Water Tax : उद्योजकांच्या पैशांवर ‘पाणी’; पाणीपट्टीचा १५ हजार उद्योगांना फटका

वीज, मिळकत करवाढ आदींसह विविध आर्थिक भुर्दंड सहन करणाऱ्या उद्योजकांना आता वाढीव पाणीपट्टीचा भारही सोसावा लागणार आहे.
Industry
Industrysakal
Updated on

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - वीज, मिळकत करवाढ आदींसह विविध आर्थिक भुर्दंड सहन करणाऱ्या उद्योजकांना आता वाढीव पाणीपट्टीचा भारही सोसावा लागणार आहे. जलसंपदा विभागाने दहा टक्‍के पाणीपट्टी दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. त्‍यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे १५ हजार लहान व मोठ्या उद्योजकांना वाढीव पाणीपट्टी देण्यासाठी खिशातील पैशांवर ‘पाणी’ सोडावे लागणार आहे. त्यामुळे, उद्योजकांमधून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

राज्य जलसंप‍त्ती नियमन प्राधिकरणाकडून फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्‍यातील औद्योगिक पाणी वापराचे दर प्रस्‍तावित करण्यात आले होते. त्यामध्ये २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रत्‍येकी दहा टक्‍के वाढ प्रस्‍तावित करण्यात आली होती. त्‍याला मंजुरी देण्यात आली होती. त्‍यानुसार, जलसंपदा विभागाने ही दरवाढ लागू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक संघटना या निर्णयाबाबत नाराजी व्‍यक्‍त करत आहेत. महापालिका विविध कर लावून उद्योगांचा खिसा रिकामा करत आहे. त्‍यामध्येच आता एमआयडीसीकडूनही वाढीवर दर आकारला जाणार आहे. सध्या शहरात सुविधांअभावी उद्योग स्‍थलांतर होण्याच्‍या समस्‍या वाढल्‍या आहेत. त्‍यामध्ये अशी विविध प्रकारची दर वाढ झाल्‍यामुळे उद्योगांचे स्‍थलांतर होण्याची शक्यता उद्योजक वर्तवित आहेत.

उद्योजकांच्‍या अडचणी

1) सुमारे १५ हजार लहान व मोठ्या उद्योजकांना आर्थिक फटका

2) मिळकत कर, वीज दरवाढीसह पाणीपट्टीच्‍या वाढीव दराने उद्योजक हैराण

3) सध्या महिन्‍याकाठी सुमारे १८०० रुपयांचा पाणीपट्टीचा खर्च

4) पाण्यावरील आधारित उद्योगांना जादा आर्थिक भुर्दंड.

5) कच्‍च्‍या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना १८ ते ३६ टक्‍क्‍यांची वाढ

सध्या एमआयडीसी परिसरात पाणीपट्टीचा दर २१ रुपयांपासून पुढे आहे. इमारत पूर्णत्वास नसेल; तर ३२.२५ असा दर आकारला जातो. सध्या आहे तेच दर मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्यावर आधारित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी अजून दरवाढ झाली; तर उद्योग करणे कठीण होईल. अनेक रबर, रसायने, सीएनसी बीएमसी, इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये प्रत्येक मशीनला पाण्याची आवश्‍यकता असते. त्‍यांना वाढीव दर परवडणार नाही. कंपन्‍या स्‍थलांतराचे ते एक कारण होईल. त्‍यामुळे, असे दर सतत वाढवू नये.

- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्‍मॉल स्‍केल इंडस्‍ट्रीज असोसिएशन

उद्योजकांना मिळकत कर, विजेची दरवाढ आदीसह विविध दरवाढीचा सातत्‍याने सामना करावा लागत आहे. त्‍यामध्येच पाणीपट्टीचा वाढीव दर हा देखील परवडणारा नाही. उद्योजक मेटाकुटीला येत आहेत.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

प्रत्‍येक वर्षी जुलै महिन्‍यात पाणीपट्टीत दहा टक्‍के दरवाढ केली जात आहे. त्‍यानुसार, यंदाही वाढ होणार आहे. हिंजवडी भागात २० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या २४.४० रुपये एक हजार प्रति लिटरमागे दर आकारला जात आहे. त्‍यामध्ये दहा टक्‍के दरवाढ होईल.

- प्रशांत डफाडे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, एमआयडीसी, हिंजवडी

अशी होणार दरवाढ

एमआयडीसीच्‍या वतीने औद्योगिक आस्‍थापनांना पाण्याचा पुरवठा केला जातो. यापूर्वी औद्योगिक प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना एक हजार लिटरमागे २४ रुपये ४० पैसे असा दर आकारला जात होता. नव्‍या वाढीव दरानुसार उद्योजकांना २६ रुपये ८२ पैसे द्यावे लागणार आहे. तर कच्‍च्‍या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना १८ रुपये १५ पैसे ते ३६ रुपये ३ पैसे दर द्यावा लागणार आहे.

एमआयडीसीत होणारा पाणीपुरवठा

विभाग - समाविष्‍ट‍ भाग - होणारा पाणीपुरवठा

हिंजवडी - १५० कंपन्‍या, माण-हिंजवडी ग्रामपंचायत - २० एमएलडी

चिंचवड - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी - ११० एमएलडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com