरिकांच्या माध्यमातून अडचणी असलेल्यांना मदत करता येऊ शकते. यासाठी पोलिस प्रशासनाने शहरातील विश्वासू नागरिकांची यादी बनवावी. आम्ही पोलिसांना मदत करायला तयार आहोत.
- सिद्धू बोंडगे,
तरुण
शाळेत किंवा महाविद्यालय परिसरात, बाजारपेठेत गेल्यानंतर किंवा कोणत्याही ठिकाणी महिलांना असुरिक्षत वाटल्यास त्यांनी तत्काळ पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तक्रार केल्यानंतर काही वेळेतच पोलिसांचे पथक, दामिनी महिलांच्या मदतीसाठी येतील.
- ज्योती कडू,
सहायक पोलिस निरीक्षक, दामिनी पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.