Road Work Issue : भूसंपादनाअभावी खोडा! नव्वद मीटर रुंद रस्त्याचे काम रखडले

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-बंगळूर महामार्ग आणि पुणे-नगर रस्ता यांना जोडणाऱ्या ९० मीटर रुंद रस्त्याचे ९० टक्के काम झाले आहे. दहा टक्के काम भूसंपादनाअभावी रखडले आहे.
Road Work Issue
Road Work Issuesakal
Updated on

पिंपरी - मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-बंगळूर महामार्ग आणि पुणे-नगर रस्ता यांना जोडणाऱ्या ९० मीटर रुंद रस्त्याचे ९० टक्के काम झाले आहे. दहा टक्के काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून रस्त्याच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.

त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित होणे आवश्यक आहे. हा रस्ता पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेसह पीएमआरडीएच्या हद्दीतूनही जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडून १९९४ मध्ये ९० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित होता. वेगवेगळ्या कारणांमुळे तो रखडला. आता ३० वर्षांनी त्याला मुहूर्त मिळाला आहे. पुणे महापालिका हद्दीत संपूर्ण रस्ता झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ९० ऐवजी सद्यःस्थितीत ३० मीटर रुंद रस्त्याचे ९० टक्के काम झाले. चऱ्होलीतील पठारे मळा ते मोशी येथील राजा शिवछत्रपती चौकालगत पुणे-नाशिक महामार्गाला रस्ता मिळतो.

या रस्त्यामुळे पुणे-नगर रस्ता आणि पुणे-नाशिक महामार्ग जोडले जाणार आहेत. नाशिक महामार्गापासून स्पाइन रस्त्याने निगडीत मुंबई-पुणे महामार्ग आणि किवळे येथे द्रुतगती मार्ग व मुंबई-बंगळूर महामार्गाला जोडला जाणार आहे. या रस्त्याचे मोशी, चऱ्होली परिसरात ९० टक्के काम झाले आहे. वडमुखवाडीतील लघुउद्योग स्थलांतरित करावे लागणार आहेत. त्यांना पर्यायी जागा दिली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानंतर या भागातील रस्त्याचे काम सुरू होईल.

वडमुखवाडीतच हिलटॉप सोसायटीजवळ भूसंपादन रखडले आहे. शिवाय, चऱ्होलीत बुर्डेवस्ती, पठारे मळा व बालाजी मंदिरासमोरील भागात भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे मध्येमध्ये पॅच निर्माण झाले आहे. अखंडपणे या रस्त्याचा वापर करता येत नाही. यावर सकारात्मक तोडगा निघाल्यास सलग रस्ता तयार होऊन कनेक्टिव्हिटी वाढेल.

मोशीसह चऱ्होलीच्या विकासाला चालना मिळेल. दोन्ही शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. शिवाय, हा रस्ता वडगाव शिंदे, सोळू, गोळेगाव भागात पीएमआरडीएच्या रिंगरोडला मिळणार आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे.

चऱ्होली परिसरात ९० मीटर रुंद रस्ता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याचे ९० टक्के काम झाले आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व पुणे-नगर रस्ता जोडला जाणार आहे. लोहगाव विमानतळ रस्ताही जोडला जाणार आहे. राहिलेल्या १० टक्के कामासाठी भू-संपादन करावे लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण, विकास कामांसाठीच्या भूसंपादनावर महापालिकेचा अधिक खर्च होतो. त्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला मदत करावी, अशी आमची भूमिका आहे.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी

अशी आहे वस्तुस्थिती...

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहनांची वाढत्या संख्येमुळे रिंगरोड प्रस्थापित आहे. त्याला शहरातून कनेक्ट होण्यासाठी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने नाशिक महामार्ग ते रिंगरोड वाघोली येथे जोडण्यासाठी ९० मीटर रस्ता रुंद रस्ता प्रस्तावित केला होता.

दरम्यान, चऱ्होली (बुद्रुक) गावाचा समावेश १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला. त्यानंतरही त्या रस्त्याची रुंदी ९० मीटरच ठेवण्यात आली. मात्र, तो करण्याची कार्यवाही जवळपास २५ वर्षे रखडली. गेल्या पाच वर्षापासून जसे-जसे भूसंपादन झाले, त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्त्याची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. सद्यःस्थितीत ९० टक्के काम झाले आहे.

तीन ठिकाणी भूसंपादन रखडल्याने काम थांबले आहे. दरम्यानच्या काळात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. वाघोलीलगतच्या भागाचा समावेश पुणे महापालिकेत समाविष्ट झाला. त्यामुळे मूळ रस्ता पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए अशा तीन भागात विभागला गेला आहे.

कनेक्टिव्हिटी वाढेल

1) पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली आणि पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी-भोसरी प्राधिकरण ९० मीटर रुंद रस्त्यामुळे जोडले जाणार

2) मोशी प्राधिकरणातून पुढे स्पाइन रस्त्याने मुंबई-पुणे महामार्ग आणि नवीन बीआरटी रस्त्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडला जाणार

3) खराडी, तळवडे आणि हिंजवडी आयटी पार्क, भोसरी एमआयडीसी, आळंदी तीर्थक्षेत्र व निगडी-आकुर्डी प्राधिकरण जोडले जाणार

4) पीएमआरडीएचा पूर्वेकडील वाघोली येथील व पश्चिमेकडील मुळशी तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोडही जोडला जाणार

5) वाघोली, वडगाव शिंदे, लोहगाव, चऱ्होली पठारे मळा, ताजणे मळा, काळजेवाडी, पुणे-आळंदी पालखीमार्ग, वडमुखवाडी, मोशीतील राजा शिवछत्रपती चौक जोडणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.