PCMC Crime : अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेचा ‘हातोडा’

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे सोमवारी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर शहरातील होर्डिंगचा विषय चव्हाट्यावर आला.
Illegal Hoarding
Illegal Hoardingsakal
Updated on
Summary

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे सोमवारी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर शहरातील होर्डिंगचा विषय चव्हाट्यावर आला.

किवळे येथील घटनेत पाच जणांचा बळी गेल्यानंतर अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत महापालिकेला जाग आली आहे. शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांत ६५ अनधिकृत होर्डिंग आढळले असून, ते काढण्याची कारवाई सुरू केली आहे. न्यायप्रविष्ट ३३४ होर्डिंग वगळून अन्य सर्व होर्डिंग व किऑक्स काढून टाकण्यात येणार आहेत.

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे सोमवारी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला व तीन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर शहरातील होर्डिंगचा विषय चव्हाट्यावर आला. महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी रजेवर असल्याने तात्पुरता अतिरिक्त कारभार सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे दिला आहे. होर्डिंग मालक, जागा मालकांची बैठक घेऊन त्यांना होर्डिंगच्या मजबुतीबाबत आदेश दिले आहेत. शिवाय, अनधिकृत होर्डिंग काढून घ्यावेत, अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.

शहरातील अधिकृत व अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांत ६५ अनधिकृत होर्डिंग आढळले असून, त्यांच्यासह विद्युत खांब, झाडांची खोडे यांवर लावलेले किऑस्क काढून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे.

- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग, महापालिका

मृतांच्या नातेवाइकांना नोकरीची मागणी

किवळे : होर्डिंग कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबातील सदस्यांस महापालिका सेवेत नोकरी देऊन पुनर्वसन करावे. आकाशचिन्ह व परवाना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सहआरोपी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच जखमींना महापालिकेने प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे संस्थापक संजय धुतडमल, प्रदेशाध्यक्ष विजय मोरे, संदीपान झोंबाडे यांनी प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

होर्डिंगसाठी झाडांची कत्तल

अधिकृत व अनधिकृत होर्डिंग असलेल्या परिसरात वृक्षांची छाटणी केली जात आहे. होर्डिंगवरील जाहिराती दिसाव्यात यासाठीच झाडांची छाटणी केली जात आहे. याबाबत अंघोळीची गोळी संस्थेचे पदाधिकारी तनय पटेकर यांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्यांनुसार होर्डिंगसमोरची झाडे छाटली जात आहेत. महापालिका अधिकारी मात्र अज्ञान व्यक्तींनी झाडांची छाटणी केल्याचे सांगतात. याबाबत महापालिका उद्यान विभागाने पोलिसांकडे तक्रार केली असून, त्यात, विनापरवाना वृक्षतोडीबाबत संबंधितांवर झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार कारवाई करावी, असे म्हटले आहे.

नागरिक म्हणतात...

हिंजवडी साखरे वस्तीत जमिनीपासून वीस फूट उंचीचा व चाळीस बाय चाळीस फूट चौकोनी धोकादायक होर्डिंग आहे. वादळ, वारा, पावसामुळे तो कोसळल्यास जीवितहानी होऊ शकते. या रस्त्यावरील रहदारी व लोकवस्तीस धोका असल्याने होर्डिंगबाबत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, तहसीलदार मुळशी, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली आहे. परंतु, कारवाई झालेली नाही. धोकादायक होर्डिंग त्वरित हटवावे.

- विजय साखरे, हिंजवडी

शहरात अनधिकृत व अधिकृत होर्डिंगची संख्या खूप वाढत चाललेली आहे. किवळे येथील अवैध होर्डिंग दुर्घटनेत पाच नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील होर्डिंग स्ट्रक्चरचे ऑडिट करणे गरजेचे आहे. तसेच, किवळे येथील ज्या कंपनीची अनधिकृत होर्डिंग आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मृतांच्या नातेवाइकांना व जखमींना तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.

- युवराज दाखले, संस्थापक अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ

अधिकृत होर्डिंगसुद्धा वाऱ्याच्या जोरामुळे पडू शकतात. त्याच्यावर पडणारा वाऱ्याचा जोर कमी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. कायदेशीर होर्डिंगला मान्यता देताना त्यावर लावण्यात येणाऱ्या फलकावर कट्स किंवा चौकोनी छिद्रे असावीत. वादळात वाऱ्यामुळे होर्डिंग पडणार नाहीत. फलक फाटणार नाही, याची काळजी घ्यावी. वारा निघून जाण्यासाठी फलकाला छिद्र असावे.

- धनंजय गुणे, तळेगाव दाभाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.