crime update Pimpri-Chinchwad scythe attack townspeople terror
crime update Pimpri-Chinchwad scythe attack townspeople terror sakal

कोयता हल्ल्याने पिंपरी-चिंचवड हादरले; शहरवासीय दहशतीखाली

शहरात आठवड्यात सहा घटना
Published on

पिंपरी : कोयत्याने हल्ला केल्याच्या पिंपरी, पुनावळे, चिखली, भोसरी घटना ताज्या असतानाच टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची आणखी एक घटना बावधन येथे घडली. राजरोसपणे टोळके हत्यारे मिरवत हल्ला चढवत आहेत. पाठोपाठ घडलेल्या अशा घटनांमुळे शहर हादरले असून पोलिसांचा धाक संपलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. बावधन येथील घटनेत जुन्या भांडणाच्या रागातून सूरज गोरख क्षीरसागर (वय २३, रा. कोथरूड) या तरुणाच्या तोंडाला तिघांनी मिरचीपूड लावून कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. सूरज ऊर्फ सोन्या कुडले (वय ३०, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) व दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

सूरज हे रविवारी (ता. ३) सकाळी अकराच्या सुमारास बावधन येथे सीएनजी पंपावर काम करीत होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी सुरजच्या तोंडाला व डोळ्याला मिरचीपूड लावली. त्यानंतर कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तर शनिवारी झालेल्या भोसरीतील हल्ल्यात प्रज्ज्वल गोपाळ मकेश्वर (वय १९, रा. वडगाव रोड, आळंदी) हा जखमी झाला. याप्रकरणी ज्ञानेश्वर बडगे, देवा सुतार, शिवा भेंडेकर, मयुर मानकर, अजय देवरस, आकाश नाईक, दिलीप हंगे, तेजस गालफडे, शिवा अटकळवाड, माउली डहाळे, प्रकाश काळे, राकेश काळे, शाम विटकर, सागर खिलारे, सोन्या गुटकुले, आकाश भेंडेकर, मयूर पाटोळे, ओंकार पाटोळे, हणू कांबळे, हरी पांचाळ (सर्व रा. आळंदी), प्रसाद कोल्हे (रा. दिघी रोड, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता. २) रात्री आठच्या सुमारास प्रसाद कोल्हे याच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी फिर्यादी व त्यांचे मित्र भोसरी दिघी रोड येथे आले होते. दरम्यान, तिथे आरोपी व फिर्यादीसह त्यांचे मित्र एकमेकांसमोर नाचत होते. त्यावेळी आपल्या समोर नाचत असल्याच्या कारणावरून बडगे याच्यासह आरोपींनी प्रज्ज्वल व त्यांच्या मित्रांना दमदाटी केली.

‘मी आळंदीचा भाई आहे, यांना दाखवा रे आपला दम’ असे म्हणत प्रज्ज्वलवर कोयत्याने वार केले. तर ओंकार नारायण गाडेकर (वय १८) याला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले. ‘जिवंत सोडू नका यांना कापून टाकू’ असा आरडाओरडा करत दहशत माजवली. खुलेआम गुंड हत्यारांसह मिरवत दहशत माजवत आहेत. कोयता, तलवार, पिस्तूल सहजरित्या उपलब्ध होत असून याच्या जोरावर गुंडाचा हैदोस सुरूच आहे. भररस्त्यात, भरदिवसा रक्तपात होत असून यावरून स्मार्ट सिटीची गुंडांच्या सिटीकडे होत असल्याचे दिसून येते. नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. स्थानिक पोलिसांसह विविध पथक स्थापन केली तरीही अशा गुंडाना मुसक्या आवळण्यात पोलिस कमी पडत आहेत. पाठोपाठ घडत असलेल्या खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, टोळक्याचा राडा अशा गंभीर घटनांमुळे पोलिसांचा धाक संपतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आळंदीतील ‘कोयता गँग’

भोसरीत तरुणावर कोयत्याने वार करणारे गुन्हेगार हे आळंदीतील कोयता गॅंगमधील गुन्हेगार असून अनेकजण नुकतेच कारागृहातून सुटलेले आहे. यातील काही खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होते. मात्र कोरोना काळात त्यांची काही महिन्यांपूरती सुटका झाली. तर कोणी पॅरोलवर आहेत. बाहेर आल्यानंतरही त्यांनी दहशत माजविण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

आठवड्यात पाच घटना

  • २५ मार्च - बूट घेतल्यानंतर दुकानदाराने पैसे मागितले असता त्यांच्यावर हत्याराने वार करून दुकानाची तोडफोड केल्याची पिंपरीतील घटना

  • ३० मार्च - जुन्या भांडणावरून दीपक आल्हाट या तरुणाचे अपहरण व जंगलात नेवून कोयत्याने वार केल्याची थेरगाव, पुनावळे व जांबेतील घटना

  • ३१ मार्च - पिंपरी येथे रामदास भिवरकर यांना कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटली, घरासमोरील मोटारीची तोडफोड करीत दहशत माजवली

  • ३१ मार्च - चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथील कपड्याच्या दुकानात शिरलेल्या टोळक्याने महिलेवर कोयत्याने हल्ला करून कपडे चोरले

  • २ एप्रिल - भोसरीत कार्यक्रमात आपल्या समोर नाचत असल्याच्या कारणावरून प्रज्ज्वल बडगे या तरुणावर टोळक्याकडून कोयत्याने प्राणघातक हल्ला

  • ३ एप्रिल - बावधन येथे जुन्या भांडणाच्या रागातून सूरज गोरख क्षीरसागर या तरुणाच्या तोंडाला तिघांनी मिरचीपूड लावून कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.