गाजलेला शाहू व्यायाम आखाडा का पडतोय ओस ?

wrestlers are reduceed in shahu aakhada kolhapur
wrestlers are reduceed in shahu aakhada kolhapur
Updated on

कोल्हापूर - मार्केट यार्डातील शाहू व्यायाम आखाड्याची साडेसाती सुटायला तयार नाही. उपमहाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखच्या अचाट कामगिरीने शंभरावर मल्ल आखाड्यात मेहनतीला कमी पडत नव्हते. त्याच्या निधनानंतर आखाड्यातील संख्या घटली आहे. चाळीसभर मल्ल आखाड्यात अंग झिजवत असले, तरी सोयी-सुविधांचा ठणठणाट आहे. तरीही महाराष्ट्र केसरी अधिवेशनात विविध वजनगटांत मल्लांनी आपला जम बसवला आहे.

मार्केट यार्डातील शाहू व्यायाम आखाडा

आखाड्यात १९८४ पासून शड्डू घुमत आहे. मूळचे शाहूवाडी तालुक्‍यातील बजागवाडीचे वस्ताद रंगा ठाणेकर मल्लांना डावपेचांचे बाळकडू पाजत आहेत. चाळीसभर मल्लांचा आखाड्यात ठिय्या आहे. शेंडूरचा (ता. कागल) जय भांडवले आंतरराष्ट्रीय, सोलापूरचा गौतम शिंदे, औरंगाबादचा माऊली गायकवाड व संतोष राजपूत यांनी राष्ट्रीय स्तरावर याच आखाड्यातून चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र केसरी समाधान घोडके काही काळ आखाड्यात सरावाला होता. उपमहाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दोन वेळा होता. उपमहाराष्ट्र केसरीचा तो मानकरी होता. त्याच्या नावाच्या वलयामुळे तालमीत मल्लांचा तोटा नव्हता. आजारपणात त्याचे निधन झाल्यानंतर मल्लांचा तालमीकडे ओढा कमी झाला. वस्ताद ठाणेकर सकाळ व सायंकाळी तालमीत धडे देत असले तरी त्यांच्या मानधनाचा प्रश्‍न सुटलेला नाही. पावसाळ्यात इमारतीच्या छतातून पाण्याची गळती होते. मातीच्या आखाड्याभोवतीच मल्लांच्या निवासाची सोय आहे. दोन शौचालय चालू स्थितीत आहेत. विशेष म्हणजे बदलत्या कुस्तीसाठी आवश्‍यक जिमची सोय येथे उपलब्ध नाही. मल्लांना परिसरातील जिममध्ये जाऊन शरीराला ताण द्यावा लागतो.

सुविधांअभावी मल्लांमध्ये घट

मॅटसाठी प्रस्ताव देऊन सहा वर्षे झाली तरी त्याची पूर्तता झालेली नाही. त्याचबरोबर मॅटच्या कुस्तीसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूकच येथे झालेली नाही. या स्थितीतही मल्ल कौशल्यात कमी पडलेले नाहीत. यंदाही तालमीतील मल्ल महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनात विविध वयोगटात यश मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या तर मल्लांचा आकडा येथे वाढेल, असा मल्लांचा सूर आहे. 

महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेले मल्ल असे : 

कृष्णा गवळी (७० किलो, औरंगाबाद), बाबा जाधव (८६ किलो, औरंगाबाद), सचिन राजगे (७४ किलो, सातारा), आशुतोष पवार (७१ किलो, सोलापूर), गोविंद दिडवाघ (८० किलो, सातारा), विनायक दिडवाघ (८६ किलो, सातारा), महादेव राजगे (५७ किलो, सातारा), भारत सोरसे (६५ किलो, औरंगाबाद).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.