Police : वाट चुकलेल्या मुलांना पोलिसांकडून ‘दिशा’; मार्गदर्शन व समुपदेशनामुळे अनेक कुटुंबीयांचे भविष्य उजळले

भविष्यात कुटुंबाचा आधार असलेला मुलगा चुकीच्या मार्गाला गेल्याने भविष्यातही आपल्या जीवनात अंधारच असेल, या चिंतेत होते.
police counselling
police counsellingesakal
Updated on

पिंपरी - पतीचे निधन झाले असून, कुटुंब चालविण्यासाठी मी घरकाम करते. छोटी मुलगी पाचवीत तर मोठा मुलगा नववीला शिकतो. मात्र, मुलाला चुकीची सांगत मिळाली अन त्याने शाळेकडे दुर्लक्ष करून टवाळगिरी सुरु केली. कधीही घरी यायचा, शिवीगाळ- भांडण करायचा, असा त्याचा उद्योग सुरुच होता. यामुळे तो नववीत नापास झाला.

भविष्यात कुटुंबाचा आधार असलेला मुलगा चुकीच्या मार्गाला गेल्याने भविष्यातही आपल्या जीवनात अंधारच असेल, या चिंतेत होते. अशातच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष बाल पथकाच्या दिशा उपक्रमाची माहिती मिळाली. या उपक्रमांतर्गत मुलाला पोलिसांचे योग्य मार्गदर्शन मिळाले, त्याचे समुपदेशन केले. त्यामुळे माझ्या मुलाच्या वागणुकीत मोठी सुधारणा झाली. चुकीचा मार्ग सोडून मुलगा मुख्य प्रवाहात आला.

रोजच्या रोज शाळेत जाऊ लागला. ज्याच्या आधारावर कुटुंबाचे भवितव्य आहे. तो चांगल्या मार्गाला लागल्याने आमच्या कुटुंबाचे भाग्य उजळले, असा अनुभव सांगताना आईचे डोळे भरून आले. चुकीच्या मार्गाला लागलेल्या मुलाचे पोलिसांमुळे पुनर्वसन झाल्याने भोसरीतील लांडेवाडी येथील या मातेने पोलिसांचे मनापासून आभारही मानले.

अशाप्रकारे दिशा भरकटलेल्या मुलांना पोलिसांकडून मार्गदर्शन, समुपदेशन करण्यासह शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. विविध कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, व्यसनापासून रोखणे, गुन्हेगारीच्या मार्गाला जाण्यापासून रोखणे आदी उपक्रम हाती घेतले जात आहेत. यामुळे अनेक मुलांचे पुनर्वसन झाले आहे. या मुलांना विविध खेळांचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या अंतर्गत क्रीडा प्रशिक्षक संदेश बोर्डे यांनी निगडी परिसरातील मुलांना एकत्र करून, फुटबॉल संघ तयार केला. या मुलांनी राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले. यासाठी विशेष बाल पथक काम करीत आहे.

पथकाची कामगिरी

सध्या विविध गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग असल्याचे दिसून येते. अशा मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासह मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांच्या विशेष बाल पथकामार्फत दिशा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण १८८ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. ४१ मुलांना शाळा प्रवेश घेऊन दिला असून, २५ मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे, तसेच ५८ अल्पवयीन मुलांना व्यसनमुक्त केले असून, ६०८ मुलांचे समुपदेशन केले आहे तर ४५१ मुलांना खेळाचे प्रशिक्षण दिले.

भरकटलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पथक काम करीत आहे. योग्य मार्गदर्शन, समुपदेशन यासह मुलांना चांगल्या वाईट गोष्टींची जाण करून देणे, यामुळे अनेक मुले चांगल्या मार्गाला लागली आहेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह विविध खेळांबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

- विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, विशेष बाल पथक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.