पिंपरी - सध्याच्या युवा पिढीला जेन झी (एकविसाव्या शतकात जन्मलेली पिढी) असं म्हटलं जातं. कमवणारे आई वडील, त्यामुळे मिळणारा भक्कम पॉकेटमनी, हातात मोबाईल व कॉलेजला जायला स्पोर्टस बाईक किंवा कार, विकेंडला ठरलेले प्लॅन हे सध्याच्या पिढीची जीवनशैली झाली आहे. त्यातूनच लहान मुलांमधील व्यसनाधीनता वाढत आहे. या मुलांना ही जीवनशैली मिळण्यामागे पालकही जबाबदार आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या घटनेनंतर लहान मुलांमधील व्यसनाधीनता हा गंभीर विषय पुन्हा एकदा समोर आलेला आहे. सध्या दहावीनंतरची मुले शिक्षणासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच विभक्त कुटुंब पद्धती व पालकांची नोकरीतील व्यस्त दिनक्रम, त्यामुळे मुलांना देण्यात येणारी नको तेवढी सवलत या बाबी मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचे कारण ठरत आहेत, असे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
पालकांचे दुर्लक्ष
सध्याचे बहुतांश पालक हे मोठ्या संघर्षातून पुढे आले आहेत. गावाकडील मध्यमवर्ग जीवनशैलीतून शहरी उच्चभ्रू वर्गात त्यांनी आपले स्थान निर्माण केले. या वर्गात कायम राहण्यासाठी नवरा- बायको दोघांचे नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणे हे ओघानेच आले. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने मोठ्यांचा सहवास मुलांना कमी मिळू लागला. आपल्या मुलांना वेळ देता येत नाही म्हणून मुलांना हवे ते देण्याची मुभा पालक देऊ लागले. त्यातून स्मार्टफोन, दुचाकी, चारचाकी हे मुलांना मिळू लागले. मोबाईलमुळे सोशल मिडीयाचा वापर वाढला. सिनेमे, वेबसिरीज यातून दाखविण्यात येणारी व्यसनाधीनता पाहून मुलेही व्यसनांकडे वळू लागली.
बदललेली जीवनशैली
शहरात वाढलेल्या आयटी कंपन्या व त्यातील आयटी कर्मचाऱ्यांमुळे ‘विकेंड कल्चर’ वाढत आहे. स्टेटस सिंम्बॉलच्या नावाखाली उच्चभ्रू जोडप्यांमध्येही दारू पिणे, सिगारेट ओढणे, उशिरापर्यंत पार्ट्या करणे अशी जीवनशैली दिसून येत आहे. परिणामी, त्यांच्या मुलांनाही व्यसन करणे यामध्ये गैर वाटत नाही. पालकांनी सवलत दिल्याने महागडे मोबाईल, गाड्या घेणे, त्यांचे प्रदर्शन करणे, गाड्यांच्या रेस लावून त्याचे रिल्स तयार करणे याचे प्रमाणही वाढलेले आहे.
शिक्षणासाठी लहान वयात घराबाहेर
सध्या करिअर घडविण्याच्या हेतूने अगदी दहावी- बारावीनंतर विद्यार्थी घराबाहेर पडत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. साहजिकच, दर महिन्याला पैसे पाठविणारे पालक आपला पाल्य त्या पैशांचे काय करतो, याबाबत फारसे गंभीर नसतात. परिणामी, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत, प्राधिकरण, वाकड, मोशी या भागातही सर्रास रात्री बेरात्री अनुचित प्रकार घडत आहेत.
ज्या भागात महाविद्यालये आहेत, त्या भागात रात्री बेरात्री गाड्यांचे हॉर्न वाजविणे, गाड्या जोरात चालविणे, पदपथावरून गाडी चालविणे, वाहतुकीचे नियम न पाळणे असे प्रकास घडत आहेत. तरुण पिढी बदलण्यासाठी व्यवस्था बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मानसोपचार तज्ज्ञ, कायदाविषयक तज्ज्ञ, राजकीय पक्ष यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी सांगितले.
पालकांनी मुलांना नाही म्हणणे शिकायला हवे. मात्र, स्पर्धेच्या युगात जास्तीत जास्त श्रीमंत होण्याकडे किंवा पैसा कमविण्याकडे पालकांचा कल आहे. हा पैसा कशा पद्धतीने खर्च करावा यावर कोणतेही नियंत्रण नाही. लहान कारणांसाठी मुलांना पाठीशी घातले जाते. मात्र पालकांनी वेळोवेळी मुलांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तर अशा घटना घडणार नाहीत.शहरात नाना-नानी पार्क ऐवजी नातू- आजोबा पार्क तयार झाले पाहिजे.
- मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
यापूर्वी लहान मुलांवर आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांचा प्रभाव पडत होता. तेव्हाच्या पिढीची धोरणे कठोर होती. मात्र, सोशल मिडीयामुळे जगभरातील संस्कृती मुलांना नव्याने कळत आहे. या संस्कृतीचे आकर्षण वाटल्यामुळे त्याचे अंधानुकरण केले जात आहे. सध्याच्या पालकांचीही पिढी आपले करिअर व स्टेटस यामध्ये व्यस्त असल्याने त्यांनाही त्यामध्ये काही गैर वाटत नाही.
- जयदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.