पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिकनगरीसह उच्चभ्रू वस्ती, आयटी पार्क अन् लहान-मोठ्या शैक्षणिक संस्थाही आहेत. सर्वच घटकांतील लोक शहरात वास्तव्याला आहेत. यामध्ये नोकरी व शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणांची संख्या अधिक आहे. मात्र, त्यातील काही तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकू लागले आहेत.
गेल्या पाच महिन्यात आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ३८ कारवाया करून ७७ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजा, मेफेड्रॉन, अफिम जप्त केले आहे. त्यामुळे, शहरात अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.
चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव भागांत मोठ्या प्रमाणात कंपन्या असून पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाकड, चऱ्होली आदी भागांत मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. तसेच हिंजवडी, तळवडे येथे आयटी पार्क आहेत. या भागात मोठी हॉटेल, पब आणि बार आहेत. येथेही अमली पदार्थ सेवनाचा ‘उद्योग’ सुरू असतो. काही ठिकाणी रस्त्यालगतच गांजाचा झुरका मरताना नशेबाज दिसतात. यावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे स्पष्ट होते. यामध्ये गांजा, मेफेड्रॉन, अफिम यांचा समावेश असतो.
आणखी कठोर पावले हवीत
पोलिसांना माहिती मिळाल्यावर, मालाचा पुरवठा करणारा व माल बाळगणारा यांच्यावर कारवाई केली जाते. आतापर्यंत अशा कारवाया रावेत, वाकड, हिंजवडी, सांगवी, पिंपरी, निगडी, दिघी आदी भागांत मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. मात्र, अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट मोडून काढण्यासाठी पोलिसांनी वेळीच आणखी कठोर पावले उचलून त्याच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे.
तब्बल ४४ किलो मेफेड्रॉन जप्त
सांगवी पोलिसांनी एक मार्चला पिंपळे निलख येथून नमामी शंकर झा याच्याकडून दोन किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त केले. अधिक तपास करून झा याच्याकडून आणखी ४२ किलो ७७० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. या गुन्ह्यात निगडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक विकास शेळके यालाही अटक झाली आहे. शेळके यानेच ते मेफेड्रॉन झा याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे तपासात उघड झाले होते.
अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गोपनीय माहिती काढण्याचे काम सुरू असते. या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी अथवा घेण्यासाठी कोणी येणार असल्याची माहिती मिळाल्यास सापळा रचून कारवाई केली जात आहे. सखोल तपास करून आरोपींना अटक केली जाते. अशा कारवाया सतत सुरू असतात.
- संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.