Dehurod Katraj Bypass : बाह्यवळण रुंदीकरणाला मिळेना मुहूर्त; सेवा रस्त्यांची कामे रखडली

मुंबई-बंगळूर महामार्गाचे (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळेपासून वाकडपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे.
Dehuroad Katraj Bypass Service Road
Dehuroad Katraj Bypass Service Roadsakal
Updated on

पिंपरी - मुंबई-बंगळूर महामार्गाचे (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) किवळेपासून वाकडपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. भूसंपादनासाठी महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सेवा रस्त्याची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप भूसंपादन झालेले नाही.

जागा ताब्यात असलेल्या ठिकाणी काम सुरू झालेले नाही. पूर्वी केलेल्या सेवा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यासह भुयारी मार्गांची रुंदी व उंची कमी असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आगामी विधीमंडळ अधिवेशनात ठोस पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

सातारा, कोल्हापूरसह नगर, सोलापूर महामार्गाने येणारी आणि पुण्यातून मुंबईकडे वा मुंबईकडून संबंधित मार्गांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग सोईचा आहे. त्यावरून किवळे येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही जाता येते. शिवाय, मुंबई-पुणे महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी या मार्गाचा अधिक वापर होतो.

हिंजवडी-माण आयटी पार्क, नऱ्हे, आंबेगाव, वडगाव धायरी, भुगाव, सूस, बाणेर, बालेवाडीसह पिंपरी-चिंचवड शहरातील मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकडमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस वस्ती वाढल्याने रहदारी वाढली आहे. सेवा रस्त्यामुळे रहदारी विभागली जाऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल, त्यासाठी सेवा रस्त्यांची आवश्यकता आहे.

बाह्यवळण मार्गावर मामुर्डी, विकासनगर, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकडमधील भुमकर व भुजबळ चौक येथे भुयारी मार्ग आहेत. त्यातील किवळे आणि भुजबळ चौकाजवळीस दोन्ही भुयारी मार्ग पुरेशा इंचीची आहेत. मात्र, ताथवडे, पुनावळे, मामुर्डीतील भुयारी मार्ग कमी उंचीचे आहेत. पुनावळे भागातून निगडी, चिंचवड व आकुर्डीकडे येण्यासाठी ताथवडे व पुनावळे या दोन भुयारी मार्गांचा मुख्यत्वे वापर केला जातो.

पुनावळे, ताथवडे या भागात सुरू असणारी गृहसंकुलांची बांधकामांमुळे या भागातून दररोज बांधकामविषयक वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो यांची रहदारी सुरू असते. हे दोन्ही रस्ते अत्यंत अरुंद असून, पावसामुळे खराब झाल्याने या भागात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यावर उपाय म्हणून ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयानजीकचा भुयारी मार्ग जड वाहनांसाठी बंद केला आहे.

वस्तुस्थिती

देहूरोड येथील सेंट्रल चौक ते सातारा म्हणजेच किलोमीटर क्रमांक ७२५ पासून किलोमीटर क्रमांक ८६५ पर्यंत एकूण १४० किलोमीटर रस्त्याचे सहा पदरीकरण काम राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेंतर्गत ऑक्टोबर २०१० पासून सुरू झाले आहे. त्यातील सेंट्रल चौक ते किवळे पुलापर्यंत काही प्रमाणात जागा उपलब्ध आहे.

विकासनगर येथील पेट्रोल पंप ते किवळेगाव इंद्रप्रभा चौक दरम्यानही रुंदीकरणाला वाव आहे. किवळे पूल ते रावेत नदीवरील पुलापर्यंत सेवा रस्ता आहे. रावेत येथील पवना नदीवरील पूल ते वाकड येथील मुळा नदीवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. रहदारीस खुल्या असलेल्या सेवा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.

पुणे हद्दीतही रुंदीकरण हवे

पुण्यातील नवले पुलाजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होते. अनेक ठिकाणी रुंदीकरणाची कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पुण्याकडून मुंबईकडे येताना तीव्र उतार आहे. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांचा ताबा सुटून भीषण अपघात झाले आहेत. सततच्या अपघातांमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. देहूरोडपासून दरी पुलापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे, सेवा रस्ता करणे गरजेचे आहे.

काय करायला हवे

  • बाह्यवळण रस्त्याचे किमान सहा पदरीकरण गरजेचे

  • भुयारी मार्गांची उंची व रुंदी वाढवावी

  • नदी, ओढे व नाल्यांवरील लहान मोठ्या पुलांची कामे व्हावीत

  • मुख्य रस्त्यासह कार्यान्वित सेवा रस्त्यांवरील खड्डे बजवावेत

सद्यःस्थिती

  • सेवा रस्त्यांची कामे रखडल्याने अडथळा

  • धोकादायक रस्त्यावरून असुरक्षित प्रवास

  • अनेक ठिकाणी रस्त्याची अर्धवट कामे

  • मुख्य रस्त्यालगत पावसामुळे चिखल होतो

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूस महापालिका हद्दीत सेवा रस्ते प्रस्तावित आहेत. प्रत्येक सेवा रस्ता बारा मीटर रुंदीचा असेल. महापालिका भू संपादन करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ताबा देणार आहे. सध्या सुमारे ८० टक्के भूसंपादनाचे काम झाले आहे. उर्वरित भू संपादन प्रक्रिया सुरू आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.