Digital Hoarding : जमिनीपासून ४० फुटांपेक्षा उंच होर्डिंगला मनाई

जाहिरात फलक उभारताना त्यांची लांबी व उंची किती असावी, त्याची जागा कुठे असावी, याबाबत शासनाने ९ मे २०२२ रोजी नियमावली प्रसिद्ध केली होती.
Digital Hoarding
Digital HoardingSakal
Updated on

- अश्‍विनी पवार

पिंपरी - जाहिरात फलक उभारताना त्यांची लांबी व उंची किती असावी, त्याची जागा कुठे असावी, याबाबत शासनाने ९ मे २०२२ रोजी नियमावली प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये महापालिकेच्या हद्दीतील कोणतेही फलक महापालिका प्रशासनाच्या परवानगीशिवाय उभारता येणार नाहीत. असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय फलक उभारण्यासाठी जागामालक व जाहिरातदार यांच्यासाठी नियमावलीही देण्यात आलेली आहे.

त्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागापासून ४० फुटापेक्षा उंच होर्डिंगला मनाई करण्यात आलेली आहे. तर; होर्डिंग्जच्या आकाराची ४० बाय ३० फुटांची कमाल मर्यादा आहे. मात्र २०२२ पूर्वी ज्या होर्डिंगला परवानगी देण्यात आलेली आहे, त्यांना मात्र ही नियमावली लागू नाही. त्यामुळेही शहरात अवाढव्य होर्डिंगची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.

घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हे १२० बाय १२० फूट एवढे महाकाय होते. त्यामुळे संबंधितांकडून शासनाच्या नियमावलीचे पालन केले नसल्याचे उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातही उभारल्या जाणाऱ्या जाहिरात फलकांनाही शासनाची नियमावली लागू होते. मात्र, शहरातील मोठ मोठाले होर्डिंग्ज पाहता त्याचे पालन केले जात आहे का?, हा प्रश्‍न निर्माण होतो.

काय सांगते नियमावली

  • जमिनीपासून ४० फूट उंचीपेक्षा अधिक उंचीच्या जाहिरात फलकांना मनाई

  • पदपथावर अथवा सार्वजनिक रस्त्यांवर फलक उभारता येणार नाहीत

  • जेथे पदपथ नसेल तेथील रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक लावला जाऊ नये

  • खुली मैदाने, क्रीडांगणे, उद्याने, बागा याठिकाणी होर्डिंगला मनाई

  • जाहिरात फलकांना रोषणाई करण्यासाठी जनरेटर वापरण्यास मनाई

  • होर्डिंगची रचना (स्ट्रक्चर) जमिनीपासून १० फूट उंचावर असावी

  • रचनेपासून होर्डिंगची उंची ही जास्तीत जास्त ३० फूट तर; रुंदी ४० फूट असावी

  • रस्त्याच्या बाजूच्या दोन फलकांमधले किमान अंतर हे एक मीटरपेक्षा कमी नसावे

  • पाठपोठ असणाऱ्या होर्डिग्जना दोन फलकांमधील एक मीटरचा नियम लागू नाही

  • दरवर्षी होर्डिंगच्या परवान्याचे महापालिकेकडून नूतनीकरण करणे आवश्‍यक

  • फलकावर तंबाखू उत्पादनांच्या तसेच अश्लील जाहिराती लावू नयेत

  • जाहिरात एजन्सीची ओळख पटावी, यासाठी तसा फलक लावण्यात यावा

  • जाहिरात फलक हे झाडाजवळ नसावेत

  • रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या जाहिरात फलकांसाठी महापालिकेची परवानगीही आवश्‍यक

होर्डिंगच्या वजनाबाबत नियम नाही

घाटकोपर येथील होर्डिंग सुमारे २५० टन वजनाचे होते. महाकाय होर्डिंग हे जास्त वजनाचे असल्यानेच अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक व तत्काळ असते. होर्डिंगचा आकार किती असावा याबाबत जरी शासनाने नियम केलेला असला तरी त्याचे वजन किती असावे याबाबत मात्र नियमावलीत काहीही उल्लेख नाही. मात्र, होर्डिंगला पत्रे ठोकलेले नसावेत, जाहिरातीचे फ्लेक्स एकावर एक लावण्यात आलेले नसावेत, असे आदेशात म्हटलेले आहे.

महापालिकेकडून ॲप

शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंगबाबत माहिती देण्यासाठी महापालिका लवकरच एक ‘ॲप’ सुरू करणार आहे. त्यावर नागरिकांना होर्डिंगची तक्रार करता येणार आहे. तसेच सध्या सारथी ॲप व महापालिकेला मेलद्वारे होर्डिंगची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील नवीन होर्डिंग्जना परवानगी देण्यापूर्वी त्यांच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी दोन अभियंत्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

शासनाने २०२२ मध्ये होर्डिंगबाबत नियमावली प्रसिद्ध केलेली आहे. त्यातील निकषांनुसारच सध्या होर्डिंगला परवानगी दिली जाईल. तसेच नियमबाह्य होर्डिंग्जचे नूतनीकरण केले जाणार नाही. महापालिकेला कमी उत्पन्न मिळाले तरी चालेल. मात्र, अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू राहील.

- चंद्रकांत इंदलकर, सह आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.