- बेलाजी पात्रे
हिंजवडी - आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त! आयटीत ही गट्टी आणि जिव्हाळा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. चार वर्षांपूर्वी अख्या कुटुंबाला कोरोनाने ग्रासले. स्वच्छतादूत म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजोबांना कोरोनाची लागण होऊ नये ते हयात असेपर्यंत दाढी व केस कापणार नाही असा प्रण नातवाने केला.
चमत्कार तो असा झाला की, आजोबांना कोरोना सोडा अन्य कुठलाही आजार झाला नाही. चार वर्षांनी आपल्या आयुष्याचे शतक पूर्ण करून १०२ व्या वर्षी आजोबांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर नातवाने कर्करोगग्रस्तांना आपले केशदान केले व स्वच्छता मोहीम राबवून अनोखी श्रद्धांजली वाहिली.
२०१९-२०२० हे दोन वर्षे भयाण कोरोनाने गाजविले. नेरेतील संदीप जाधव हे संपूर्ण कुटुंब देखील कोरोनाच्या चपेटमध्ये आले. तेंव्हा स्वच्छतादूत असलेले ९८ वर्षीय हभप. विष्णु लक्ष्मण जाधव या प्रिय आजोबांना कोरोना झाल्यास त्यांची मोठी आबदा होईल.
त्यांना कोरोनाची लागण होऊ नये ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून उद्योजक व पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव या नातवाने दाढी आणि केस न कापण्याचा प्रण केला होता. ठणठणीत असणाऱ्या आजोबांनी वयाच्या १०२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आजोबा सुखरूप राहावेत म्हणून गेली चार वर्षे दाढी, केस न कापणाऱ्या नातू संदीप जाधव यांनी निगा राखून वाढलेले लांबलचक व मुलायल डोक्याचे (२२ इंच), दाढीचे (१८ इंच) केस मुंबईतील कॅन्सर आधार मदत चॅरिटेबल ट्रस्टला कॅन्सरग्रस्तरुग्णांचे विग बनविण्यासाठी दान केले तर राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जाधव कुटुंबियांनी श्रमदान करत गावातील दशक्रिया घाट व प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता करून आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
वारकरी संप्रदायातील हभप. विष्णू जाधव यांच्या प्रयत्नातून ३५ वर्षांपूर्वी नेरे दत्तवाडीत काकडारती सुरू झाली. पहाटेचा काकडा आणि संध्याकाळचा हरिपाठ यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. साफसफाई व स्वच्छतेला ते प्रचंड महत्व देत. दत्तवाडी गावठाण परिसराची ते सातत्याने स्वच्छता करत. श्री. तुळजाभवानी मंदिर परिसरात साफ-सफाई, वाढलेले गवत काढणे आदी कामे नियमित करत. ग्रामस्थांना देखील सदैव स्वच्छतेचे उपदेश देत.
प्रतिक्रिया
आजोबांनी दिलेले संस्कार, त्यांचं मार्गदर्शन, प्रेरणा, त्याग हा स्मृतीरूपाने सोबत असेल स्वातंत्र्याची पहाट नजरेने अनुभवलेली ही शेवटची पिढी आहे. आज गावात त्यांच्या वयाचे किंवा लहान असणारे मोजकेच जेष्ठ शिल्लक आहेत. हाच संस्काराचा ठेवा जपणं खूप गरजेचे आहे. नातसून सरपंच असताना आजोबा कायम सांगत की, मिळालेल्या पदावर असं काम करायचं की, भविष्यासाठी तुम्ही इतरांचे आदर्श ठरले पाहिजेत.
- संदीप जाधव (नातू)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.