Gaming Zone : पिंपरी चिंचवड शहरातील ‘गेमिंग झोन’बाबत प्रशासनच अनभिज्ञ

मनोरंजनाचे वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे ‘गेमिंग झोन.’
Gaming Zone in Pimpri Chinchwad
Gaming Zone in Pimpri Chinchwadsakal
Updated on

पिंपरी - मनोरंजनाचे वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे ‘गेमिंग झोन.’ अशी साठपेक्षा अधिक गेमिंग झोन शहरात असावीत, असा प्रशासनाचा अंदाज असून, गुगल मॅपिंगवरूनही दिसत आहे. मात्र, अग्निसुरक्षेच्या दृष्टिने महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे एकाही गेमिंग झोनची नोंद नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी ‘खेळ’ सुरू आहे का, असा प्रश्न पडतो.

गुजरातमधील राजकोट येथील गेमिंग झोनला आग लागून २८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या गेमिंग झोनच्या परिसरात फ्युएल टायर, फायबर ग्लास शेड्स आणि थर्माकोल शीट्स ठेवलेले होते. त्या परिसरात वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून आग लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गेमिंग झोनचा आढावा घेतला असता, अनेक त्रुटी आढळून आल्या.

गंभीर बाब म्हणजे, महापालिका अग्निशमन दलाकडे एकाही गेमिंग झोनची नोंद नाही. त्यामुळे राजकोटसारखी घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण, गुगल इमेजचा आधार घेतल्यास जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, थेरगाव, रावेत, निगडी, आकुर्डी, संभाजीनगर, संत तुकारानगर आदी दाट लोकवस्तीच्या भागात अधिक गेमिंग झोन असल्याचे दिसत आहे.

काही अनुत्तरीत प्रश्‍न

आपल्या शहरात देखील अशा प्रकारचे गेमिंग झोन्स आहेत का? ते अग्निसुरक्षित आहेत का? अशा गेमिंग झोन्सची कोणत्या विभागात नोंदणी होते? अशा गेमिंग झोन्सला कोणकोणत्या परवानगी आवश्यक असतात? संबंधित गेमिंग झोन्स मालक किंवा चालक सदरच्या परवानगी रीतसर घेत आहेत? आपण पुढील दुर्घटना घडण्यापूर्वी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहोत का? शहरात असे किती गेमिंग झोन्स आहेत? कुठे आहेत? एका वेळी गेमिंग झोन्समध्ये किती मुलांना खेळण्यास परवानगी दिली जाते? आशा गेमिंग झोन्सकरिता शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत का? असे अनुत्तरीत प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गेम झोन म्हणजे काय?

गेम झोन हे मनोरंजनाचे एक साधन आहे. या ठिकाणी नागरिका व्हिडिओ गेम खेळण्यासाठी येतात. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतचा समावेश असतो. असे ‘गेम’ एकट्याने किंवा कुटुंबीयांसमवेत किंवा मित्रांसमवेत खेळता येतात. झोनमध्ये गेमिंग मशिन असतात. व्यापारी संकुले, मॉल्स किंवा बाजारपेठेत, शॉपिंग स्ट्रिट परिसरात गेमिंग झोन असतात.

ज्वलनशील वस्तू

गेमिंग झोनमध्ये अनेक वस्तू ज्वलनशील असतात. गेमिंग झोनसाठी वीजपुरवठा आवश्यक असतो. संगणकीय यंत्रणा, प्लॅस्टिक, फर्निचर, फायबर, वायर्स, रबर, थर्माकोल, फोम आदी ज्वलनशील वस्तूंचा वापर केलेला असतो. त्यासाठी अग्निसुरक्षा साधने प्रत्येक गेमिंग झोनमध्येच नव्हे तर प्रत्येक दुकानांमध्ये असायला हवे, असे एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमनचे ना-हरकत हवे

अनेक जण केवळ शॉप ॲक्ट लायसन्स (दुकान परवाना) काढतात. त्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व निवडणूक किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक आणि पत्त्याचा पुरावा म्हणून भाडेकरार वा त्याची पावती, टेलिफोन बिल, वीज बिल, खेरदी-विक्री करार, मालमत्ता कर पावती आदींपैकी एका पुराव्याची आवश्यकता असते. यासोबतच अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास गेमिंग झोनची आपोआप नोंद राहील, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शहरातील गेमिंग झोन संचालक व मालकांनी अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे. त्यासाठी अर्ज करावा. तो प्राप्त झाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी जागेवर जाऊन तपासणी करतील. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी आढळल्यास उपाययोजनांची पूर्तता करण्याबाबत सूचना करतील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

- मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभागप्रमुख, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.