शड्डूचा आवाज थांबला; कोरोनामुळे पैरवानांवर रोजंदारीची वेळ

काही तालमीतच मल्ल सराव करताना दिसतात. मात्र नेहमी घुमणारे बैठका, शड्डूचे आवाज आता कानावर पडत नाहीत. 
शड्डूचा आवाज थांबला; कोरोनामुळे पैरवानांवर रोजंदारीची वेळ
Updated on

नवेखेड (सांगली) : दंड, बैठका, शड्डू यांचे आवाज थांबले आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडॉउनची परिस्थिती निर्माण झाल्याने गेली दोन वर्षे गावोगावची कुस्ती मैदाने बंद आहेत. कुस्ती क्षेत्रात १५ कोटीहुन अधिक रुपयांची उलाढाल थांबली आहे. पैलवानांची आर्थिक कोंडी झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत. महापुरानंतर काही दिवसांतच आलेल्या कोरोनामुळे सांगली जिल्हा सलग दोन वर्षे अशी परिस्थिती अनुभवत आहे. जिल्ह्यातील ६० हुन अधिक कुस्ती मैदाने सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाली आहेत. तालमींना कुलपे लागली आहेत. काही तालमीतच मल्ल सराव करताना दिसतात. मात्र नेहमी घुमणारे बैठका, शड्डूचे आवाज आता कानावर पडत नाहीत.

दोन वर्षांपूर्वी कृष्णा, वारणा नद्यांना महापूर आल्याने सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस देवराष्ट्रे, बांबवडे, बोरगांव कुस्ती मैदाने रद्द झाली. त्यामुळे मल्ल व कुस्ती प्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरले. पुढे फेब्रुवारी महिन्यापासून गावोगावच्या जत्रा हंगाम सुरू व्हायचा तो 'मे' अखेर चालायचा. जिल्ह्यात चिंचोली, पाडळी, विटा, बेनापूर, खवसपूर यांसह साठहुन अधिक कुस्ती मैदानांसोबत साखर कारखाना तर्फे कुस्ती मैदाने होत. वर्षभर सराव केलेले मल्ल या कुस्ती मैदानात मोठ्या आशेने उतरतात. अलीकडे बर्‍यापैकी बिदागी मिळत असल्याने मल्ल समाधानी असतो. पराभूत मल्लांना काही रक्कम देण्याची परंपरा कुस्ती मैदाने जोपासतात. मिळालेल्या बीदागीतून पुढील वर्षाचा कुस्तीच्या खुराकाचा खर्च भागवला जातो.

मैदाने संपल्यानंतर पैलवान गावाकडे परततात. एक महिना गावाकडे थांबून पुन्हा पावसाळ्याच्या सुरवातीस तालमीत दाखल होतात. आपल्यातील कमतरता शोधत नव्या उमेदीने सरावाला सुरुवात करतात. परंतु ही दोन वर्षे त्यांना अडचणीची ठरली आहेत. पदरमोड करून खर्च भागवणे अनेकांना शक्य नाही.
त्यामुळे त्यांनी गावाची वाट धरली आहे. मिळेल तो कामधंदा करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे. ज्यांची परिस्थिती बर्‍यापैकी आहे त्यांचा काही अंशी व्यायाम सुरू आहे. सलग दोन वर्षे जिल्ह्यातील साठहुन अधिक मैदाने रद्द झाल्याने पंधरा कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल थांबली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

सांगली जिल्यातील रद्द प्रमुख कुस्ती मैदाने :

सांगली, मिरज, कवठेपिरान, कसबे डिग्रज, तुंग, समडोळी, खंडेराजुरी, भोसे, सोनी, धुळगाव, कवलापुर, बुधगाव, पद्माळे, जुनी धामणी, वाळवा, बोरगाव, जुनेखेड, मसुचीवाडी, ताकारी, तुपारी, दह्यारी, रेठरे हरणाक्ष, कासेगाव, कुरळप, वाटेगाव, नेर्ले कामेरी, पेठ, मांगरूळ, शिराळा, चिंचोली, मणदूर, पुनवत, पणुंब्रे, शेडगेवाडी, वारूण शित्तुर, पलूस, किर्लोस्करवाडी, रामानंदनगर, पुणदी, दुधोंडी, नागराळे, आमनापूर, देवराष्ट्रे, कुंडल, बांबवडे, नागाव निमणी, कवठे एकंद, तासगाव, नागाव, यमगरवाडी, विसापूर, हातनूर, हातनोली, पाडळी, पारे, विटा, खानापूर, बेनापुर, बलवडी, लेंगरे, खवासपूर, जत, बागेवाडी, नागज ,जुनोनी, कवठेमंकाळ, करोली, यांच्यासह अनेक इतर मैदाने आहेत.

"कुस्तीमध्ये दोन मल्लांचा शारीरिक स्पर्श श्वास असा संबंध येतो. त्यामुळे कोरोनाचा मोठा फटका कुस्तीला बसला. कुस्ती क्षेत्रात प्रामुख्याने गरीब घरातील मुले आहेत. मैदाने थांबल्याने खुराकला पैसे नाहीत अशी अवस्था आहे. शासनाने मल्लना आर्थिक मदत करावी."

- पैलवान आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी

"गावोगावी होणारे कुस्ती मैदाने रद्द झाल्याने पैलवानांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यांचा व्यायामही थांबला आहे. गंगावेस तालमीत शंभरहून अधिक मुले सरावासाठी असायची, आता ती संख्या दहा ते बारा एवढीच आहे."

- माऊली जमदाडे, कोल्हापूर

"दोन वर्षे कुस्ती मैदाने बंद आहेत. फार मोठे नुकसान झाले. महागाई वाढली आहे. पदरमोड करून खुराक परवडत नाही. घरच्या म्हशींचे दूध हाच पूरक आहार आहे. मी इतरांच्या शेतात रोजदारीची कामे करतो.'

- भरत पाटील, पैलवान, कोथळी (ता. शिरोळ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.