Cooperative Societies Election : पिंपरी-चिंचवड शहरातील १०५ संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्‍यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका स्‍थगित करण्यात आल्‍या आहेत.
voting
votingsakal
Updated on

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्‍यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका स्‍थगित करण्यात आल्‍या आहेत. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्य सरकारच्या सूचनेमुळे ३१ मेपर्यंत या निवडणुका स्थगितीचा आदेश दिला आहे. त्‍यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील १०५ सहकारी संस्‍थांच्‍या निवडणुकीला ‘ब्रेक’ लागला आहे. उपनिबंधक सहकारी संस्‍था कार्यालय तीन आणि सहा अंतर्गत या संस्‍थांचा यामध्ये समावेश आहे.

या कार्यालयातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्‍या कामावर गेल्‍याने निकालानंतरच या संस्‍थांच्‍या निवडणुकांचा मुहूर्त लागणार असल्‍याचे चित्र आहे. आचारसंहिता संपल्‍यानंतर या निवडणुका घेण्याची सूचना दिली जाईल. मात्र, त्‍याची तारीख जाहीर न झाल्‍याने या निवडणुका कधी होतील, याबाबत सध्या तरी अनिश्‍चितता आहे.

सहकारी संस्‍थांवर निवडणूक प्रक्रियेद्वारे संचालक मंडळाची नियुक्‍ती करून त्‍याद्वारे संस्‍थेचा कारभार चालविला जातो. निवडणुकीचा कार्यक्रम उपनिबंधक सहकारी संस्‍थांच्‍या कार्यालयांतर्गत पार पाडला जातो. मात्र, सध्या राज्‍यासह शहरातील मुदत संपलेल्‍या सहकारी संस्‍थांच्‍या निवडणुका रखडल्‍या आहेत.

राज्‍य सरकारने रिक्त होणाऱ्या पदावर लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये पदाधिकारी किंवा संचालक यांची निवड किंवा नियुक्ती करणे योग्य होणार नसल्‍याचे कळविले आहे. याबाबत सरकारी आदेशाचे काटेकोर पालन व्हावे, असे राज्य सरकारने कळवले आहे. त्‍यानुसार राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी ‘ड’ आणि ‘ई’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक ३१ मेपर्यंत स्थगित केली आहे.

त्‍यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील उपनिबंधक सहकारी संस्‍था तीन आणि सहा कार्यालयांतर्गत १०५ सहकारी संस्‍थांच्‍या निवडणुकांना स्‍थगिती मिळाली आहे. नागरी पतसंस्‍था, सहकारी बँका, हाउसिंग सोसायटी आदींसह विविध सहकारी संस्‍थांचा यामध्ये समावेश होतो. उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर तीन अंतर्गत १०१ संस्‍थांपैकी ५९ संस्‍थांच्‍या निवडणुका बाकी आहेत. तर उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर सहा अंतर्गत २०१ पैकी ४६ संस्‍थांच्‍या निवडणुका बाकी आहेत.

लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा एक जून रोजी संपणार आहे. चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. सहा जूननंतर आचारसंहिता संपेल. लोकसभेच्‍या या प्रक्रियेनंतर सहकारी संस्‍थांच्‍या निवडणूक घेणे शक्य होणार आहे. सध्या सहकारी संस्‍थांच्‍या निवडणूक प्रक्रिया, संचालक, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया स्‍थगित करण्यात आली आहे. काही सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मात्र, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झालेली नसेल तर ती कशी करावी? निवडणूक स्थगित कालावधीमध्ये तसेच लोकसभा आचारसंहिता कालावधीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करावी का? सहकारी संस्थांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिला असल्यास, संबंधित पदाधिकारी निवड करावी का?

सहकारी संस्थांच्या संचालक मंडळातील पद नैमित्तिकपणे रिक्त झालेली असल्यास ती भरावी का? ‘ड’ वर्गातील संस्थांच्या व्यवस्थापन समितीची निवडणुकीसाठी अधिमंडळ विशेष बैठक घेण्याची नोटीस काढण्यात आली आहे, अशा संस्थांच्या सभा घेण्यात याव्यात का? अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या (ई-वर्ग) निवडणुका घ्याव्यात का, याबाबत मार्गदर्शन मागविले होते.

त्‍यावर राज्‍य सरकारने निवडणुका न घेण्याबाबत कळविले होते. दरम्यान, उपनिबंधक सहकारी संस्‍था तीन कार्यालयांतर्गत १०१ पैकी तीन पतसंस्‍था तर उर्वरीत ५६ गृहनिर्माण संस्‍थांच्‍या निवडणुका प्रलंबित आहेत. तर उपनिबंधक सहकारी संस्‍था सहा कार्यालयांतर्गत २०१ सहकारी संस्‍थांपैकी ८६ नागरी पतसंस्‍था, ५६ सेवक पतसंस्‍था, चार नागरी बँका, २९ गृहनिर्माण संस्था, २६ इतर संस्‍थांचा समावेश होतो. या पैकी १८ नागरी पतसंस्‍था, दहा सेवक संस्‍था, दहा गृहनिर्माण संस्‍था आणि इतर आठ संस्‍थांच्‍या निवडणुका होणे बाकी आहे.

उपनिबंधक सहकारी संस्था तीन अंतर्गत समाविष्ट भाग

उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (३) अंतर्गत चिंचवड, पिंपळे गुरव, नवी सांगवी, पिंपळे सौदागर आदींसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भागाचा समावेश होतो. 

उपनिबंधक सहकारी संस्था सहा अंतर्गत समाविष्ट भाग

उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर सहा अंतर्गत रावेत, किवळे, मामुर्डी, दिघी, आकुर्डी, दापोडी, देहू, मोशी, भोसरी, चऱ्होली, चिखली, कासारवाडी, तळवडे, चिंचवड १९, वडमुखवाडी, डुडुळगाव, फुगेवाडी, निगडी, बोपखेल, चोविसावाही आदी भागांचा समावेश होतो.

वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार सध्या राज्यातील सहकारी संस्‍थांच्‍या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून पुढील सूचना आल्यानंतर निवडणुका घेतल्या जाणार आहेत.’’

- पंकज राऊत, जनमाहिती अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था (३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.