कोल्हापूर ः पूरग्रस्त महिलांची कर्जमाफी त्वरित व्हावी व फायनान्स कंपन्यांनी चालविलेली जीवघेणी वसुली तातडीने थांबवावी, या मागणीसाठी निगडेवाडी (ता. करवीर) येथील नदीघाटावर जलआंदोलन करण्यात आले. यावेळी शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील महिला आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यात आंदोलक महिला आणि दोन पोलिस महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या. करवीरच्या तहसीलदारांसह प्रांताधिकारी यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. या प्रश्नी तीन दिवसात निर्णय न झाल्यास प्रसंगी अन्य ठिकाणी जलसमाधी घेऊ असा इशारा छत्रपती महिला आघाडीच्या प्रमुख दिव्या मगदूम यांनी दिला.
हे पण वाचा - अफलातून ; ऊसतोड मजूर छायाताईंची काव्यप्रतिभा
सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीमध्ये मंडप घालून वीस आंदोलक महिला उपोषणाला बसल्या. सकाळी अकरा वाजता दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हजारावर महिला तावडे हॉटेल नजीक जमा झाल्या. तेथून त्या निगडेवाडी येथील पंचगंगा नदी घाटावर आल्या. मंगळवारी रात्रीच नदीमध्ये उपोषणासाठी उभारलेल्या मंडपाकडे त्या जमावाने जाऊ लागल्या. त्यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलक महिला व पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलक संतप्त झाले. आम्हाला आंदोलन करण्यापासून हटवू नका, न्यायमार्गाने आम्हाला आंदोलन करू द्या, अशी संतप्त भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केली. त्यावेळी पोलिस अधिकारी व दिव्या मगदूम यांच्यात चर्चा झाली. त्यात फक्त प्रातिनिधिक स्वरूपात वीस महिला मंडपामध्ये उपोषण करतील असे ठरले.
हे पण वाचा- ...आणि ती परतताच नराधमांनी साधली वेळ
रात्री उभारलेला मंडपाची अज्ञातानी नासधूस केली होती. त्याची पुन्हा उभारणी करण्यात आली आणि सायंकाळी पाच वाजता वीस महिला त्याठिकाणी बेमुदत उपोषणाला बसल्या. तीन दिवसामध्ये जर या आंदोलनाची दखल नाही घेतली तर जलसमाधी घेऊ, असा इशारा आंदोलक नेत्या दिव्या मगदूम यांनी दिला.
उपोषणाला बसल्यानंतर आंदोलक समर्थक महिलांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये
"सरकार नाही भानावर, महिला बसल्या पाण्यावर" आणि
"एक रुपयांचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता" अशा प्रकारच्या विविध घोषणांनी नदीपरिसर दणाणून गेला.
यावेळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर, गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, शिरोलीचे किरण भोसले, गोकुळ शिरगावचे सुशांत चव्हाण, मनीषा नारायणकर, अतुल कदम आदी पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनची टीम, महापालिका अग्निशमन दलाचे जवान बोटीसह हजर होते. उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही तैनात होते.
दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली
बिस्मिला दानवडे, राणी कोळी, स्वाती माणगांवे, माधुरी जाधव, शीला सोनारे, सुनीता मालिकवाडी, अलका बदामे, मनीषा कुंभार, अर्चना माळगे, प्रियांका दसते, प्रमिला कांबळे, नंदा गायकवाड, बेबी सौदे, मंगल नर्ले, सूर्या मुजावर, अलमास तांबोळी, वैशाली कांबळे, राणी कांबळे, पूजा कांबळे या महिला उपोषणात सहभागी झल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.