गेली दोन वर्षे कोरोनात गेली. त्यामुळे भक्ती व आनंदाचा पालखी सोहळाही बघायला मिळाला नव्हता.
पिंपरी - कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम घेत वारकरी शहरात येत होते. त्यांच्या स्वागतासाठी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेने स्वागतकक्ष उभारला होता. त्यामुळे शहरातील नागरिकही चौकात आले होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पारंपरिक नगारा वाद्याची बैलगाडी सायंकाळी पाचच्या सुमारास चौकात आली आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. फुलांनी सजवलेला पालखी रथ सुंदर रांगोळीच्या पायघड्यांवरून आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात सोहळा मुक्कामी पोहोचला. वैष्णवांच्या आगमनाने शहरातील वातावरण वारीमय झाले आहे.
गेली दोन वर्षे कोरोनात गेली. त्यामुळे भक्ती व आनंदाचा पालखी सोहळाही बघायला मिळाला नव्हता. संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घेऊन फुलांनी सजवलेली बस कुठेही न थांबता पंढरीकडे केव्हा निघून जायची हे कळायचे नाही. त्यामुळे मनात रुखरुख असायची. इच्छा असूनही पालखीचे दर्शन घेता येत नव्हते. या वर्षी नियम शिथिल झाल्याने आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळा पंढरीकडे निघाला आहे. त्यांच्या आगमनामुळे ‘पाउले चालती पंढरीची वाट, वैष्णवांचा पाहिला मी थाट’ याची अनुभूती पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना मंगळवारी आली. भक्ती-शक्ती चौकात शहरातर्फे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्वागत केले. काही अंतरापर्यंत पालखी रथाचे सारथ्यही केले. दिंडी प्रमुखांचे पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत केले. प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन व त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यास पुस्तिका भेट दिली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, सहशहर अभियंता संजय खाबडे, संदेश चव्हाण, सतीश इंगळे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे, संचालक राजू महाराज ढोरे आदी उपस्थित होते.
प्रथमोपचार पेटी भेट
आरोग्यदायी यात्रा होण्यासाठी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचा सन्मान करताना प्रथमोपचार पेटी व संपर्क माहिती पुस्तिका भेट दिली. प्रथमोपचार पेटीमध्ये थंडीताप व सर्दी-खोकल्याच्या गोळ्या, मलम, बँडेज, सावलोन लिक्विड, ओआरएस पावडर अशा १५ वस्तूंचा समावेश आहे, तसेच महापालिकेने अग्निशमन बंब, रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर दिले आहेत.
स्वच्छतेवर भर
प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक वारीसाठी महापालिकेने त्यासाठी चित्ररथ तयार केला आहे. त्याद्वारे स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे. ३६० अंशांत फिरणारा सेल्फी पॉइंट भक्ती-शक्ती चौकात उभारला होता. ‘मी स्वच्छाग्रही, प्लास्टिक वापरणार नाही, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल, मी परिसर स्वच्छ ठेवेल’ असे विविध संदेश या सेल्फी पॉइंटद्वारे देण्यात आले. तसेच, पालखी मार्गावर ठिकठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र फिरते शौचालयांची व्यवस्था केली आहे. शाळांमध्ये मुक्कामाची सुविधा केली होती. कचरा संकलनासाठी घंटागाड्या, महिलांसाठी ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशिनची सोय केली होती.
सुरक्षेवर भर
पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांचे थेट प्रक्षेपण व रेकॉर्डिंग करण्यात आले. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी वॉकीटॉकी व वायरलेस यंत्रणा कार्यान्वित होती. मुक्कामाच्या ठिकाणी आणि पालखीमार्गावर फिरते कंट्रोलरूम उभारले होते. दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पालखीवर नजर होती. पोलिस व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही ठिकठिकाणी तैनात होते. मुख्य समन्वयक, समन्वयक, ग्रुप कमांडर असे सुरक्षेचे नियोजन होते. पालखीमार्गावर फिरता दवाखाना व वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका सज्ज होती.
रुग्णवाहिका, औषधे वाटप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड विभागाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक औषधांची सोय केली आहे. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देवकुळे यांच्या हस्ते औषधांची बॅग दिली. स्वर्गीय तात्या बापट स्मृती समितीचे प्रकाश साकोरे, राजाभाऊ पोरे, रावेत येथील उदय हिल टॉप रेसिडेन्सीमधील संपत शिंदे, सोमनाथ भोंडवे, प्रवीण एडके, विकास बडोलिया, हरिसिंग ठाकूर, अमोल शिंदे, प्रकाश बेहेरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.