Bhosari Rain Update : पावसाचे पाणी साचून पुणे -नाशिक महामार्ग रस्त्याची झाली नदी

मुसळधार पावसामुळे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी परिसरातील काही रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले.
Rain water on pune nashik highway near panjarpol
Rain water on pune nashik highway near panjarpolsakal
Updated on

भोसरी - बुधवारी (ता. २४) रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी परिसरातील काही रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. तर काही वाहने पाण्यात बंद पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.

भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाला पांजरपोळजवळ साचलेल्या पाण्यामुळे नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, क प्रभाग क्षत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार, सूर्यकांत मोहिते आदिंनी भेट देऊन रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावर असलेले विलगक तोडले.

तरीही रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह कमी होत नव्हता. त्यामुळे भोसरी वाहतूक पोलिस शाखेद्वारे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक इंद्रायणीनगर, श्री तिरूपती बालाजी चौकातून स्पाइन रस्त्याकडे वळविण्यात आली होती. महामार्गावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

पाणी ओसरल्यानंतर हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती भोसरी पोलिस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक साळुंके यांनी दिली. त्याचप्रमाणे महामार्गावर लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार, संत तुकाराम बॅंक्वेट हॉलसमोर, सद्गुरूनगर जवळ आदी भागातही पाणी साचले होते.

भोसरीतील लांडेवाडीतील महेंद्रा शोरुमसमोरील रस्ता, फिलिप्स सीआईआर कंपनी समोरील रस्ता, शांतिनगर गल्ली क्रमांक एक, आदिनाथनगरमधील गोपाळकृष्ण डेअरीसमोरील रस्ता, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील कै. रमेश नारद गुळवे रस्ता, आळंदी रस्त्यावरील बनाचा ओढा, दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमधील सीएमई सीमाभिंतीजवळ, इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमधील सुयोग इमारतीसमोरील रस्ता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैष्णोमाता शाळेसमोरील रस्ता, भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक २३४/१ दरेकर एम्पायर समोरील रस्ता, एस ब्लॉक २३४/९ समोरील रस्ता, दिघीतील मॅगझीन चौक, सह्याद्री कॉलनी क्रमांक तीन समोरील रस्ता, छत्रपती संभाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिरापर्यंतचा रस्ता आदि भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

भोसरीतील आदिनाथनगरमध्ये सर्वे क्रमांक ६८५ मध्ये स्ट्रॉम वॉटर लाईनची सुविधा नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही यावर उपाययोजना केली जात नसल्याची तक्रार अॅड. अभिजीत कांबळे यांनी केली.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहने घसरली

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा आणि गटाराचे चेंबर दिसून येत नव्हते. त्यामुळे खड्ड्यातून वाहने गेल्यावर आदळत होती. तर दुचाकी खड्ड्यामुळे घसरून पडल्याचा प्रकार घडून काही वाहन चालक जखमी झाले.

स्ट्रॉम वाटर लाइनचे काम करूनही पाणी रस्त्यावर

पुणे -नाशिक महामार्गावर पांजरपोळजवळ पावसाचे पाणी तुंबण्याचा प्रकार अनेक वर्षापासून होत आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने येथे महामार्गाखालून पाईप लाइन टाकून पावसाच्या पाण्याला वाट करून दिली. बुधवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे महापालिकेने केलेली ही उपाय योजना तोकडी पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.