- बेलाजी पात्रे
हिंजवडी - जागतिक दर्जाचे आयटी पार्क हिंजवडी प्रशस्त रस्त्यांअभावी वाहतूक कोंडीत सापडले आहे. याला कारण म्हणजे स्थानिक ग्रामपंचायती, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाचा अभाव, अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा व चालढकल वृत्ती. या संस्था गेल्या २५ वर्षांत ‘आयटी’ला जोडणाऱ्या रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण करू न शकल्यामुळे तेथील कंपन्या आता काढता पाय घेत आहेत.
पायाभूत सुविधा निर्मितीची जबाबदारी असलेल्या शासकीय, निमशासकीय संस्थांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यात वेळ घालवला आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून ‘एसी’ची हवा खाणे पसंत केल्याने त्यांना समस्या दिसल्या नाहीत. या सर्वांचे पर्यावसन कंपनी स्थलांतरात होत आहे.
आयटीला जोडणाऱ्या अनेक पर्यायी रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामांमुळेच वाहतूक समस्या बिकट बनली आहे. आयटी पार्कमध्ये बाहेरून ये-जा करण्यासाठी रामबाण ठरू शकणाऱ्या हिंजवडी-माण-म्हाळुंगे या नवीन सहापदरी रस्त्याचे शेतकऱ्यांशी वाटघाटीबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्याने काही ठिकाणी काम रखडले आहे.
या रस्त्याला जोडणारा राधा चौक ते म्हाळुंगे गावातून जाणारा चांदे-नांदे रस्ता, मुंबई-बंगळूर महामार्ग ते वाकडकर वस्तीमार्गे हिंजवडी, विप्रो सर्कल फेज दोन ते मुंबई बंगळूर हायवे, फेज एक पांडवनगर-बापूजी बुवा मंदिर, सूस रस्ता आणि हिंजवडी रस्ता यांना जोडणारा रस्ता, डांगे चौक ते शिवाजी महाराज चौक यादरम्यान हिंजवडी गावठाणापासून पुढे, माण-हिंजवडी, माण-चांदे रुंदीकरण, नांदे-माण इत्यादी रस्त्यांचे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. या रस्त्यांसह, आहे त्या रस्त्यांची नियमित डागडुजी देखभाल होणेदेखील तितकेच गरजेचे आहे.
कोंडीतून मुक्तीसाठी अडकलेले रस्ते
1) हिंजवडी माण-म्हाळुंगे रस्त्याने हिंजवडीतून माण, म्हाळुंगे, बालेवाडीला तसेच पुण्यात जाणे सोपे होणार आहे. फेज एक, दोनमधील वाहतूक बाहेरच्या बाहेर जाण्यास मदत होणार आहे.
2) सूर्या हॉस्पिटल ते हिंजवडी फेज एक हा सुमारे तीन किलोमीटरचा अर्धा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका व अर्धा पीएमआरडीए करणार आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हे काम ‘जैसे-थे’ अवस्थेत आहे. हिंजवडीकडील रस्त्याचे दीड वर्षापूर्वी भूमिपूजन झाले. वर्क ऑर्डरही निघाली. मात्र, हा रस्ता पुढे गती घेऊ शकला नाही.
3) वाकडमधील फिनिक्स मॉलपासून वाकड पुलाकडे जाणारा २४ मीटर व ओमेगा पॅराडाईज ते फिनिक्स मॉल १८ मीटर, उत्कर्ष चौक ते सयाजी भुयारी मार्ग (अंडरपास) हे रस्तेही होऊ शकले नाहीत.
कोंडीचे वास्तव
हिंजवडी फेज १, २, ३ कडे ये-जा करताना पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना लक्ष्मी चौक मार्गे भूमकर चौक-डांगे चौक व वाकड-हिंजवडी या रस्त्यांचा प्रामुख्याने अवलंब करावा लागतो. परिणामी, या रस्त्यांवर ताण येऊन वाहतूक कोंडी होते. त्यातच मेट्रोच्या कामामुळेही हिंजवडीतील रस्ते अरुंद झाले आहेत.
मात्र, पर्यायी रस्ते पूर्ण झाल्यास तसेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे याठिकाणचे भुयारी मार्ग (अंडरपास) मोठे करून सेवा रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास आयटीतील वाहतूक विनाअडथळा बाहेरून ये-जा करू शकते.
नव्वद टक्के वाहतूक समस्या सुटेल
हिंजवडीत आयटी पार्क वसविताना केवळ सहा टप्प्यांचे प्लॅनिंग करण्यात आले. मात्र, त्या तुलनेत एमआयडीसीने रस्ते केवळ दोन फेजला पुरेसे होतील एवढेच केले. त्याशिवाय आयटी येण्याआधीच हे सर्व रस्त्यांचे प्लॅनिंग करणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने वाकड-हिंजवडी या एकाच रस्त्याने आयटीत प्रवेश करावा लागतो. त्यामुळे कोंडी होते.
एमआयडीसी, पीएमआरडीए, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य तत्सम संस्थांची एकत्र मोट बांधून पर्यायी रस्त्यांचे जाळे विणून वाहतुकीसाठी सर्व रस्ते पूर्ण क्षमतेने खुले केल्यास या रस्त्याने बाहेरच्या बाहेरून ट्रॅफिक जाईल. त्यामुळे आयटीतील ९० टक्के वाहतूक समस्या सुटेल, असे मत अनेक स्थानिकांनी नोंदवले. काही ठिकाणी रस्त्यांची किरकोळ कामे रखडली तर बहुतेक ठिकाणी कामे संथगतीने चालू आहेत.
पीएमआरडीए प्रशासन शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे योग्य वाटाघाटी होत नसल्याने शेतकरी विरोधात आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून योग्य समन्वय साधून भूसंपादन करून तातडीने रस्ता करणे गरजेचे आहे.
- विक्रम साखरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, हिंजवडी ग्रामपंचायत
अधिकारी म्हणतात...
हिंजवडी परिसरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली आहे. सर्व संस्थांशी पत्रव्यवहार झाला असून, पाठपुरावा सुरू आहे. ३७ कंपन्यांचे स्थलांतर २०१२ पासूनचे आहे. या कंपन्या छोट्या होत्या. सध्या वाहतूक खूप सुरळीत आहे.
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग
घोटावडे, माण, मेझा नाईन, लक्ष्मी चौक ते मारुंजी, कासारसाई हा साडेतेवीस किलोमीटर लांबीचा १३० क्रमांकाचा राज्यमार्ग पीडब्लूडी व एमआयडीसी मिळून करत आहोत. फेज एकमधील मेट्रो पिलरच्या दुतर्फा रुंदीकरण सुरू आहे.
- एम. एस. भिंगारदिवे, उपअभियंता, बांधकाम विभाग
हिंजवडी फेज एककडे जाणारा सुमारे पाचशे मीटर रस्ता करणार आहोत. या रस्त्यातील बाधित शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी व मोबदल्याबाबत आमची सकारात्मक बोलणी होऊ न शकल्याने भूसंपादन रखडले आहे.
- देवाण्णा गट्टूवार, कार्यकारी अभियंता, ड प्रभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
आमच्या अखत्यारीतील माण-म्हाळुंगे टीपी स्कीममधील सहापदरी रस्ता व फेज वनमधील सुमारे पाच किलोमीटर या दोन रस्त्यांचे किरकोळ कामे बाकी आहेत. शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा विषय रेंगाळला आहे. समन्वय साधून रस्ता पूर्ण केला जाईल.
- प्रकाश भडंगे, उपअभियंता, एमआयडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.