Indrayani River : जलपर्णीच्या विळख्यात अडकली इंद्रायणी

इंद्रायणी नदीपात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून, जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Indrayani River jalparni
Indrayani River jalparnisakal
Updated on

तळेगाव स्टेशन - इंद्रायणी नदीपात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून, जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसू लागले आहेत. इंद्रायणी काठच्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही.

त्यामुळे आता इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांचा सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी जलप्रदूषण आणि जलपर्णी रोखण्यासाठी वापरणे सक्तीचे करावे, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.

‘सीएसआर’ निधीतून व्हावे उच्चाटन

जलपर्णी काढण्यासाठीची कुठलीही यंत्रणा मावळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक आवाक्याबाहेरची आहे. केवळ मजूर लावून होडीद्वारे जलपर्णी काढणे शक्य नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे असलेली अत्याधुनिक यंत्रणा ठराविक काळासाठी नाममात्र भाडेतत्वावर घेऊन जलपर्णी काढता येऊ शकते.

अथवा परिसरातील कंपन्यांच्या सीएसआर निधीतून मावळ तहसील कार्यालय जलपर्णी काढण्याची यंत्रसामग्री खरेदी करू शकते. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिसरातील औद्योगिक आस्थापना आणि पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

सांडपाणी विनाप्रक्रिया इंद्रायणीत

यशवंतनगरमधील सांडपाणी वाहिनी याच उपसा प्रकल्पाच्या अगोदर इंद्रायणीच्या नदीपात्रात जाऊन मिळते. अगदी काही मीटरच्या अंतरावर नगर परिषदेच्या पंपहाऊसमधून उचललेले हे पाणी पुन्हा यशवंतनगरसह इतर उपनगरांमधील नागरिकांच्या तोंडी जाते. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे.

नगर परिषदेच्या कातवी उपसा प्रकल्पातील पंपाच्या फुटबॉलमध्ये जलपर्णी अडकल्याने बिघाड होऊन अनेकदा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. नगर परिषदेचे हे जलप्रदूषणपूरक धोरण पाणीपुरवठा विभागासह नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरते आहे. गटारीचे विनाप्रक्रिया पाणी नागरिक वर्षानुवर्षे नाइलाजाने वापरत आहेत. तळेगाव नगर परिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करून, जलप्रदूषण रोखण्याची नागरिकांची मागणी आहे.

यशवंतनगरमधील २.४५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, सध्या त्याचे काम चालू आहे. प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आणखी तीन-चार महिने लागण्याची शक्यता आहे.

- मल्लिकार्जुन बनसोडे,

अभियंता, बांधकाम विभाग, तळेगाव दाभाडे नगर परिषद

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कातवी हद्दीतील उपसा केंद्रातील पंपांच्या फुटबॉलमध्ये जलपर्णी अडकल्याने काही वेळा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. नदीपात्रातील जलपर्णीमुळे पाण्याची शुद्धतादेखील खालावली आहे.

- अभिषेक शिंदे, पाणीपुरवठा विभाग, तळेगाव दाभाडे नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.