Pimpri News : डॉक्टर, परिचारिकांचे दुर्लक्ष; गर्भवती खाटेवरच प्रसूत

महापालिकेच्या निगडी रुग्णालयातील प्रकार
women delivery
women delivery sakal
Updated on

पिंपरी - डॉक्टर, परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे निगडी येथील महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात वॉर्डातल्या खाटेवरच गर्भवती प्रसूत झाली. तब्बल चार तास असह्य वेदनांनी गर्भवती विव्हळत होती. मात्र, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर तसेच परिचारिका यांना साधा माणुसकीचाच नव्हे; तर त्यांच्या कर्तव्य भावनेलाही पाझर फुटला नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या गंभीर प्रकाराबाबत महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित महिलेचे नातेवाईक दीपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांना त्याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, माझी वहिनी हिना खैरनार यांना यमुनानगर रुग्णालयातील प्रसूती विभागात सकाळी अकरा वाजता प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते.

यावेळी वहिनीसोबत माझी आई अन्नपूर्णा खैरनार या उपस्थित होत्या. प्रसतीगृहातील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हिना खैरनार यांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना वॉर्डातील खाट देण्यात आली. दुपारी चार वाजेनंतर हिना यांना प्रसुती वेदना होऊ लागल्या. परंतु, रुग्णालयातील कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.

तुम्ही खाटेवर जाऊन बसा !

तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ होऊन देखील त्रास न थांबल्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दीपक यांच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर महेश दणाणे यांना सांगितले. मात्र, त्यांनी अजून दोन तास तरी प्रसुतीला लागतील, असे सांगितले. तुम्ही तुमच्या खाटेवर जाऊन बसा, असे आईला सांगितले. यावेळी वॉर्डात सुप्रिया गायकवाड, प्रियांका साळवे व राजकन्या वानखेडे या परिचारिका उपस्थित होत्या.

यावेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास असह्य वेदनांनी विव्हळत हिना या वॉर्डातल्या बेडवरच प्रसूत झाल्या. सुदैवाने माता आणि नवजात बालकाच्या जीविताला गंभीर धोका झाला नाही. दरम्यान, या प्रकार घडल्यानंतर नातेवाईकांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना संपर्क साधत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

बेजबाबदारपणाचे दर्शन

यमुनानगर रुग्णालयात सायंकाळी प्रशासनाचा कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने गर्भवतींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर तसेच परिचारिकांच्या मनमानी कारभारामुळे अनेक गर्भवतींच्या जिवावर बेतले आहे. कंत्राटी कर्मचारी वर्गावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णसेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णालय ‘सलाईन’वर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हा प्रकार लक्षात घेता रुग्णालयात दोषी डॉक्टर, परिचारिकांवर कारवाई करणे अपेक्षित होती. परंतु त्यांनी केवळ या घटनेची माहिती घेतली व परिचारिकांना समज देऊन सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

- दीपक खैरनार, नातेवाईक, निगडी

माझ्या कानावर हा प्रकार आला आहे. घटनेची माहिती घेऊन संबंधितांना लेखी समज दिली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

- नासीर आल्वी, वैद्यकीय अधिकारी, यमुनानगर रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com