वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. तालुक्याच्या जवळपास निम्म्या भागात या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीबाबत ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र, कोरोना व लॉकडाउनमुळे गावगाड्याची विस्कटलेली घडी लक्षात घेऊन व रणधुमाळीत गावातील एकोप्याचे वातावरण दूषित होऊ नये यासाठी शक्यतो निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
तालुक्यात एकूण १०४ ग्रामपंचायती असून, त्यातील जवळजवळ निम्म्या म्हणजे ५७ ग्रामपंचायतींचा या निवडणूक प्रक्रियेत समावेश आहे. ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अतिशय मानाचे व प्रतिष्ठेचे पद मानले जाते. गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचाला गावात मानाचे स्थान असते.
निवडणुका झाल्या खर्चिक
तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय तेजीत आल्याने हा बदल झाला. गावात पैसा आल्यापासून या निवडणुका अधिक खर्चिक झाल्या आहेत. काही गावांमध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकीला लाजवेल, अशी प्रचाराची रणधुमाळी उडाल्याचे काही निवडणुकांत दिसून आले आहे. प्रचारासाठी लाखो रुपयांचा खर्च केला गेल्याची उदाहरणे आहेत. मतदारांना प्रलोभने, निवडणुकीनंतर सरपंचपद मिळविण्यासाठी सदस्यांची पळवापळवी व प्रतिस्पर्ध्यांत संघर्ष अशा अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत. एकूणच हे पद मिळविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चुतूसुत्रीचा वापर केला जाऊ लागला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढल्या जात नव्हत्या. तालुका पातळीवरील नेतेही या निवडणुकांत फारसा रस घेताना दिसत नव्हते. मात्र, पक्षसंघटनांचा विस्तार गावोगावी झाल्यानंतर अनेक गावांमध्ये आता त्या पक्षीय पातळीवर होऊ लागल्या आहेत. या निवडणुकांतील स्पर्धा तीव्र होण्याचे तेही एक कारण आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे आर्थिक संकट
तालुक्यात कोरोना व लॉकडाउनच्या काळात अनेकांचा रोजगार गेला. हातावर पोट असलेल्या गोरगरिबांचे हाल झाले. अनेक उद्योग-धंदे, व्यवसाय, नर्सरी, फुलशेती, पोल्ट्री, बांधकाम क्षेत्र आदींना फटका बसला. या उद्योग-व्यवसायात काम करणाऱ्या मोलमजुरांची संख्या मोठी आहे. रोज कामावर गेल्याशिवाय सायंकाळी चूल पेटत नाही अशा लोकांवर मोठे संकट आले. अशा स्थितीत त्यांना मदत करण्यासाठी तालुक्यातील अनेक हात सरसावले. कोरोनामुळे गावगाड्याची विस्कटलेली आर्थिक घडी अद्याप सुरळीत झालेली नाही. करवसुलीला अद्याप गती आलेली नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील खर्च टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
बिनविरोधसाठी प्रयत्न हवेत
ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळविण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. हे पद मिळाल्यानंतर त्याचा वापर गावच्या सर्वांगीण विकासासाठी होताना मात्र दिसून येत नाही. सरपंचपद आरक्षित असलेल्या गावांत उपसरपंच ही कामगिरी बजावतात. एकतर सरपंच इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत अथवा इतर सदस्य निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामकाजात लक्ष घालत नाहीत. केवळ मासिक सभेला ते हजेरी लावतात. सरकारच्या विविध अभियानात ठराविक गावांनीच ठसा उमटवल्याचे दिसून येते. इतर गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उदासीन असल्याचे दिसून येते. सरकारच्या विविध योजनांबाबतही ते अनभिज्ञ असतात. त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही ते करताना दिसून येत नाही. सरपंचपद व सदस्यपदाचा वापर केवळ लग्न समारंभात मिरवण्यासाठीच केला जातो. उत्पन्नाची साधने नसल्याने अनेक ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती नाजूक आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार भागवितानाही या ग्रामपंचायतींच्या नाकी नऊ येते. गावगाड्याची विस्कटलेली आर्थिक स्थिती तसेच निवडणूक काळात गावात उद्भवणारे वाद लक्षात घेता गावातील जाणत्या कार्यकर्त्यांनी शक्यतो निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येड्यागबाळ्याला संधी नको
सदस्यपदाची संधी देताना ती अतिशय पारखून देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीसाठी पूर्ण वेळ उपलब्ध होऊ शकणाऱ्या, अभ्यासू, जिज्ञासू व गावासाठी काही तरी करण्याची करण्याची तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांना ही संधी मिळण्याची आवश्यकता आहे. केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या येड्या-गबाळ्याला संधी देता कामा नये.
मी गेली पंचवीस वर्षे ग्रामपंचायतीत कार्यरत आहे. परंतु, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर कर्जबाजारी होऊन निवडणुका लढविण्याऐवजी तरुणांनी गावची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी या प्रयत्नशील राहावे.
- वामन वारिंगे, माजी सरपंच, आंबी
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात गावकी-भावकी, पक्षीय राजकारण व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा या बाबी मोठा अडसर ठरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. परंतु, सद्यःस्थितीत गावाच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करणे ही काळाची गरज आहे.
- भाऊसाहेब आगळमे, माजी सरपंच, साते
गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून ईर्षेचे व संघर्षाचे वातावरण निर्माण होते. निवडणूक बिनविरोध झाल्यास हा अनावश्यक खर्च टळेल व तो गावच्या विकासासाठी वापरता येईल.
- तुकाराम असवले, माजी सरपंच, टाकवे बुद्रुक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.